लहान मुलांच्या बाळगुटीत जो हिरवट पिवळा खडा असतो तो म्हणजे डिकेमाली होय. संस्कृतमध्ये नाडिहिंगु, लॅटिनमध्ये गार्डिनिया गमिफेरा तर इंग्रजीमध्ये गनिकेपजस्मीन या नावाने ओळखला जाणारा हा एक लहान पानझडी वृक्ष असून भारत आणि श्रीलंकेत आढळतो. याची पाने चकचकीत अंडाकृती साधी, बिनदेठाची जवळजवळ असतात. फेब्रुवारी ते जूनमध्ये फांद्यांच्या टोकाला लहान देठाची, सुवासिक, पांढऱ्या रंगाची फुले येतात. या झाडाचा महत्त्वाचा भाग म्हणजे खोड. खोडाची साल हिरवट तपकिरी रंगाची व गुळगुळीत असते. सालीच्या आत पिवळट, पांढरे कठीण लाकूड असते. त्याचे कोरीव आणि कातीव काम करता येते. खोडावरील कळ्यांपासून राळेसारखा हिरवट पिवळा डिंक स्रवतो. तो वाळवतात. आणि त्याचे तुकडे किंवा वडय़ा करतात. त्याला डिकेमाली म्हणतात. या वृक्षाची फळे साधारण बोराच्या आकाराची, मृदू आणि कंगोरेयुक्त असतात. त्यांवर कायम राहणारा पाकळ्यांचा भाग असतो. फळांमध्ये अनेक बिया असतात.
डिकेमाली शुद्धकारक, सारक, भूक उद्दीपित करणारी व कामोत्तेजक असते. डिकेमालीत कृमिनाशक, जंतुनाशक, उत्तेजक आणि आचके थांबवणारे गुणधर्म असतात.
डिकेमालीचा उपयोग भूक नसणे, आतडी दुखणे खोकला अजीर्ण यांसारख्या विकारांमध्ये करतात. स्त्रियांच्या गर्भाशय विकारांवर करतात. लहान मुलांची पोटदुखी, दात येताना होणारे अपचन तसेच लहान मुलांचे दात येताना हिरडय़ांमध्ये होणारी शिवशिव डिकेमाली आणि मध यांचे मिश्रण हिरडय़ांवर घासल्याने कमी होते. व हिरडय़ा बळकट होतात. जंतविकारावर डिकेमाली उपयुक्त आहे. जनावरांच्या जखमांवर माश्या बसू नयेत म्हणून डिकेमालीची पूड लावतात. डिकेमालीच्या बियांचे तेल कृमींवर उपयुक्त असते. यकृत प्लीहा यांच्या आकारमानावर नियंत्रण ठेवण्यास डिकेमाली वापरतात. डोकेदुखी ताप त्वचा विकार यावर डिकेमाली उपयुक्त आहे. हृदयाचे कार्य सुनियोजित चालवण्यासाठी डिकेमाली वापरतात. खरूज, काटा, कंडू यावरही डिकेमाली पोटात घेतल्यास बरे वाटते. डिकेमाली उगाळून मूळव्याधीस लेप केल्यास ठणका आणि खाज थांबून मूळव्याध बरी होते.
मोडशी, अजीर्ण यापासून होणारी उलटी थांबवण्यासाठी डिकेमाली लिंबाच्या रसात नरम करून चाटवल्यास लगेच उलटी थांबते. डिकेमाली हा अनंताशी साधम्र्य असलेला छोटेखानी वृक्ष आहे.
– मृणालिनी साठे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा