धुळीचे प्रदूषण कारखाने, बांधकाम, रस्त्यावरचे चौक यांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर आढळते. धुळीचे कण दोन आकारांत विभागले आहेत. २.५ आणि त्यापेक्षाही कमी मायक्रॉन व्यासाचे आणि थोडे मोठे म्हणजे १० मायक्रॉनपर्यंतच्या व्यासाचे. हे कण हवेपेक्षा जास्त वजनाचे असल्याने गुरुत्वाकर्षणामुळे भूपृष्ठावर स्थिरावतात, पण त्यातील २.५ मायक्रॉन आणि लहान आकाराचे कण जास्त हलके असल्याने हवेत जास्त काळपर्यंत तरंगत राहतात. असे तरंगताना माणसाच्या श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसापर्यंत पोहोचतात आणि खोकल्यापासून क्षयापर्यंत रोगास कारणीभूत ठरतात.
धुळीमुळे सिलीकॉसीस, अस्बेस्टोसीसच्या कणामुळे आणि कापडाच्या धाग्यामुळे फायब्रोसीस असे फुफ्फुसाचे रोग होतात. क्वचितप्रसंगी असे आजारपण कॅन्सरवर पोहोचल्याची उदाहरणे आहेत.
हवेतील ही धूळ कमी करण्याचा एक स्वस्त असा उपाय म्हणजे वनस्पतीच्या पानांचा धूलिकण स्थिरावण्यासाठी उपयोग करणे. यासाठी झाडाची पाने जमिनीस समांतर असल्यास जमिनीच्या दिशेने जाणारे कण पानांवर स्थिरावतात. पानातून बाष्पाचे उत्सर्जन होत असल्याने पाने ओलसर असल्यास धुळीचे कण पानाला चिकटून बसतात. हवेतील धूळ पानावर थांबल्याने त्या प्रमाणात हवेची शुद्धता सुधारते. झाडावर जेवढी पाने जास्त तेवढय़ा प्रमाणात हवेतील धूळ कमी होते. पानांवर सूक्ष्म केस अथवा खवले असतील तर उत्तमच, कारण पानावर स्थिरावलेली धूळ घसरून पुन्हा हवेत येत नाही. पानाचा देठ आखूड आणि जाड असेल तर पानावर साठलेल्या धुळीच्या वजनामुळे पान तुटून पडत नाही.
साठलेल्या धुळीच्या थरामुळे पानाचे, पर्यायाने झाडाचे नुकसान होऊ शकते. उन्हाच्या उष्णतेची तीव्रता वाढून पान करपते. धुळीचे कण काढून टाकताना पानाच्या पृष्ठभागास इजा होते.
मोठी, पसरट, जाड, आखूड देठाच्या आणि पृष्ठाभागावर लव असलेल्या शेकडो पानांनी बहरलेला सदाहरित आणि सर्वत्र आढळणारा वृक्ष म्हणजे वड.
पावसाळा संपल्यापासून धूळ पानावर साठत राहते. ऑक्टोबर ते मे या काळात वडाच्या पानावर पडलेली धूळ दरमहा वाढत गेल्याची नोंद झाली आहे. साधारणपणे दहा मीटर उंच आणि दहा मीटर व्यासाचा पानांचा पसारा असलेल्या वडाच्या झाडावर मे महिन्यापर्यंत कित्येक किलोग्राम धूळ स्थिरावली असल्याचे मोजले गेले आहे.
– प्रा. शरद चाफेकर , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
धूलिकणांमुळे आच्छादलेली वडाची पाने
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा