जन्माने मुंबईकर असलेले अडी दमानिया गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिकेत वनस्पतींच्या जनुकसंपत्ती संदर्भातील संशोधनकार्यात मग्न आहेत. माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयातून पदवीधर झाल्यावर मुंबईच्या विज्ञान संस्थेतून त्यांनी परिस्थितीकी (इकॉलॉजी) हा विशेष विषय घेऊन वनस्पतिशास्त्रात एम.एस्सी. मिळवली. नंतर इंग्लंडमधील बिमगहॅम विद्यापीठातून १९७५ मध्ये एम.एस्सी. आणि १९८३ मध्ये पीएच.डी. पुरी केली. यासाठी त्यांनी गहू, सातू याची उत्पत्ती, वाढ आणि जनुकसंपत्ती गोळा करून साठवण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. जनुकसंपत्ती साठवण्याचे शिक्षण घेणारे डॉ. दमानिया हे बहुतेक पहिले भारतीय असावेत.
रोममध्ये युनोच्या अन्न व कृषी संघटनेबरोबर कार्य करत असताना डॉ. दमानिया आफ्रिका, आशिया, युरोप आणि अमेरिकेतील अनेक ठिकाणी फिरून अन्नधान्याची जनुकसंपत्ती गोळा करत त्यानंतर ते इकार्डा (आंतरराष्ट्रीय शुष्क कृषिविज्ञान संशोधन केंद्र) येथे अन्नधान्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी चीन, तुर्कस्तान, जॉर्डन, इराण, मोरोक्को वगरे देशांतून धान्यजनुके गोळा केली.
सध्या डॉ. दमानिया कॅलिफोíनया विद्यापीठाच्या डेव्हिइस येथील वनस्पतिशास्त्र विभागात रीसर्च जेनेटिक्स म्हणून कार्यरत आहेत. जैवविविधतेचे जतन, पुराणी कृषिव्यवस्था, औषधी आणि जंगली वनस्पतींची लागवड अशा विषयांत संशोधन करत आहेत. गव्हाच्या पिकात सुधारणा करणे, जनुकसंपत्तीचे जतन करणे, आशियातील कृषी पद्धती इत्यादी विषयांत त्यांनी सुमारे २५० शोधनिबंध व लेख प्रसिद्ध केले आहेत. शिवाय पंधराएक पुस्तकांचे संपादनही केले आहे.
जगभरातील अन्नधान्याची जनुकसंपत्ती ओळखून ती गोळा करून त्यांचा संग्रह व जतन करण्याच्या कार्याबद्दल डॉ. दमानिया यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. फेलो ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स आणि प्लँट ब्रीिडग, फेलो ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ प्लँट जेनेटिक रिसोस्रेस, फेलो ऑफ द क्रॉप सोसायटी ऑफ अमेरिका.
युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (आय.बी.पी.जी. आर.) च्या डॉ. व्हव्हीलॉव रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ प्लँट इंडस्ट्री सॅँट पीटसबर्ग, रशिया यांचे महत्त्वाचे असे डॉ. व्हव्हीलॉव पदक त्यांना १९९२ मध्ये मिळाले.
जवळजवळ सर्व कार्यकाळ भारताबाहेरच असले तरी डॉ. अर्देशिर दमानिया कुटुंबभेटीसाठी वर्षांआड मुंबईस येतात. अलीकडच्या भेटीत त्यांनी त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह दक्षिण मुंबईतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाला भेट दिला.
प्रा. शरद चाफेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

रोमन गुलामगिरी
प्राचीन आणि मध्ययुगीन समाजात गुलामांचा मोठा वर्ग होता. रोमन साम्राज्यात गुलाम दोन प्रकारांनी बनत. विकत घेतलेले आणि युद्ध कैद्यांना बनविलेले गुलाम हा एक प्रकार आणि गुलाम मातापित्यांचे अपत्य हा दुसरा. जन्मत: गुलाम असणाऱ्या दुसऱ्या प्रकाराला ‘व्हर्नी’ म्हणत. व्हर्नी ही उपाधी गुलामांमध्ये प्रतिष्ठेची समजली जाई! मृत्यूनंतर त्यांच्या कबरीवरही ‘व्हर्नी’ ही उपाधी कोरली जाई. गुलामांच्या बाजारात त्यांना चौकामध्ये मानेवर लेबल बांधून उभे केले जाई. या लेबलवर त्याची किंमत आणि बायोडेटा लिहिलेला असे. विकले न गेलेल्या गुलामांचा लिलाव होई. अधिक गुलाम ठेवणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. एखादा श्रीमंत माणूस गुलाम बरोबर न घेता बाहेर पडला तर तो चेष्टेचा विषय होई. सिसिलीयस नावाच्या श्रीमंताकडे ४००० गुलाम होते! त्याच्या प्रासादांमध्ये, शेतीवाडीवर हे गुलाम विखुरलेले असत. केवळ गुलामांची नोंद ठेवून त्यांच्या व्यवस्थेसाठी खास चिटणीस असे. रोज किती गुलाम जन्मले, मेले किंवा नवीन खरेदी केले याची नोंद तो ठेवी. ओगालिनीआ ही श्रीमंत मालकीणबाई बाहेर जाताना दहा-बारा स्त्री गुलाम, एक नर्स, चार स्त्री गुलाम तिची वेशभूषा नीट ठेवण्यासाठी बरोबर नेत असे! विविध देशांमधून आणलेल्या गुलामांचे काही गुणविशेष होते. ग्रीसचे गुलाम साहित्य आणि व्याकरण यात विद्वान होते, आशियातले उत्कृष्ट आचारी, आफ्रिकेतील बलवान, इजिप्तचे देखणे आणि जर्मनी, ग्रीसमधील युद्धकुशल असल्याने त्यांचा ग्लॅडीएटर म्हणून उपयोग होई. प्रत्येक गुलामाचे काम ठरलेले असे. आफ्रिकन गुलामांचे काम मालकाचा मेणा उचलणे आणि मेण्यासमोर धावून पुढे जात रस्ता मोकळा करून घेणे, काही गुलामांचे काम मालकाला अदबीने आसन पुढे करणे, पडदे उघडणे, काहींना टांकसाळ, अर्थखात्यात काम मिळे. काही गुलामांना मुक्तता मिळाली तरी ते गुलामगिरीच पसंत करीत. गुलामांना त्यांच्या चुकांसाठी, गुन्ह्य़ांसाठी देण्याच्या शिक्षांबाबत सिनेटचे कायदे नसल्याने मालकच ते ठरवीत असे. किरकोळ गुन्ह्य़ासाठी हात, पाय तोडण्याच्या शिक्षा असत.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ardeshir damania