डॉ. जी. एस. चीमा यांचा जन्म साहोवाला (सियालकोट जिल्हा, सध्या पाकिस्तानमध्ये) येथे १८९४ साली झाला. १९१५ मध्ये पदवी मिळवून दोन वर्षांनी लाहोर येथून त्यांनी एम.एस्सी. केले. पंजाब विद्यापीठातर्फे १९२५ मध्ये त्यांना डी.एस्सी. पदवी मिळाली. डॉ. चीमा तत्कालीन मुंबई राज्यात पुणे येथे प्रमुख उद्यानविद्यावेत्ता (फर्स्ट हॉर्टिकल्चरिस्ट टू गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे) होते. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्यपदही त्यांनी नंतर भूषवले. १९२१ मध्ये इंग्लंड, अमेरिका तसेच १९३० मध्ये त्यांनी तुर्कस्थान या देशांचा अभ्यासदौरा केला.
डॉ. चीमा यांनी डाळिंब, द्राक्षे, पेरू यांवर बरेच संशोधन केले. द्राक्षाची सिलेक्शन-७ ही सुधारित जात त्यांनी निवड पद्धतीने विकसित केली. हा वाण पांढरी साहेबी व फकडी या दोन जातींचा नसíगक संकर आहेत. फिक्कट पिवळे लांबटगोल मणी, घड त्रिकोणी, साखर १२ टक्के अशी ही जास्त उत्पन्न देणारी जात आहे. त्यांच्या या कार्याबद्दल या वाणाचे नाव ‘चीमासाहेबी’ ठेवण्यात आले.
अलाहाबाद सफेदा या वाणाच्या झाडापासून डॉ. चीमा यांनी लखनौ-४९ ही पेरूची नवीन जात विकसित केली. ही झुडपासारखी पसरणारी जात आहे. याची फळे मोठी, गोड व चवदार असतात. डॉ. चीमा यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी या वाणाचे नाव ‘सरदार’ असे ठेवण्यात आले.
डाळिंबाची जीबीजी १ ही जात डॉ. चीमा यांनी पुण्यातील गणेशिखड येथे विकसित केली. गुलाबी गर, उत्तम चव, मोठी फळे असणारी ही जात उत्पन्नही बऱ्यापकी देते. या वाणाला गणेश हे नाव देण्यात आले.                   
डॉ. चीमा यांनी ‘कमर्शियल फ्रूट्स ऑफ इंडिया’ या नावाचे पुस्तक लिहिले. ते १९४९ मध्ये निवृत्त झाले व पुण्यात स्थायिक झाले. त्यांनी विकसित केलेल्या वाणांपकी द्राक्षाचे वाण आज उपलब्ध नाहीत. मात्र पेरूचा सरदार व डाळिंबाचा गणेश हे वाण आजही लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर त्यांची लागवड केली जाते. व्यापारीदृष्टय़ाही ते फायदेशीर ठरलेले आहेत.

जे देखे रवी..  –   फळबाजार
जग हे एक फळबाजार आहे. पैसे देऊन बसचे तिकीट काढले की, प्रवासाचे फळ मिळते. हल्ली बसवर जाहिराती असतात. कारण हल्ली बाजार वाढला आहे आणि फळांची रेलचेल आहे. माझ्या उत्पन्नाचा हिशेब लिहिण्यासाठी एक गृहस्थ येतात ते एकदा म्हणाले की, Malls  मुळे खूपच फायदा झाला. एके ठिकाणी सगळे काही मिळते शिवाय दिवसही बरा जातो, पण हल्ली मला म्हणाले, ‘डॉक्टर हे मॉल भूलभुलैयासारखे आहेत.’ ही त्यांच्यात झालेली उत्क्रांतीच.
माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले तेव्हा एका प्राध्यापकांनी मला एक ब्रीद वाक्य सुनवले होते ते असे ”Early to Bed, Early to Rise, Work Like Hell and Advertise” शेवटी तुम्ही काय आहात किंवा तुमचे उत्पादन काय आहे हे सगळ्यांना कळल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आमच्या गावाला म्हणजे येवल्याला एका दुकानावर. एक पाटी होती त्यावर लिहिले होते ‘इथे स्टोव्ह वेळेवर दुरुस्त करून मिळणार नाहीत’ मी त्याला म्हटले हे काय? तो म्हणाला, ‘मी गावात एकटाच आहे. ढीगभर काम आहे म्हणून स्पष्टच लिहिले आहे.’ तो जमाना आता गेला. झाडाला लगडलेली फळे आणि जमिनीत दडलेली कंदमुळे खाऊन गुजराण करण्याचे दिवस आता गेले. आता जमाना आहे औद्योगिक स्तरावरच्या फळनिर्मितीचा, शीतगृहांचा, FDI in retail चा आणि फळांच्या करंडय़ा नव्हे तर Crates घेऊन परदेशात भरारी घेणाऱ्या अजस्त्र विमानांचा.
माझा एक भाचा आहे त्याने जठर विद्येत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत असे काही यश मिळविले आहे की, विचारू नका. रुग्णांचा सतत गराडा असतो. हा निराळा अशासाठी की माध्यमांशी संपर्क ठेवण्यासाठी याने एक माणूस नेमला आहे. हा माणूस या माझ्या भाच्याला किंवा त्याने विकसित केलेल्या नव्या-नव्या तंत्रांना वर्तमानपत्रात, मासिकात किंवा दूरदर्शनवरच्या वाहिन्यांवर अधूनमधून प्रकट करण्याचे काम करतो. मी भुवया उंचविल्यावर मला हा माझा भाचा म्हणाला ‘रविनमामा मी जे साध्य केले आहे त्याचा फायदा लोकांना व्हावा एवढीच इच्छा आहे. कोणी गरीब आला तर मी विनामूल्य करतो’ या माणसाचे फळ ठरले आहे. William Tell च्या गोष्टीप्रमाणे स्वत:च्या मुलाच्या डोक्यावरच्या सफरचंदाकडे याचे लक्ष आहे. मुलाकडे नाही. गंमत अशी आहे की, याचे कर्म याचे फळ झाले आहे.
कर्म आणि त्याचे फळ एकच? हे व्याकरणात बसत नाही. आधी कर्ता असतो तो कर्म करतो मग फळ मिळते. हे तीन एकत्र केले तर जग चालणार कसे?
त्याचे उत्तर असे आहे की, जग आपोआपच चालते. या वरच्या एकत्रीकरणामुळे आपले चालणे मात्र सुसह्य़ होते.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस –  वातविकार : भाग -३
शरीर व परीक्षण – धातुक्षय :  वजन, नाडीचे ठोके, डोळ्यांचे तेज, ताप, मांसक्षय यावर लक्ष असावे. उदरवात: पोटावर दाबल्यास डब्ब, टमटम आवाज येतो का? पाहावे. पक्वाशयाचा भाग, जीभ तपासावी. अंगमर्द : बारीक ताप, जीभेचे किटण तपासावे. मानेचे विकार : सूज बघावी, क्ष किरण तपासणीची मदत घ्यावी. कंपवात :  मेंदूच्या कार्यआलेखाची मदत घ्यावी. मलप्रवृत्ती साफ आहे का? पोटावरून समजून घ्यावे. अर्दित : तोंड फुगवून चुळा भरावयास सांगून विकारांची तीव्रता आजमवावी. वातकंटक : सुजेचा भाग सूज नसलेल्या अवयवावरून आजमवावा. मुंग्या : वजन, मानेचे, पाठीचे व कमरेचे मणके यांचे परीक्षण; रक्तदाबवृद्धी, रक्तशर्करा परीक्षण करावे.
उपचारांची दिशा – धातुक्षय : बृहण उपचार, थोडी झोप, विश्रांतीचा उपयोग करून पाहावा. उदरवात, अंगमर्द : गरम पाणी पिणे, लंघन यांचा उपयोग करावा. मानेचे विकार व कंपवात: कठीण अंथरुणावर किंवा फळीवर शवासनात झोपून उपशय पाहावा. अर्दित : अंतर्बाह्य़ स्नेहाची योजना करावी. मुरगळा/ वातकंटक : गरम-गार पाण्यात आलटून पालटून सुजेचा भाग बुडवावा. मुंग्या विकार : कमी जेवण, मसाज, शेक यांचा उपयोग करावा.
पथ्यापथ्य – तोंडी लावणे म्हणून लसूण, आले, मुळा, जिरे, सुंठ, मिरे, ओली हळद, तसेच जेवणात गव्हाचे फुलके, तांदूळ भाजून भात, मूग, गोड ताक, सुरण, दुधी भोपळा, तूप, पडवळ, कारले माफक प्रमाणात एरंडेल असावे. काकडी, टोमॅटो, बियांचे पदार्थ, कांदा, बटाटा, मटकी, वाटाणा, हरभरा, तेलकट, तुपकट पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, मेवामिठाई; भूक नसताना वा जास्त जेवण, राक्षसकाली उशिरा जेवण, जेवण ताजे, रुचकर व थोडे कमी असावे. उबदार व कठीण अंथरुण, फळी, ब्लँकेट व चटई असे निवडावे. गादी गार पडते, गादीवर शाल असावी. थोडे उकडले तरी चालेल पण कपडे उबदार असावेत. कोमट पाण्याचे स्नान, किमान व्यायाम, नित्य अभ्यंग फायदेशीर. एकाकी राहू नये, कुढू नये.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – २५ जून
१९०५ > वैदर्भीय कवी यादव मुकुंद पाठक यांचा जन्म. त्यांच्या अनेक अप्रकाशित कविता निधनोत्तर, ‘अग्निकमळ’ या नावाने संग्रहित झाल्या.
१९५२ > लेखक, गाढे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांचा जन्म. त्यांच्या अभ्यासाची साक्ष देणाऱ्या अनेक पुस्तकांपैकी ‘मंथन’ हे पहिले, तर ‘त्रयोदशी’ हे ज्ञानेश्वरांविषयीचे. ‘तुकाराम दर्शन’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘लोकमान्य ते महात्मा’ , ‘कृष्ण : द मॅन अँड हिज मिशन’ हे इंग्रजी पुस्तक, तीन काव्यसंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.
१९७७ > अफझलखानवधाचा पोवाडा रचणारे कवी बळवंत गणेश खापर्डे यांचे ‘अनंताची हाक’, ‘काव्यांतर व इतर काही कविता’, ‘गाणे अता कशाचे’ हे काव्यसंग्रह, तसेच ‘भगवद्गीतेचे अंतरंग’, ‘मनाचा संसार’ ही गद्य पुस्तके प्रकाशित झाली.
१९८० > समीक्षक प्रा. लक्ष्मण गणेश जोग यांचे निधन. कादंबरीची चिकित्सा करणारा ‘कादंबरी’ हा ग्रंथ तसेच संत नामदेव, अरूपाचे रूप (ज्ञानेश्वरीच्या अध्यायांचे विवेचन) हे दीर्घलेख, लावण्यवेध, दीपदर्शन, लावण्यक्षितिजे हे स्फुट समीक्षालेख संग्रह ही त्यांची पुस्तके.
– संजय वझरेकर

Story img Loader