गांडूळ खतात गांडुळाची विष्ठा, अंडी व लहान पिल्ले, सूक्ष्म जीवाणू आणि नसíगकरित्या कुजलेले सेंद्रिय पदार्थ यांचा समावेश असतो. माती, शेण आणि वनस्पतीजन्य पदार्थ हे गांडुळाचे खाद्य असल्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया होऊन मृद्गंधयुक्त विष्ठा बाहेर पडते. यांत पिकांना पोषक अन्नद्रव्ये असतात.
गांडूळ खत तयार करण्यासाठी निवडलेली जागा जमिनीपेक्षा थोडी उंच असावी. या ठिकाणी ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी ३५चौरस फुटाची झोपडी बांधावी. झोपडी बांबूच्या ताटय़ांनी चारही बाजूंनी बंद करावी.
खतनिर्मितीसाठी शेतातील टाकाऊ पदार्थ (उसाचे पाचट, गव्हांडा, तुरीच्या काडय़ा, सूर्यफुलाचे कुटार इ.) किंवा घरातील टाकाऊ भाजीपाला यांचा १० सेमी जाडीचा थर देऊन पाणी शिंपडावे, जेणेकरून ४० ते ५० टक्के ओलावा टिकून राहील. शेणखत, स्लरी किंवा कंपोस्ट खताचा सात ते दहा सेमी जाडीचा थर देऊन पुन्हा पाणी शिंपडावे. ताजे शेण वापरू नये, कारण त्यातून निघणारा वायू गांडुळास हानिकारक असतो. यावर १००० गांडुळे सोडावीत. पुन्हा तीन ते पाच सेमी जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणखताचा थर देऊन पाणी शिंपडावे. त्यावर काडीकचरा, गवत, शेतातील कचरा इ. सेंद्रिय पदार्थाचा थर (३० ते ४० सेमी) देऊन पोते किंवा गोणपाट ओले करून त्यावर झाकावे. यावर दिवसातून दोनतीन वेळा नियमित पाणी शिंपडावे. त्यामुळे आद्र्रता टिकून राहाते. जवळपास दीड-दोन महिन्यानंतर गांडूळ खत तयार होते. यानंतर झाकलेले पोते काढावे. खताचे ढीग करावे. त्यामुळे खत सुकते आणि गांडुळे तळाच्या थरात जातात. गरजेनुसार हे खत चाळणी करून शेतात टाकावे.
शेतात खत टाकल्यावर जमिनीतील ओलावा कायम ठेवावा. गांडुळाचे नसíगक शत्रू बेडूक, साप, मुंग्या, कोंबडय़ा, पक्षी, उंदीर यांपासून संरक्षण करावे.
गांडूळ खतामुळे मातीचे भौतिक गुणधर्म सुधारतात. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते. जमीन सच्छिद्र केल्यामुळे मुळांना प्राणवायू मिळतो आणि पाण्याचा निचरा होतो. जमिनीतील उपयोगी जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन ते क्रियाशील राहतात. पिकाची रोग व कीड प्रतिकारकशक्ती वाढते. जमिनीचा सामू सुधारतो आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
जे देखे रवी.. – आमची काम्यकर्मे
परवा माझा एक विद्यार्थी आला. यावर्षीच्या आमच्या परिषदेत ‘प्लास्टिक सर्जरी खतरे में है’ या विषयावर परिसंवाद आहे. मला म्हणाला, ‘तुमचे काही विचार सांगा.’ माझे डोके वाकडे असल्यामुळे मी एका क्षणात त्याला विचारले, ‘खतरे में क्या है? प्लास्टिक सर्जरी की प्लास्टिक सर्जन्स?’ गडी मोठा चाणाक्ष. त्यामुळे त्याची टय़ूब एकदम पेटली. म्हणाला, ‘कळले. माझे काम झाले. आता भाषण उतरवतो.’ त्याचे भाषण संगणकामार्फत मला पोहोचले तो म्हणतो, ‘आपल्या देशात अदमासे १२०० प्लास्टिक सर्जन्स आहेत. म्हणजे दहा लाख लोकांमागे एक. त्यातले ७५ टक्केहून अधिक मोठय़ा शहरात असले तरी ७५ टक्केहून अधिक प्लास्टिक सर्जरी लागणारे व्यंग रुग्ण शहराबाहेर आहेत. असले आकडे नेहमीच प्रसिद्ध होतात. पण शहरांमधली गोम अशी आहे की, इथले प्लास्टिक सर्जन्स केवळ सौंदर्यप्रसाधक शस्त्रक्रिया करण्यासाठी हपापले आहेत.’
आता माझी निरीक्षणे नोंदवतो. आर्थिक उदारीकरणामुळे काही लोकांचे पैसे वर आले आहेत. या पैशाला इंग्रजीत Disposable Income असा गोंडस शब्द आहे. ही मंडळी फावल्या वेळात आरशात स्वत:कडे बघत स्वत:च्या शरीरातले नसलेले दोष शोधण्यात मग्न आहेत. यात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. माध्यमातून लाखात एक अशी कमनीय कंबर, साजेसे उरोज आणि आकर्षक चेहरा असलेल्या बायकांची चित्रे बघून या एकदमच प्रभावित होतात. नुसता मेकअप आता पुरत नाही. ज्याच्यावर मेकअप लावतात किंवा ज्याच्यावर अंगवस्त्रे चढवतात ती मुळातली इंद्रियेच आता यांना बदलून हवी आहेत.
या प्लास्टिक सर्जरीच्या फळबाजारात अमाप नफा आहे. एका त्वचारोपणाच्या शस्त्रक्रियेमागे जर पाच हजार मिळत असतील तर असल्या प्रकारच्या शस्त्रक्रियेला पन्नास हजार मिळतात. या फळबाजाराच्या जाहिराती सर्व माध्यमांतून झळकतात आणि त्या जाहिराती वेळ घालवण्यासाठी तात्पुरती मैत्रीण हवी का असल्या जाहिरातींच्या शेजारी छापल्या जातात. फार मोठी गोची अशी आहे की, पूर्वी प्लास्टिक सर्जरीचा मक्ता असलेल्या या शस्त्रक्रियेमध्ये इतर डॉक्टरही आता घुसू लागले आहेत. मला विचारले तर या शस्त्रक्रियांना फारसे डोके लागत नाही आणि या बिनडोक व्यक्तींवर केल्या जातात, त्यातच ही गिऱ्हाइके आज हे करू, उद्या ते करू असे म्हणत बाजारात हिंडत असतात. त्यामुळे बाजार बहरला आहे. त्यामुळे हे इतर डॉक्टर आमच्या पोटावर पाय आणतात अशी बोंब सुरू झाली आहे. गुळाच्या ढेपेला मुंग्या लागणारच त्यातला हा प्रकार. आणि मग ‘प्लास्टिक सर्जरी खतरे में है’ असे परिसंवाद घडतात. आमची ही कमनीय होऊ बघणाऱ्या
स्त्री-पुरुषांसंबंधातली काम्यकर्मे.
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – वातविकार : भाग ५
अनुभविक उपचार – वातकंटक (मुरगळा) – आरोग्यवर्धिनी, लाक्षादिगुग्गुळ, सिंहनादगुग्गुळ प्र. ३ गोळ्या २ वेळा. रात्री सुजेच्या जागी लेप गोळीचा गरम दाट लेप लावावा. किमान २ तास ठेवावा. गरम पाण्यात मीठ टाकून त्याने सूज, मुरगळ्याचा भाग शेकावा. मुंग्या येणे – चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, सुवर्णमाक्षिकादिवटी प्र. ३ गोळ्या २ वेळा बारीक करून घ्याव्यात. मधुमेह लक्षण असल्यास मधुमेहवटी ३ गोळ्या २ वेळा अधिक औषध म्हणून घ्याव्यात. लठ्ठ व्यक्तींनी त्रिफळागुग्गुळ ३ गोळ्या २ वेळा घ्याव्यात. रक्तदाबवृद्धि विकारात मुंग्या येत असल्यास शृंग गोक्षुरादिगुग्गुळ आरोग्यवर्धिनी सुवर्णमाक्षिकादिवटी प्र. ३ गोळ्या बारीक करून सोबत रसायनचूर्ण १ चमचा सकाळी घ्यावे. महानारायण तेलाने हातपायांना खालून वर सकाळ सायं. मसाज करावे.
रुग्णालयीन उपचार – धातुक्षय – रुग्णास पूर्ण विश्रांती द्यावी. वेळेवर आहार, माफक विहार, वेळेवर झोप यावर लक्ष ठेवावे. भूक नसल्यास निरुहबस्ती, तर आहारात अग्निदीपक, पाचक, बल्य, पौष्टिक व रसायन गुणाच्या पदार्थाची कटाक्षाने योजना करावी. उदरवात – तीळ तेल वा करंजेल तेल पिचकारी; निरुहबस्ति किंवा काढय़ाचा एनिमा योजावा. अंगमर्द – तीळतेल, शतावरीसिद्धतेल वा महानारायण तेलाने सर्वागाला मसाज करावा. सोसवेल असा पेटिकास्वेद वा अवगाह स्वेद (टबबाथ) घ्यावा. मानेचे विकार – तज्ज्ञांचे देखरेखीखाली हातास, पाठीस, मानेच्या मणक्यास मसाज करावे. दाट, गरम लेप नेमक्या जागी लावावा. फळीवर किमान अर्धातास झोपून राहावे. कंपवात- सर्वागाला शतावरीसिद्ध तेलाने मसाज करावा. सुखासीन राहावे. पूर्ण विश्रांती घ्यावी. चिंता, राग, क्षोभ होईल असे विषय टाळावेत. अर्दित – शिरोबस्ति, त्यानंतर डोक्यावर धारास्वेद करावा. ऋतु व रोगपरत्वे, तेल किंवा ताकाची सुखोष्ण धार डोक्यावर सोडावी. वातकंटक – सुजेच्या जागी जळवा लावून रक्त काढावे. मुंग्या येणे – सर्वागाला महानारायण तेलाने मसाज करवून पेटिकास्वेद किंवा अवगाह स्वेद घ्यावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २७ जून
१८०४ > निबंधकार, पत्रकार, साहित्यिक-समीक्षक, फर्डे वक्ते शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म. ‘काळ’ साप्ताहिकाचे संस्थापक, वा ‘काळ-कर्ते’ ही त्यांची ओळख. ‘एका खडी फोडणाऱ्याची गोष्ट’, ‘आम्रवृक्ष’, ‘एक कारखाना’ आदी कथा, ‘गोविंदाची गोष्ट’, ‘विंध्याचल’ या कादंबऱ्या, ‘पहिला पांडव’ ‘मानाजीराव’, आदी ९ नाटके, ‘अहिल्याजारकाव्य’, ‘तर्कसंग्रहदीपिका’, ‘मराठय़ांच्या लढायांचा इतिहास’, आदी सुमारे २० संकीर्ण पुस्तके आणि ‘काळ’मधील निवडक निबंध ही त्यांची ग्रंथसंपदा. किलरेस्करांच्या ‘सं. सौभद्र’ नाटकाचे त्यांनी संस्कृत भाषांतर केले होते.
१९६८ > शिक्षणतज्ज्ञ, बालवाङ्मयकार महादेव काशीनाथ कारखानीस यांचे निधन. कारखानीस यांनी शिक्षकांसाठी, अध्यापन सुकर व्हावे यासाठी ‘शिक्षक आणि शिक्षण’, ‘अंकगणित कसे शिकवावे’, ‘व्याकरण कसे शिकवावे’ यांसह ज्ञानरंजनपर २० पुस्तके लिहिली होती.
१९८९ > संस्कृतमधील ज्ञान अर्वाचीन मराठीत आणण्यासाठी ‘प्राचीन काव्यशास्त्र’, ‘कालिदासाची नाटके’, ‘प्राचीन भारतीय राजनीती’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ आदी पुस्तके लिहिणारे संस्कृतचे गाढे अभ्यासक रमाकांत पंढरीनाथ कंगले यांचे निधन.
– संजय वझरेकर