सूर्य हा वर्षभरात ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर एका भासमान मार्गावरून फिरत असतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या या भ्रमणात २१ मार्च आणि २३ सप्टेंबरच्या सुमारास तो अनुक्रमे वसंत संपात आणि शरद संपात या दोन परस्परविरोधी (व्यासान्त) काल्पनिक बिंदूंपाशी येतो. सूर्याने वसंत संपात बिंदू पार केल्यानंतर दिवस रात्रीपेक्षा मोठा होऊ लागतो व उन्हाळ्याला सुरुवात होते; तर शरद संपात बिंदू पार केल्यानंतर रात्र दिवसापेक्षा मोठी होऊन हिवाळ्याला सुरुवात होते. ऋतुमानाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे हे दोन बिंदू स्थिर नसून ते अत्यल्प गतीने पश्चिमेकडे सरकत आहेत. या सरकण्याला संपात बिंदूंचे परांचन म्हटले जाते. या परांचनाचा शोध इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात हिप्पार्कस या ग्रीक खगोलज्ञाने लावला.
हिप्पार्कस याने अनेक ताऱ्यांची स्थाने अचूकरीत्या नोंदवली होती. त्याबरोबर त्याने सूर्याच्या भ्रमणमार्गालगत वसलेल्या चित्रा ताऱ्याचे शरद संपात बिंदूपासूनचे अंतरही मोजले. यासाठी त्याने चंद्रग्रहणाची मदत घेतली. चंद्रग्रहणात सूर्य-पृथ्वी-चंद्र अशी रचना घडून येते. या वेळी सूर्य वसंत संपात बिंदूपासून जितके अंश दूर असतो, तितकेच अंश चंद्र हा शरद संपात बिंदूपासून दूर असतो. त्यामुळे चंद्रग्रहणात एखाद्या ताऱ्याचे चंद्रापासूनचे अंतर मोजले, की त्या ताऱ्याचे शरद संपात बिंदूपासूनचे अंतर मिळू शकते. हिप्पार्कसच्या निरीक्षणांच्या वेळी चित्रा तारा हा शरद संपात बिंदूपासून सुमारे सहा अंश दूर होता. त्याअगोदर दीडशे वर्षांपूर्वी टिमोचारीस या ग्रीक खगोलज्ञाने केलेल्या अशाच प्रकारच्या निरीक्षणांत, चित्रा तारा हा त्या वेळी शरद संपात बिंदूपासून सुमारे आठ अंश दूर असल्याचे हिप्पार्कसला दिसून आले. दीडशे वर्षांच्या काळात चित्रा ताऱ्याच्या स्थानांत दोन अंशांचा फरक पडला होता.
तारे हे स्थिर असतात. त्यामुळे चित्रा तारयाच्या स्थानात निर्माण झालेला हा फरक ताऱ्यांच्या नव्हे तर, संपात बिंदूंच्या सरकण्यामुळे झाला असल्याचे, हिप्पार्कसने ओळखले. संपात बिंदूंचे दीडशे वर्षांच्या काळातील दोन अंशांचे हे सरकणे, संपात बिंदूंची सूर्याच्या भ्रमणमार्गावरून ३६० अंशांची प्रदक्षिणा पूर्ण होण्यास २७,००० वष्रे लागत असल्याचे दर्शवीत होते. हिप्पार्कसने बावीस शतकांपूर्वी काढलेले परांचनगतीचे हे मूल्य स्वीकृत मूल्याच्या अगदी जवळ आहे.
संपात बिंदूंचे हे सरकणे पृथ्वीच्या अक्षाच्या दिशाबदलामुळे होत असते.
– डॉ. राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org