संप्रेरकांच्या प्रभावाने स्त्री बीजकोषातील ओव्हीची वाढ होते. त्यामध्ये पिवळा बलक असतो. यांची पूर्ण वाढ झाल्यास त्या स्त्री बीजकोषापासून वेगळ्या होतात. ओव्हांची निर्मिती व वाढ सतत चालू असते. या ओव्हा (बलक) स्त्री बीजवाहिनीच्या पहिल्या भागाकडे आकर्षति होतात. कळपात कोंबडा असल्यास संयोगातून शुक्राणू स्त्री बीजवाहिनीच्या भागातून जात, पहिल्या नरसाळ्यासारख्या भागात साठवले जातात. ओव्हा या भागातून जात असताना जर शुक्राणू आणि ओव्हांचे मीलन झाले तर अंडी फलित होतात. अशा अंडय़ांना उबवल्यास त्यातून पिल्ले निघतात. कळपात कोंबडा नसल्यास शुक्राणू स्त्री बीजवाहिनीत उपलब्ध नसतात. त्यामुळे अंडे अफलित राहते. त्यातून पुढे पिल्ले निघत नाहीत.
स्त्री बीजवाहिनीत या फलित वा अफलित अंडय़ाचा प्रवास सुरू होतो. स्त्री बीजवाहिनाचे मुख्य सहा वेगवेगळे भाग असतात. बलक या स्त्री बीजवाहिनीच्या या भागांतून जात असताना त्यावर तेथील वेगवेगळ्या असंख्य ग्रंथींमधून पाझरलेले स्राव अंडय़ाचे आवरण तयार करतात. स्री बीजवाहिनीच्या अध्र्या भागात पहिल्या तीन तासांत पांढरा बलक तयार होतो. पांढऱ्या बलकाचे पातळ थर, घट्ट थर स्त्री बीजवाहिनीच्या मॅग्नम भागात तयार होतात. या क्रियेस साधारणत: सव्वातीन तास वेळ लागतो. यानंतर अंडे गर्भाशयात जाते.
अंडी गर्भाशयात आल्यास कठीण कवच तयार होते. कवचासाठी कॅल्शियम काबरेनेट आवश्यक असते. ते गर्भाशयात पाझरलेल्या ग्रंथीतून अंडय़ास मिळते. गर्भाशयात अंडे सर्वात जास्त वेळ म्हणजे २०-२१ तास राहते. कठीण कवचावर असलेल्या छिद्राद्वारे
पिल्लास शुद्ध हवेचा पुरवठा होतो. पूर्ण तयार झालेले अंडे गर्भनलिकेच्या शेवटच्या टोकाला येते. नंतर ते पुढे ढकलले जाऊन गुद्द्वारातून बाहेर ढकलले जाते. अशा प्रकारे एक पूर्ण अंडे तयार होण्यास कमीत कमी २५-२६ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे कोंबडी सतत तीन-चार दिवस अंडी देते आणि त्यानंतर एक दिवस विश्रांती घेते.

जे देखे रवी..  – स्फोटाची गोष्ट
प्रत्येक शब्द एक स्फोट असतो, त्यात वायू (एकदम) बाहेर पडतो. तो नीट बाहेर पडला तर स्पष्ट येतो, नाहीतर अस्पष्ट (अस्फुट). शब्दांशिवाय ध्वनी बाहेर पडतो तेव्हा त्याला हुंदका म्हणतात. हा स्फोट अडखळला तर तोतरे बोल होतात. जर टाळूला भेग असेल तर हवा नाकावाटे बाहेर पडते आणि गेंगाणे शब्द येतात. शेवटी स्फोट व्हायला बंदिस्त जागा लागते. वाफेचे इंजिन जसे दबावावर चालते, तसेच तोंडात हवा बंद करण्याचे काम टाळू करते. तिच्या मागच्या भागात एक स्नायू असतो, तो उठून गळ्याच्या मागच्या भागाला चिकटतो तेव्हा हा दाब तयार होतो.  म्हणूनच म्हाइंभटाने संकलित लीळा चरित्रात (बारावे शतक) टाळू, ओठ इत्यादींच्या यंत्राने उद्भवलेली वाणी ती ‘वैखरी’ असे म्हटले आहे. या वैखरीचा क्रमांक आहे चार; पण शब्दकला शिल्पकलेसारखी असते.
दगडातून मूर्ती करणारे सगळेच सारखे नसतात. कारण प्रत्येकात एक विशिष्ट जाण दडलेली असते. ती मेंदूत असते. पहिली वाणी असते. पोटाच्या नगाऱ्यात, इथे श्वासपटलाचा भाता असतो. हा स्वयंचलित असतो आणि आपल्यावरही अवलंबून असतो. या भात्यानेच हवेची हालचाल सुरू होते. पुढे दुसरी वाणी असते ‘पश्यंती’, म्हणजे कदाचित आसमंतातल्या संवेदनांचे स्वरूप समजून घेऊन शब्द बनण्याची दुसरी पायरी. तिसरी वाणी असते कंठात. इथून शब्दाचे प्राथमिक स्वरूप तयार होते आणि बाहेर पडण्याची वाट बघते. याला मध्यमा वाणी म्हणतात. मग या तिघांच्या साहाय्याने विचार बाहेर पडताना वैखरीचा स्फोट होतो. ं
परावाणीचा संबंध श्वास पटलाशी आहे. तो भाता चालूच असतो; परंतु ऐच्छिक तऱ्हेने वाढविता किंवा कमी करता येतो. वाणीच्या चैतन्याचे ते स्तोत्र असते म्हणून परावाणी महत्त्वाची. माणसाने मौनव्रत घेतले तर मग चैतन्याचा व्यय टळतो, कमी बोलून भागते हे कळते, वैखरी गप्प बसते. विचारच शेवटी बोलायला भाग पाडतात, म्हणून मग विचाराचे थैमानही शमते आणि कंठ स्थिरावतो. वैखरी, मध्यमा आणि पश्यंती या वाणी मग परतीचा प्रवास सुरू करतात. शब्द फेकण्यात होणारी पोटाच्या दुमदुमणाऱ्या नगाऱ्याची हालचाल कमी होते. एकंदरच शांत वाटते.
या परावाणीच्या कर्त्यांचा विषय म्हणजेच वाचा असते, असा उल्लेख ज्ञानेश्वर करतात; परंतु या स्फोटाच्या परतीच्या प्रवासाचे वर्णन सहाव्यात येते. ‘गुरू मौनामुळे कळतो. तो काही न बोलता स्वत:च प्रकट होतो. त्या गुरूला मी हे शब्दांच्या स्तोत्राचे लेणे घालत आहे.’ अशी बहारदार रचना ज्ञानेश्वरांनी केली आहे.
शेवटी शब्दांच्या पलीकडच्या प्रवासाचे वर्णन शब्दांनीच करावे लागते. ‘शब्देवीण संवादिजे’ शब्दांच्या संवादानेच समजावून सांगावे लागते.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  –  स्वप्ने
खूप खूप वर्षांपर्यंत माझ्याकडे ‘मला खूप स्वप्न पडतात; झोपेचे समाधान मिळत नाही; ही सगळी क्षणभराचीच स्वप्ने पहिल्या झोपेत पडत नाहीत तर उत्तररात्री पडतात; मग बराच काळ मी आढय़ाकडे बघत पडून राहतो. रात्रीच्या अपेक्षित शांत झोपेच्या काळातील किमान एक तास गमावतो.’ अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन क्वचितच रुग्ण यायचे. असे रुग्ण बहुधा वृद्धत्वाकडे झुकलेले असतात. आता मात्र स्वप्नांच्या वैतागवाडीमुळे कंटाळलेले रुग्ण वारंवार येत आहेत. तुमची आमची लाईफस्टाईल खूपच बदललेली आहे. एक काळ साधी राहणी, कमी प्राप्ती, व्याप कमी त्यामुळे चिंता कमी. तरुणाईमध्ये खंडित निद्रेचे आजार क्वचितच असायचे.
आता तुमच्या-आमच्या विशेषत: तरुणांच्या उत्पन्नात महाप्रचंड वाढ झालेली आहे; सुखाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. खाणेपिणे, कपडालत्ता, करमणुकीच्या सवयी, विविध व्यसने यामुळे वरवर पाहता सुखसमृद्धी दाराशी आलेली असली तरी तुमच्या आमच्या मेंदूवर, त्याच्या कार्यावर खूपच ताणतणाव असतो. आमची सुरुवातीची दोन-तीन तासाची झोप ही दिवसभराच्या श्रमामुळे तुलनेने शांत असते. कळतनकळत निवांत झोप संपवून स्वप्न साखळी सुरू होते. स्वप्ने असंख्य प्रकारची, अनाकलनीय, अविश्वसनीय अशी पडतात. स्वप्नांमध्ये आपले भले वा वाईट झाल्याचे भास होतात.
स्वप्नांच्या त्रासामुळे कंटाळलेल्या रुग्णांच्या दैनंदिन जीवनाचा मी सखोल अभ्यास केला. मलाही स्वप्ने पडतात. त्यांचाही मागोवा घेतला. स्वप्ने पूर्णपणे नाहीशी करता येत नाहीत. पण पहिल्या निवांत झोपेचा काळ निश्चितपणे लांबवता येतो. मध्येच खंडित झालेली निद्रा ठीक होऊ शकते. उपाय साधेसुधे. सायंकाळी लवकर, कमी  जेवावे; जेवणानंतर अर्धातास फिरून यावे. उदरवात असल्यास हिंग्वाष्टक; मानसिक चिंता असल्यास निद्राकरवटी. कृश व्यक्तींनी आस्कंदचूर्ण घ्यावे. झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात, तळपायास तूप तेल लावावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – २७ ऑगस्ट
१८९९ > संस्कृतचे व्यासंगी आणि नाटय़विषयक अभ्यासक रमाकांत पंढरीनाथ कंगले यांचा जन्म. ‘कालिदासाची नाटके’, ‘प्राचीन भारतीय राजनीती’, ‘प्राचीन काव्यशास्त्र’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ ही त्यांची काही पुस्तके.
१९१९ > संतसाहित्याचे अभ्यासक विनायक रामचंद्र करंदीकर यांचा जन्म. वामनपंडितांच्या ‘यथार्थदीपिका’चे संपादन, ‘भगवद्गीतेचे तीन टीकाकार’ (ज्ञानेश्वर, वामनपंडित, लो. टिळक), ‘ग्रंथवेध’, ‘ज्ञानदेवांचा आत्मसंवाद’, ‘ज्ञानदेवांचा गीतासंवाद’ व ‘एक तरी ओवी अनुभवावी’ ही पुस्तकत्रयी आणि ‘रामकृष्ण आणि विवेकानंद : एक दर्शन’ ही त्यांच्या व्यासंगी लेखनाची प्रतीके. मे २०१३ मध्ये ते निवर्तले.
१९२५ > ‘भयकथा’ या प्रकारात मराठीमध्ये मोलाची भर घालणारे नारायण गोपाळ धारप यांचा जन्म. गूढ, अतिमानवी, भ्रमयुक्त प्रदेशांत त्यांच्या कथांतील पात्रे वाचकांना नेतात. सुमारे ५० वर्षांच्या लेखन-कारकिर्दीत त्यांनी शंभरावर पुस्तके लिहिली,  त्यापैकी ‘अनोळखी दिशा’  हा निवडक भयकथांचा संग्रह होय. त्यांचे निधन २००८ साली झाले.  
१९८१ > ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ यांसारख्या गाजलेल्या प्रहसनांचे लेखक बबन प्रभू यांचे निधन.
– संजय वझरेकर