डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९२५ रोजी पुण्याजवळील भोर संस्थानात झाला. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयात शिकत असताना प्रा. आपटे आणि प्रा. कोल्हटकर यांच्यामुळे त्यांना वनस्पतिशास्त्राची गोडी लागली. पुण्याचा परिसर, गोव्यापर्यंतची सह्य़ाद्रीची पर्वतराजी येथे ते झाडे बघत आणि त्यांचा अभ्यास करीत पायी फिरले होते. फग्र्युसन महाविद्यालयात त्यांनी दहा वष्रे वनस्पतिशास्त्राचे अध्यापन केले. त्यानंतर मात्र प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विज्ञानवर्धिनी या संशोधन संस्थेत ते वनस्पतिशास्त्राचे एक संशोधक म्हणून काम करू लागले. त्या वेळी तेथे डॉ. आघारकर कार्यरत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रा. वर्तक यांनी वनस्पतिसमूहावर आपला पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. तेथे प्रा. वर्तक काही काळ वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख होते आणि नंतर ते त्या संस्थेचे संचालक म्हणून तेथून निवृत्त झाले.
जेथे वनस्पती नसíगकरीत्या उगवतात त्या जागेचे निरीक्षण करणे, त्या त्या वनस्पतींचे शास्त्रशुद्ध वर्णन करणे आणि त्यांची नावे ओळखणे हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांनी स्वत: गोळा केलेल्या वनस्पतींच्या १५००० नमुन्यांचा कागदावर चिकटवलेला संग्रह त्यांच्यापाशी होता. त्याशिवाय १२००० सुटे नमुने आणि बाटल्यातून साठवलेले १००० नमुने असा प्रचंड खजिना त्यांच्यापाशी होता. या सर्व खजिन्यावर त्यांनी शंभरेक संशोधन प्रबंध आणि एक पुस्तक तर लिहिलेच पण १६ पीएच.डी. प्रबंधांसाठी मार्गदर्शन केले. १९६६ साली त्यांनी गोव्यातील वनस्पतींवर लिहिलेले ‘गोमन्तकातील वनश्री’ हे पुस्तक एक उत्तम संदर्भग्रंथ म्हणून ओळखला जातो. वनस्पती ओळखून त्याची नोंद केल्यावर प्रा. वर्तक त्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म व इतर उपयोग, त्यांची पारंपरिक उपयुक्तता आणि वनवासींची त्या औषधी वापरण्याची पद्धत या गोष्टींची साक्षेपाने नोंदी ठेवीत. यामुळे त्यांचे संशोधन पथदर्शी ठरले. मंदिरांभोवती शतकानुशतके जोपासलेल्या बागांना देवराया म्हणतात. अशा देवराया भारतात शेकडोंच्या संख्येने आहेत. तो त्यांच्या खास अभ्यासाचा विषय होता आणि त्यावर त्यांनी मराठी व इंग्रजीत ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ दोन वनस्पतींना त्यांच्या नावे ओळखले जाते. प्रा. वर्तक यांचे निधन १७ एप्रिल, २००१ रोजी वयाच्या ७६व्या वर्षी झाले.
– अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,
मुंबई २२ office@mavipamumbai.org
पिसाचे गणितज्ञ लिओनार्दो फिबोनाची
पिसा या इटालियन शहरातील मध्ययुगीन काळातील चर्चचा कलता बेल टॉवर ऊर्फ कलता मनोरा आणि वैज्ञानिक गॅलिलिओ गॅलिली हे पिसाचे भूषण म्हणून मान्यता पावले, परंतु त्यांच्याच तोलामोलाचा मध्ययुगीन गणितज्ञ लिओनार्दो फिबोनाची हा पिसाचा रहिवासी मात्र काळाच्या ओघात विस्मरणात गेलेला दिसतो! पिसा येथे ११७० साली जन्मलेले लिओनार्दो हे प्रतिभावान आणि महत्त्वाचे इटालियन गणितज्ञ होते. त्यांचं गणितक्षेत्राला झालेलं मोठं योगदान म्हणजे त्यांनी िहदू-अरेबिक अंक पद्धतीत काही सुधारणा करून ती पाश्चिमात्य जगात रूढ केली. १२०२ साली त्यांनी ‘लिबेर अबासी’ म्हणजे बुक ऑफ कॅलक्युलेशन आणि ‘लिबेर क्वाद्रातोरूम’ म्हणजे बुक ऑफ स्क्वेअर्स नंबर्स या गणितशास्त्रातील ग्रंथांची निर्मिती केली. त्यांनी अंकांच्या क्रमवारीची एक नवीन पद्धती शोधून काढली.
मध्ययुगीन काळात युरोपात ही अंक पद्धती ‘फिबोनाची नंबर्स’ या नावाने आकडेमोडीसाठी वापरली जात होती. फिबोनाचीच्या लहानपणी त्यांचे वडील उत्तर आफ्रिकेतील अल्जेरियाच्या मुस्लीम राज्यात एका व्यापाऱ्याकडे नोकरीस होते. त्या काळात तेथील व्यापाऱ्यांच्या आकडेमोडीच्या निरनिराळ्या पद्धतींचा तरुण फिबोनाचीने अभ्यास करून १२०२ साली आपले लिबेर अबासी हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाने एक प्रतिभावान गणिती म्हणून मान्यता मिळून फिबोनाचींचा पिसाच्या प्रजासत्ताकाने १२४० साली सत्कार करून प्रमुख गणितज्ञ म्हणून नोकरी दिली.
त्यांनी युरोपात रूढ केलेली हिंदू-अरेबिक क्रमवारी भारतीय गणिती आणि व्यापारी पाचव्या सहाव्या शतकात सर्रास वापरत. त्यांच्या या फिबोनाची नंबर्समधील वैशिष्टय़ म्हणजे कुठलाही आकडा त्या पूर्वीच्या दोन आकडय़ांच्या बेरजेने मिळत असे. उदाहरणार्थ १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९ इत्यादी त्यांनी शोध लावलेल्या नवीन आकडेमोडीच्या पद्धतीमुळे व्यापारातले जमाखर्चाचे हिशेब, वजने, मापे आणि अंतरांचे मोजमाप, व्याजाचे हिशोब, राज्याराज्यांमधील चलनांचे हिशेब आणि सावकारी पेढय़ा, बँक इत्यादींच्या व्यवहारासाठी उपयुक्त ठरून सर्व युरोपात चटकन प्रचलित झाली. पुढे फिबोनाचीच्या नावाने ‘ब्रह्मगुप्त-फिबोनाची सिद्धान्त’, ‘फिबोनाची सर्च टेक्निक’ हे सिद्धान्त गणितशास्त्रात प्रसिद्ध झाले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com