मत्स्यविज्ञान हा विषय सामान्यजनांच्या विशेष परिचयाचा नाही. मात्र महाराष्ट्राची किनारपट्टी आणि मासेमारी लक्षात घेऊन या विषयाची महाराष्ट्रात मुहूर्तमेढ रोवणारे मत्स्यवैज्ञानिक डॉ. दत्तात्रय वामन बाळ यांनी मुंबईतच सीआयएफई या अभिमत मत्स्य विद्यापीठाची स्थापना केली. आज हे या विषयातील भारतातील एकमेव अभिमत विद्यापीठ आहे.

१९३८ ते १९४० या कालावधीत डॉ. बाळ यांनी इंग्लंडमधील लिव्हरपूल येथून मत्स्यविज्ञानातील डॉक्टरेट मिळवली. भारतात येऊन त्यांनी मुंबईतील ‘रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ येथे  प्राणीशास्त्र विभागप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली. १९४७ ते १९५१च्या दरम्यान ते भारत सरकारच्या ‘अन्न आणि शेतकी मंत्रिमंडळा’त ‘मत्स्य आणि मत्स्यविज्ञान सर्वेक्षण अधिकारी’ म्हणून कार्यरत होते. १९५१ पासून त्यांनी पुन्हा ‘रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ येथे प्राणीशास्त्र विभागप्रमुखपद ग्रहण केले. नंतर १९५६ ते १९६४ या कालावधीत डॉ. बाळ ‘रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’चे संचालक झाले. विद्यार्थी ते संचालक असा त्यांचा साडेतीन दशकांचा प्रवास अनेक प्राणीशास्त्रप्रेमींना प्रेरणादायी ठरला आहे. सागरी विज्ञान आणि मत्स्यशास्त्र या दोन्ही विषयांत त्यांनी विपुल संशोधन आणि लेखन केले. त्यांनी सहलेखकांबरोबर लिहिलेली मत्स्यविज्ञानावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. 

मुंबईच्या किनारपट्टीवर असणाऱ्या पापलेट, बोंबील, रावस, भिंग, पाला, वाकटय़ा, शिंपले अशा व्यापारी महत्त्वाच्या मत्स्यसाठय़ांची सखोल माहिती त्यांनी संशोधनाने उपलब्ध करून दिली. यामुळे भारत सरकारच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत सागरी मत्स्यविषयक धोरण राबवणे आणि विकास आराखडा तयार करणे शक्य झाले. ‘केंद्रीय समुद्री मत्स्यकीय संशोधन संस्थे’च्या सागरी मत्स्य सर्वेक्षण विभागाची रचना केल्यामुळे आजमितीला सरकारला मत्स्यविषयक धोरणे राबवणे सोपे झाले आहे.

शासनाच्या औरंगाबाद येथील विज्ञान संस्थेची पायाभरणीदेखील डॉ. बाळ यांच्यामुळेच झाली आहे. १९७४ साली त्यांनी ही संस्था सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरील अनेक समित्यांचे ते सदस्य होते. त्यांनी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे (१९५५-१९५८) सदस्य असताना जपान, पेरू, थायलंड, ब्रिटन व अमेरिकेत सभा गाजवल्या. १९८७ साली जैतापूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. डॉ. बाळ यांच्या अनेक विद्यार्थ्यांमुळे मत्स्यवैज्ञानिकांच्या पुढच्या पिढय़ा तयार झाल्या. स्वातंत्र्योतर भारतात महाराष्ट्राला मत्स्यविज्ञान आणि सागरीविज्ञान या विषयांचा परिचय करून देणारे म्हणून डॉ. बाळ यांचे कार्य मोठे आहे.

डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader