आजपर्यंत अनेक दुष्काळ आले-गेले. कोणत्या वर्षी दुष्काळ पडेल, याचं भाकीत करता येणं कठीण आहे. दुष्काळ काही सांगून येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमीच तयारी ठेवली पाहिजे. कोरडवाहू शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने तेथील काही प्रमुख प्रश्न लक्षात आले. १. जमिनीची धूप २. जमिनीचे सेंद्रिय खत व्यवस्थापन. हे दोन प्रश्न काही प्रमाणात आपल्याला सोडवता आले तरी आपण दुष्काळाशी चांगला सामना करू शकू.
दुष्काळी भागात पाऊस पडण्याचे दिवस कमी असतात. परंतु एकावेळी भरपूर पाऊस पडतो व पुढे अनेक दिवस पाऊसच पडत नाही. अशा मोठय़ा पावसामुळे जमिनीची धूप मोठय़ा प्रमाणावर होते. जमिनीतील अत्यंत सुपीक माती वाहून गेल्याने जमिनीच्या सुपीकतेची हानी होते. पूर्वी पूर्वमशागतीची कामे बलाच्या मदतीने करत. यामुळे फक्त कुळवाची पाळी मारून पेरणी केली जात असे. आता ट्रॅक्टर आल्याने नांगरणी, कुळवणी, फणणे अशी कामे खोलवर करण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्व मशागतीत जमीन सलसर केली असता मोठय़ा पावसात धूप होऊन नुकसान होते. ते टाळण्यासाठी कोणतीही मशागत न करता अगर कमीतकमी मशागत करून पेरणीचे तंत्र विकसित करणे गरजेचे आहे.
कोणतीही मशागत न करता पेरणी करणारी यंत्रे आता विकसित झाली आहेत. त्यांचा वापर आपल्याकडे अजून सुरू झालेला नाही. अगर पाऊस पडून गेल्यानंतर वापसा (योग्य ओलावा) आल्यानंतर आपल्या नेहमीच्या बल अगर ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्रानेही पेरणी करणे शक्य आहे. कोरडवाहू भागात कापूस अगर तूर अधिक सोयाबीन अगर उडीद, मूग घेतला जातो. याऐवजी कापूस अगर तूर ही लांब अंतरावरील पिके टोकन पद्धतीने घ्यावीत व सोयाबीन, उडीद, मूग या जवळ अंतरावरील पिकांचे क्षेत्र वेगळे करून तितकेच क्षेत्र मशागत करून पेरणी यंत्राने पेरणी करावी. पूर्व मशागत बंद करण्याचे तंत्र विकसित झाल्यास त्यावर होणारा खर्च वाचेल व धूप होण्याचे प्रमाण खूप कमी करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी विनामशागतीचा पर्याय अभ्यासायला हवा.
– प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..:वैद्यकीय व्यवसाय
हल्ली समाजात वैद्यकीय व्यवसायाबद्दल आणि विशेषत: तज्ज्ञांबद्दल अस्वस्थता आहे हे नक्कीच. किंबहुना या अस्वस्थतेचे रूपांतर असंतोषात होते आणि त्यातून हिंसक घटना घडतात. याचे कारण समाज अस्थिर, उतावळा आणि शीघ्रकोपी झाला आहे. वैद्यकीय क्षेत्राबद्दल जगभरात कोठेही समाधान नाही ही वस्तुस्थितीही नमूद केलेली बरी. दुसऱ्या महायुद्धानंतर अ‍ॅटली यांनी इंग्लंडमध्ये राष्ट्रीय आरोग्य योजना सुरू केली. ती आदर्शवत योजना अनेक वर्षे उत्तम चालली; परंतु पुढे खिळखिळी झाली किंवा करण्यात आली, असे इतिहास सांगतो. याचे कारण मनुष्य स्वभाव. चार पैसे घेऊन प्रामाणिकपणे
वैद्यकीय उपचार करीत सेवा करावी ही भावना हळूहळू लयाला गेली. सर्व स्तरांत बेजबाबदारपणा वाढला. सुखलोलुपता हा समाजाचा स्वभाव बनला आणि या जुळ्यांमुळे कोठलीही मानवीय संस्था टिकणे अशक्य झाले. ‘जगातला सर्वात बलाढय़ देश आपला; परंतु समाजातल्या म्हाताऱ्या आणि उपेक्षित वर्गाला आपण वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही ही शरमेची गोष्ट आहे,’’ हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे उद्गार मोठे अर्थपूर्ण आहेत. भारतातल्या हल्लीच्या अस्थिर आणि संक्रमणात्मक काळात सुखलोलुपतेची चटक सगळ्यांनाच लागली आहे हे निर्विवाद. पूर्वी डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ज्ञ स्वत:च एक संस्था होते; परंतु उदारीकरणाच्या काळात फक्त उदारपणाच किंवा औदार्य नाहीसे झाले आहे. पूर्वी स्वत: संस्था असलेले डॉक्टर्स आता आर्थिक निकषांवर आधारित संस्थांच्या दावणीला बांधले गेले आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि त्या विकासाच्या माध्यमातून येणाऱ्या वर्णनामुळे रुग्णांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गरिबीतून वाट काढता येते, पण आजारपण जीव घेते, बेचैन करते आणि त्यातून बरे होण्यासाठी पैसे मोजावे लागतात, हे पैसे घराचे बजेट उधळून लावतात, कधी कधी हे सर्व करूनही हातातला माणूस जातो आणि या जाण्याबद्दल जर संशयाची सुई फिरू लागली तर डोकी फिरतात आणि मग धुमाकूळ घातला जातो. तथाकथित समाजसेवक (की समाजकंटक) मदतीला असतातच. कधी कधी संशयाला जागा असते आणि कधी कधी संशय निर्माण केला जातो कधी कधी परिस्थितीमुळे नातेवाईकांनी उशीर केलेला असतो. रुग्ण आणि डॉक्टर दोन्ही शेवटी माणसे असतात. काही उर्मट तर काही शांत, काही बेजबाबदार तर काही काळजीवाहू, काही लोभी तर काही निव्र्याज, काही विश्वासार्ह तर काही बेभरवशाची. पेशंट या शब्दाचा अर्थ सोशिक असा आहे, पण मुळात पेशंट सोशिक नसतो. उलट डॉक्टरने पेशंट किंवा शांत असण्याची गरज असते; परंतु तो आपली जीवन राहणी उंचावण्याच्या भरात इकडे-तिकडे पोट भरण्याच्या प्रयत्नात अशांतपणे गावभर भटकत राहतो. मग रामायण घडते. परिस्थितीनुसार मग रुग्ण डॉक्टरांच्या पाया तरी पडतात किंवा क्वचित त्याचे डोकेही फोडतात.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस:आर्तविकार : अत्यार्तव
अंगावरून खूप विटाळ जाणे ही समस्या, नव्याने विटाळ येणाऱ्या तरुण मुली; विटाळ जावयाच्या मोनोपॉझच्या काळात; तसेच खूप उष्ण, तीक्ष्ण पदार्थ खाणे, जागरण, फाजील श्रम अशा विविध प्रकारे मायभगिनींना भेडसावत असते. या तक्रारींकरिता कारणे विविध असतात. तीनही तक्रारींमध्ये शतावरी वनस्पतीची मदत मोठीच होते. शतावरीधृत, शतावरी कल्प, शतावरी चूर्णाची लापशी अशी योजना करावी. पायाखाली तीनचार उशा घेऊन उताणे स्वस्थ पडून विश्रांती घ्यावी. अकारण श्रमाची कामे, धावपळ, दगदग, जागरण, वादविवाद टाळावेत. चाळिीशीनंतर अंगावरून खूप जात असल्यास शतावरीघृतासोबत प्रवाळ, कामदुधा, चंदनादी वटी ही जादा औषधे घ्यावीत.
   गर्भाशयास सूज असल्यास किंवा सोनोग्राफी रिपोर्टमध्ये फायब्रॉइड, सिस्ट अशा गाठी असल्यास गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. घाबरून जाऊन गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्यास कंबरदुखी, पाठदुखी हे नवीन विकार जडतात. त्याकरिता मध्यमवयीन तरुणमहिलांनी दोन पाळींच्या मध्ये चार आठवडय़ाचेच अंतर राहील याकरिता मौक्तिकभस्म सकाळ-संध्याकाळ ५०० मिलिग्रॅम या हिशोबात किमान दोन आठवडे घ्यावे. आपण काय खातो, पितो यावर कटाक्षाने लक्ष ठेवावे. खूप उष्ण पदार्थ, चमचमीत पदार्थ, दही, मांसाहार, लोणची, पापड या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. केळी अननस, पोपई ही फळे टाळावी. एक चमचा शतावरी चूर्ण, एक चमचा तुपावर भाजून थोडे दूध, पाणी व साखर असे एकत्र उकळून लापशी करून दोन वेळा प्यावी.
अंगावर खूप जात असताना, लघवीला तिडिक मारत असल्यास व रक्तदोष व अंगाची सार्वत्रिक आग अशी लक्षणे असल्यास सकाळी एक चमचा उपळसरी चूर्ण घ्यावे.
आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आवळा घटकद्रव्य असलेला मोरावळा, च्यवनप्राश धात्रीरसायन अशी योजना लाभदायक ठरते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत:१५ एप्रिल
१७९४ > जवळपास ७५ हजार कविता लिहिणारे, ‘आर्या’ या वृत्ताने मराठी कवितेची  समृद्धी वाढवणारे मोरेश्वर रामचंद्र पराडकर म्हणजेच ‘मोरोपंत’ यांचे निधन. ‘आर्याकेकावली’ आणि ‘आर्यामुक्तमाला’ हे त्यांच्या स्फुटरचनांचे संग्रह, तर आर्याभारत, कृष्णविजय, भीष्मभक्तिभाग्य अशा ग्रंथांतून महाभारताचा व मंत्ररामायण, साररामायण आणि सीतागीत यांतून रामायणाचा काव्याविष्कार त्यांनी घडवला.
१८७४ > नट, नाटय़दिग्दर्शक आणि नाटक कंपनी काढणारेच नव्हे, तर नव्या धर्तीची नाटके लिहिणारे आणि नाटय़समीक्षाही करणारे त्र्यंबक सीताराम कारखानीस यांचा जन्म. जालियनवाला बाग हत्याकांडावर ‘राजाचे बंड- अर्थात एक मनोराज्य’, तसेच महाभारतातील अंबाहरणावर ‘स्वैरिणी अर्थात कलियुगारंभ’ ही नाटके व ‘वेणीसंहार : प्रयोगदृष्टय़ा चर्चा’ हा समीक्षानिबंध त्यांनी लिहिला.
१८९३>  चरित्रकार, इतिहास संशोधक नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म. न्या. म. गो. रानडे, लोकमान्य टिळक, नाटय़ाचार्य कृ. प्र. खाडिलकर, ‘महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’ ही अर्वाचीन चरित्रे त्यांनी लिहिली, तर ज्ञानेश्वर, एकनाथ आणि रामदास यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या साहित्यातून अभ्यास, ‘मराठेशाहीचा इतिहास’ असे इतिहास संशोधन केले. ‘अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी’ या पुस्तकातील मतांसाठी वादही झेलले.
– संजय वझरेकर

Story img Loader