आजपर्यंत अनेक दुष्काळ आले-गेले. कोणत्या वर्षी दुष्काळ पडेल, याचं भाकीत करता येणं कठीण आहे. दुष्काळ काही सांगून येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमीच तयारी ठेवली पाहिजे. कोरडवाहू शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने तेथील काही प्रमुख प्रश्न लक्षात आले. १. जमिनीची धूप २. जमिनीचे सेंद्रिय खत व्यवस्थापन. हे दोन प्रश्न काही प्रमाणात आपल्याला सोडवता आले तरी आपण दुष्काळाशी चांगला सामना करू शकू.
दुष्काळी भागात पाऊस पडण्याचे दिवस कमी असतात. परंतु एकावेळी भरपूर पाऊस पडतो व पुढे अनेक दिवस पाऊसच पडत नाही. अशा मोठय़ा पावसामुळे जमिनीची धूप मोठय़ा प्रमाणावर होते. जमिनीतील अत्यंत सुपीक माती वाहून गेल्याने जमिनीच्या सुपीकतेची हानी होते. पूर्वी पूर्वमशागतीची कामे बलाच्या मदतीने करत. यामुळे फक्त कुळवाची पाळी मारून पेरणी केली जात असे. आता ट्रॅक्टर आल्याने नांगरणी, कुळवणी, फणणे अशी कामे खोलवर करण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्व मशागतीत जमीन सलसर केली असता मोठय़ा पावसात धूप होऊन नुकसान होते. ते टाळण्यासाठी कोणतीही मशागत न करता अगर कमीतकमी मशागत करून पेरणीचे तंत्र विकसित करणे गरजेचे आहे.
कोणतीही मशागत न करता पेरणी करणारी यंत्रे आता विकसित झाली आहेत. त्यांचा वापर आपल्याकडे अजून सुरू झालेला नाही. अगर पाऊस पडून गेल्यानंतर वापसा (योग्य ओलावा) आल्यानंतर आपल्या नेहमीच्या बल अगर ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्रानेही पेरणी करणे शक्य आहे. कोरडवाहू भागात कापूस अगर तूर अधिक सोयाबीन अगर उडीद, मूग घेतला जातो. याऐवजी कापूस अगर तूर ही लांब अंतरावरील पिके टोकन पद्धतीने घ्यावीत व सोयाबीन, उडीद, मूग या जवळ अंतरावरील पिकांचे क्षेत्र वेगळे करून तितकेच क्षेत्र मशागत करून पेरणी यंत्राने पेरणी करावी. पूर्व मशागत बंद करण्याचे तंत्र विकसित झाल्यास त्यावर होणारा खर्च वाचेल व धूप होण्याचे प्रमाण खूप कमी करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी विनामशागतीचा पर्याय अभ्यासायला हवा.
– प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा