प्राचीन काळी मोजमापनासाठी जी एकके उपयोगात आणली जात होती, त्यांपकी ‘निमिष’ हे कालमापनाचे एकक आणि ‘योजन’ हे विस्थापनाचे एकक वापरात होते.
ऋग्वेदामध्ये प्रकाशाच्या गतीबद्दल एक श्लोक आहे-
तथाच स्मर्यते।
योजनानां सहस्त्रं द्वे द्वे शते द्वेच योजने।
एकेन निमिषाध्रेन क्रममाण नमोस्तुते।
सूर्याचे तेज (म्हणजे उष्णता आणि प्रकाश ऊर्जा) पृथ्वीवरील उपासकाकडे दर अध्र्या निमिषाला दोन हजार दोनशे दोन योजने या वेगाने विस्थापित होते, असे श्लोकात म्हटले आहे.
एक निमिष म्हणजे सुमारे (१/८.७५ सेकंद) ०.११४२८६ सेकंद. अध्र्या निमिषात २२०२ योजने म्हणजेच सूर्यापासून पृथ्वीकडे येत असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वेग ४४०४ योजने प्रतिनिमिष इतका आहे. एक ‘योजन’ म्हणजे सुमारे ९.०६२५ मल किंवा सुमारे १४.६८१२५ किलोमीटर. म्हणजे एका निमिषात प्रकाश ६४६५६.२२५ किलोमीटर या वेगाने प्रवास करतो. याप्रमाणे आकडेमोड करून असे म्हणता येते की, त्या काळी प्रकाशाचा वेग सुमारे २९९७२५.९२ किलोमीटर प्रतिसेकंद असा मानला जात असे. आज प्रकाशाचा वेग सुमारे तीन लाख किलोमीटर प्रतिसेकंद आहे, असे निश्चित करण्यात आलेले आहे.
‘निमिष’ हे प्राचीन काळचे कालमापनाचे एकक. निमिषकाल म्हणजे डोळ्याची पापणी मिटून उघडण्यासाठी लागणारा अंदाजे काळ. भारतीयांनी वेळेच्या प्रमाणाची आखणी अशी नसíगकपणावर बेतली होती. अर्थात यात ‘सेकंदा’एवढी निश्चितता व अचूकता नाही.
निमिष या वेळेच्या प्रमाणाबाबत बरीच भिन्न कालावधीची कोष्टके भारतीय संस्कृतीतून सापडतात. भारतीय ज्योतिषशास्त्राचा संबंध घेतला तर एक निमिष म्हणजे अंदाजे ४/४५ सेकंदाचा (०.०८८८८ सेकंद) वेळ ठरतो. भारतीय संगीतग्रंथांचा संबंध घेतला तर एक निमिष म्हणजे अंदाजे १/३२ सेकंदाचा (०.०३१२५ सेकंद) वेळ ठरतो. हा फरक फारच मोठा आहे. नाटय़शास्त्रानुसार एक निमिष म्हणजे अंदाजे १/२५ सेकंदाचा (०.०४ सेकंद) वेळ ठरतो. नाडीचे ठोके मोजण्यानुसार एक निमिष म्हणजे सरासरी १/१८ सेकंदाचा (०.०५५५ सेकंद) वेळ ठरतो.
ज्योतिष, संगीत, नाटय़ आणि नाडी अशा शास्त्रांच्या गरजा भिन्न असतात आणि त्यानुसार ‘निमिष’ या वेळेच्या प्रमाणाची मांडणी भिन्न सांगितलेली आहे.
– प्रा. दिलीप गोटखिंडीकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
वाग्देवीचे वरदवंत
‘हा अनंताच्या सामंजस्याचा तर्कसंगत परिणाम’ ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात द. रा. बेन्द्रे म्हणाले, ‘‘मीदेखील कन्नड कविश्रेष्ठ पम्प आणि कुमारस्वामी यांच्या जन्मभूमीतील धारवाडमधील आहे. जिथे प्रथम मोक्षगामी बाहुबली गोम्मटच्या एकामागोमाग एक अशा प्रतिमा उभ्या केल्या गेल्या, त्या प्रदेशात माझा जन्म झालेला आहे.
‘नाकुतन्ती’ अर्थात ‘चौतारा’ हा माझा एकोणिसावा काव्यसंग्रह आहे. या संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवडण्यात आलंय, ही भाग्याची गोष्ट आहे. माझं सौभाग्य असं की, उडिसाचे माझे एक लेखकबंधू यांचाही या सन्मानात समावेश आहे. त्यामुळे मला खूपच आनंद झालेला आहे. ही काही नवीन गोष्ट नाहीए. यापूर्वीही कर्नाटकचे डॉ. कु. वें. पुटप्पा आणि गुजरातचे डॉ. उमाशंकर जोशी यांच्याहीमध्ये हा पुरस्कार सहविभाजित झालेला होता. या पुरस्काराने भारतमातेच्या सन्मानित दहा पुत्रांमध्ये माझाही समावेश झालेला आहे.
माझ्या कल्पनेप्रमाणे हा पुरस्कार मिळवणारा ‘मीच’ असा पहिला लेखक आहे की, जो आपल्या मातृभाषेमध्ये लिहिण्याऐवजी वेगळ्या भाषेत लिहीत आहे. माझ्यापेक्षा कन्नड भाषिकांनाच अधिक आनंद झालेला आहे. मला १९७३ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ही काही आकस्मिक अशी घटना नाही किंवा हा योगायोग नाही. हा तर सृष्टितंत्राच्या बरोबर, त्या अनंताच्या सामंजस्याचा तर्कसंगत असा परिणाम आहे. मी कन्नडमध्ये अवश्य लिहितो, पण माझी मातृभाषा मराठी आहे. संस्कृत या दोन्हीच्या विरोधी नाही, आणि इंग्रजीचा तरी अपवाद का करायचा? इंग्रजीत २६ वर्ण आहेत आणि संस्कृतमध्ये ६४ वर्ण आहेत- यात काही संदेह नाही. पण वर्णव्यवस्था तर विश्वव्यापी आहे.
हे सगळं विश्व एकच आहे. जीवन, मनुष्य, संपूर्ण मानवजात ही एकच आहे. हेच एक मात्र सत्य आहे. हीच वास्तविकता आहे. आम्हाला याचाच शोध घ्यायचा आहे आणि मग पुन्हा याचाच साक्षात्कार घडवायचा आहे. सत्याचाच साक्षात्कार घडवला जाऊ शकतो. जे असत्य आहे ते निराशेला, दु:खाला जन्म देते. जोपर्यंत आपण या सत्यावर प्रेम करीत नाही, याला आपलं जीवन बनवत नाही तोपर्यंत आपल्याला स्वत:चं आणि दुसऱ्याचं भलं करू शकण्याची शक्ती प्राप्तच होणार नाही. जीवनाची हीच दिशा आणि हेच त्याचं रूप आहे. जे आम्हाला खऱ्या सौंदर्याचं दर्शन घडवू शकेल आणि जीवन आनंदमय बनवू शकेल. धरतीवर आणि मानवामध्ये असं काही अवश्य आहे की, जे एक नवी जीवनदृष्टी प्रदान करतं. त्यासाठी लोकांनी स्वत:भोवती बनलेलं आवरण फाडून फेकून द्यायला हवं. आपल्या इच्छाशक्तीने आपण ते नष्ट करू शकतो. जर इच्छा असेल तर आत्मज्ञान प्राप्त केलं जाऊ शकतं.’’
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com