डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

आपल्या सर्व भावना हा मेंदूतील रसायनांचा खेळ आहे. मेंदूतील डोपामाइन, सेरोटॉनिन, एन्डॉर्फिन आणि ऑग्झिटोसिन ही रसायने आनंद, उत्साह अशा भावनांशी निगडित आहेत. यातील डोपामाइन हे रसायन कंटाळा दूर करते. हे रसायन मेंदूत कमी प्रमाणात असते त्यावेळी माणसाला कंटाळा येतो. निसर्गत: ते दिवसभरात अधिक पाझरते आणि रात्री कमी होते. रात्री ते जास्त असेल तर झोप लागत नाही.

दिवसादेखील डोपामाइन काही वेळा कमी होते. जागृत अवस्थेत आपण तीन प्रकारचे अनुभव घेत असतो. काही अनुभव सुखद असतात, काही अनुभव दुख: देणारे, त्रासदायक असतात; पण बरेच अनुभव असुखद-अदु:खद म्हणजे ‘न्यूट्रल’ असतात. हा न्यूट्रल अनुभव कंटाळा आणणारा असतो. गंमत म्हणजे, एखादा सुखद अनुभव बराच काळ टिकून राहिला की त्यातील सुख कमी होऊ लागते, तो हळूहळू न्यूट्रल आणि कंटाळवाणा होऊ लागतो.

चुंबन घेणे हा अनुभव बऱ्याच जणांना उत्तेजित करणारा असतो. चुंबन घेण्याच्या कल्पनेनेच मेंदूत डोपामाइन पाझरते, मन उत्तेजित होते. पण त्याच चुंबनाच्या स्थितीत बराच वेळ राहिले, तर तो अनुभव कंटाळवाणा होतो. त्यावेळी मेंदूतील डोपामाइन कमी झालेले असते, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. कोणतीही कृती वा स्थिती नावीन्याची न राहिल्यास डोपामाइन पाझरणे थांबते, माणसाला कंटाळा येऊ लागतो.

‘डिप्रेशन’मध्ये सेरोटॉनिन आणि डोपामाइन ही दोन्ही रसायने कमी होतात. त्यामुळेच या आजारात काही करावे असे वाटत नाही आणि काही केले तरी आनंद होत नाही. ‘क्लिनिकल डिप्रेशन’ या मनोविकारात औषधे देऊन ही रसायने वाढवली जातात. ती वाढल्यास उत्सुकता वाटू लागते, उदासी कमी होते. असा आजार असेल तर औषधे घेणे आवश्यक असले, तरी रोजच्या आयुष्यातील उदासी आणि कंटाळा दूर करण्यासाठी तंबाखू, दारू अशा रसायनांवर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण त्यामुळे त्यांचे व्यसन लागते. सजगतेने जाणीवपूर्वक उत्सुकता वाढवल्यास मेंदूत डोपामाइन तयार होते. म्हणजेच आपण या रसायनांचे गुलाम नसून स्वामी आहोत. आपण आपल्या भावना बदलल्या की मेंदूतील रसायने बदलतात. त्याचसाठी साक्षीध्यानात शरीरात काय जाणवते, ते उत्सुकतेने पाहायचे असते. शरीरातील संवेदना उत्सुकतेने जाणू लागलो, की मेंदूत डोपामाइन तयार होऊन कंटाळा दूर होतो.