गणिती आणि हवामानतज्ज्ञ अशा एडवर्ड नॉर्टन लॉरेन्झ या अमेरिकन शास्त्रज्ञाचे योगदान आधुनिक हवामान क्षेत्रात उच्च कोटीचे मानले जाते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात (१९४२-४५) अमेरिकेच्या लष्करात हवामानतज्ज्ञ अशी भूमिका पार पाडली. त्यांचे मूळ शिक्षण गणितातले, पण नंतर त्यांनी मॅसेच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून हवामानशास्त्रातही पदव्या प्राप्त केल्या आणि शेवटपर्यंत त्या संस्थेत हवामानशास्त्राचे अध्यापन आणि संशोधन केले.

१९५०च्या दशकापर्यंत हवामानाच्या अंदाजासाठी रेषीय सांख्यिकी प्रतिकृती वापरल्या जात असत. तथापि हवामान अनेक प्रकारचे घटक आणि त्यांच्या परस्पर गुंतागुंतीवर अवलंबून असते. तरी लॉरेन्झ यांनी नवीन अरेषीयगणिती पद्धती हवामान अंदाजासाठी विकसित केल्या. त्या संदर्भात त्यांचा १९६३ साली प्रसिद्ध झालेला एक लेख फार महत्त्वाचा मानला जातो. त्यात लॉरेन्झ यांनी असे दाखवले की, दोन स्थिती सुरुवातीस अगदी सारख्या असल्या तरी त्यात अरेषीय रीतीने बदल घडत गेल्यास काही काळाने त्या दोन्हींत कुठलेही साम्य आढळत नाही. हवामानातही सहसा असेच घडत असल्याने हवामानाचा अंदाज चुकू शकतो.

वातावरणात हवा कशी फिरते याबाबत लॉरेन्झनी काही साधी समीकरणे मांडली आणि त्यावर विशिष्ट प्रकारची पुनरावृत्ती गणिती प्रक्रिया केल्यास अतिशय गतिमान व व्यामिश्र सूत्रबंध तयार होतात असे दाखवले, ज्यांना आता ‘लॉरेन्झ आकर्षक’ असे म्हटले जाते. त्यांच्या सदर कामाने ‘गोंधळ सिद्धांत’ या एका नव्या गणिती विषयाला सुरुवात झाली, ज्याचा वापर हवामान आणि अनेक क्षेत्रांत केला जातो. त्याच कामाचा विस्तार करून लॉरेन्झनी १९६९ मध्ये असे दाखवले की जगातील एका भागात घडलेल्या एखाद्या क्षुल्लक नसíगक घटनेमुळेदेखील त्यापासून अतिशय दूर असलेल्या भागातील हवामानावर काही काळाने परिणाम होऊ शकतो. त्याला ‘फूलपाखरू प्रभाव’ असे म्हटले जाते.

उदा. दक्षिण अमेरिकेच्या जंगलात एका फूलपाखराने त्याचे पंख सामान्यपेक्षा जास्ती वेळा फडफडवले तर भारतातील पावसावर परिणाम घडू शकतो. सारांश, म्हणजे एका आठवडय़ापलीकडचे हवामान अंदाज सहसा चुकीचे ठरू शकतात.

लॉरेन्झ यांना त्यांच्या हवामान क्षेत्रातील भरीव संशोधन कार्यासाठी अनेक मान मिळाले. जसे की क्राफोर्ड पुरस्कार (१९८३), क्योटो पुरस्कार (१९९१), लोमोनोझोव्ह सुवर्णपदक (२००४). त्यांचे संशोधन सतत चालू होते. ९० व्या वर्षी मृत्युपूर्वी एक आठवडा त्यांनी एक शोधलेख सहलेखित केला होता हे विशेष!

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

तकळ्ळी यांची ग्रंथसंपदा

तकळ्ळी शिवशंकर पिलै यांच्या बालपणी त्यांच्या तकळ्ळी  गावात सुरू असलेल्या डाव्या चळवळी त्यांनी पाहिल्या होत्या. तेव्हा त्यांनी मार्क्‍सवादाचा सखोल अभ्यास केला. काही काळानंतर ते मार्क्‍सवादापासून लांब गेले व गांधीवादाकडे वळले. पुढे वकिली व्यवसाय करीत असताना गरीब कोळी, भूमिहीन शेतमजूर व तळागाळातील लोकांशी त्यांचा अत्यंत जवळून संबंध आला. त्या लोकांच्या हालअपेष्टा, दु:ख, दारिद्रय़ पाहून शिवशंकरांचे मनही अस्वस्थ झाले. अंतर्मुख होऊन विचार करू लागले. या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या साहित्यावर पडलेला दिसतो. शिकत असतानाच देशभर चाललेल्या स्वातंत्र्यचळवळीशी त्यांचा संबंध आला. अटकसत्र चुकविण्यासाठी ते भूमिगत झाले व भंग्याच्या वस्तीत लपून राहिले. त्या वस्तीतील लोकांची दुर्दशा त्यांनी पाहिली आणि या अनुभवावर आधारित ‘तोट्टयुडे माकन’ (भंग्याचे पोर) ही कादंबरी १९४५ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीचा मराठी अनुवाद लीला बावडेकर यांनी केला आहे. तसेच धनश्री हळबे यांनी याच कादंबरीचा केलेला अनुवाद ‘चिनगारी’ या नावाने प्रकाशित झाला आहे.

तकळ्ळींनी वयाच्या १७ व्या वर्षी लिहिलेली पहिली कथा ‘साधूकल’ (निर्धन) ही १९२९ मध्ये नायर सव्‍‌र्हिस सोसायटीच्या सव्‍‌र्हिस या नियतकालिकात प्रकाशित झाली होती. ‘पुथुमलार’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९३५ मध्ये प्रकाशित झाला. पण या कथासंग्रहाअगोदर त्यांच्या ‘प्रतिफलम’ आणि ‘पतित पंकजम्’ या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. आजपर्यंत त्यांनी ३५ कादंबऱ्या आणि जवळजवळ ८०० कथा लिहिल्या आहेत. त्याशिवाय एक नाटक, एक प्रवासवर्णन व तीन भागांत आत्मकथाही त्यांनी लिहिली आहे. पत्नीच्या मोलाच्या सहकार्यामुळेच मी एवढा साहित्य प्रपंच उभा करू शकलो- असं नम्रपणे ते सांगतात. १९३४ मध्ये प्रतिफलम ही कादंबरी प्रकाशित होताच वादविषय बनली. आपल्या भावाच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या देहाचा व्यापार मांडणाऱ्या एका मुलीची ही कथा आहे. पतित पंकजम् ही गुणवती या मुलीची कथा आहे. ती वयाच्या बाराव्या वर्षीच सामाजिक नैतिकतेच्या तथाकथित ठेकेदारांकडून वेश्या व्यवसायात ओढली जाते..

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com