‘काल’ या मूलभूत राशीचे मापन करण्यासाठी पूर्वी अतिसूक्ष्म काळासाठी परमाणू, त्रसरेणू, निमिष, क्षण अशी एकके होती आणि मोठय़ा कालमापनासाठी वर्ष, कल्प, युग, महायुग अशी एकके होती. आज मात्र सर्व स्तरांवर आणि पद्धतींमध्ये कालमापनासाठी सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष ही एकके वापरली जातात. कालमापनासाठी ‘सेकंद’ हे सर्वच पद्धतींमध्ये सामाईक आहे.
मध्य सौरदिनाचा ८६४०० भाग म्हणजे एक सेकंद होय. पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास एक दिवस लागतो. पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर असतो, त्या भागावर सूर्यकिरणे पडतात. सूर्यकिरणे त्या भागावर जितका काळ असतात, तो कालावधी म्हणजे त्या ठिकाणचे ‘दिनमान’ आणि सूर्यकिरणे ज्या काळात नसतात तो कालावधी म्हणजे त्या ठिकाणचे ‘रात्रमान’. एक पूर्ण दिनमान आणि एक पूर्ण रात्रमान म्हणजे ‘एक दिवस’ होय. अशा वर्षांतील सर्व दिवसांच्या सरासरी कालावधीला ‘मध्य सौरदिन’ असे म्हणतात. मध्य सौर दिनाचा कालावधी चोवीस तासांचा असतो. प्रत्येक तासाची ६० मिनिटे आणि प्रत्येक मिनिटात साठ सेकंद असतात. म्हणून एक दिवसाचा काळ म्हणजे
६० ७ ६० ७ २४ = ८६,४०० सेकंदांचा कालावधी होय.
स्वत:च्या अक्षाभोवती परिवलन करण्यासाठी पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला ‘दिवस’ म्हटले जाते. सुमारे ३६५.२५ दिवसांमध्ये सूर्याभोवती परिक्रमा पूर्ण करते. या कालावधीला आपण ‘वर्ष’ असे म्हणतो.
वेग मापनासाठी अंतर आणि काल या दोन्हींची माहिती असणे आवश्यक असते. पृथ्वीचा विषुववृत्तीय परीघ सुमारे ४०,०७५.०१७ किलोमीटर आहे. ती स्वत:च्या अक्षाभोवती २४ तासांत एक भ्रमण पूर्ण करते. म्हणजे पृथ्वीच्या विषुववृत्तावरील प्रत्येक िबदू ताशी १६६९.७९ किलोमीटर वेगाने भ्रमण करत असतो. तरीही पृथ्वीवरील सर्व वस्तू परस्पर सापेक्ष स्थिर आहेत असे म्हटले जाते.
पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे १४,७१,६६,४६२ किलोमीटर आहे. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा वर्तुळाकार आहे, असे मानले तर त्या कक्षेचा परीघ सुमारे ९२,४२,०५,३८१ कि.मी. आहे. पृथ्वी दर दिवशी २५,३०,३३६ कि.मी. प्रवास करते. म्हणजे हा वेग सुमारे २९.२९ कि.मी. प्रतिसेकंद आहे.
– प्रा. दिलीप गोटखिंडीकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
गोपीनाथ माहान्ति-साहित्य :
गोपीनाथ माहान्ति म्हणाले होते की, ‘‘जीवनामध्ये मी जे काही पाहिले, अनुभवले, त्याची प्रतिक्रिया म्हणून व माझ्या हृदयातील नैसर्गिक सहृदयता, सहानुभूती, यामुळे मी मुख्यत: समाजाची अनेक प्रकारे आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक शोषण, क्रूरता, अत्याचार, निर्दयता यांची निर्भर्त्सना केली आहे. ढोंग, पाखंड, भ्रष्टाचार, लबाडी यांचा बुरखा फाडला आहे. आणि म्हणूनच आदिवासी, हरिजन, मजूर, किसान, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि अन्य दलित समाज-ज्यांच्याकडे कधी ‘माणूस’ म्हणून पाहिले गेले नव्हते- हाच माझ्या लेखनाचा विषय झाला.’’ आत्तापर्यंत त्यांच्या ४५ साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून, ‘परजा’ (१९४५), ‘अमृतर संतान’(१९४७) आणि ‘माहीमहाल’ (१९६४). या कादंबरीलेखनाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. ‘परजा’ ही कोरापुट जिल्ह्य़ातील आदिवासींच्या जीवनाचे – सरळपणे जगूनही अस्तित्वासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांचे आणि विकल मन:स्थितीचे चित्रण चित्रण करणारी ४४५ पानी कादंबरी. परजा परिवाराच्या दु:खाची कथा सांगतानाच आदिवासींची सामाजिक स्थिती, त्यांची जगण्याची साधने, अंधविश्वास यांचेही चित्रण त्यात आहे. सूडाची भावना का निर्माण होते आणि त्याला समजून कसे घेतले जात नाही या मानवी भावनांचे चित्रण करणारी ही अंतर्मुख करायला लावणारी कादंबरी. असाच आशय बंगाली लेखिका महाश्वेतादेवी व मराठी लेखिका गोदावरी परुळेकर यांच्या साहित्यात इतक्याच उत्कटपणे दिसून येतो.
‘अमृतर संतान’ १९५५ मध्ये या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. पण १९७३ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘माटीमटाल’ या कादंबरीचा विषय आदिवासी जीवन नसून त्याला ओरिसातील ग्रामीण जीवनाची पाश्र्वभूमी आहे. गोपीनाथ माहान्ति यांच्या एकूणच साहित्यनिर्मितीत तीन टप्पे दिसतात- एक आहे तो- आदिवासी जीवन चित्रणाचा. लेखकाने स्वत: घेतलेल्या अनुभवातून लिहिलेल्या या प्रकारच्या कादंबऱ्या आहेत. ‘परजा’, ‘दादी बुढा’, ‘अपहंच’, ‘अमृतर संतान’ इ.
दुसऱ्या टप्प्यातील लेखनात शहरी जीवनाचे चित्रण आहे. उच्च व कनिष्ठ, सुशिक्षित-अशिक्षितवर्गातील जीवनाचे तुलनात्मक चित्रण आहे. उदा. ‘सपन माटि’, ‘दानापानी’, ‘शरत बांबुकगली’, ‘राहुर छाय’ इ.
तिसरा प्रवाह आहे- ग्रामीण लोकजीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘माटीमटाल’सारख्या कादंबऱ्या.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com