अंडे हे पूर्ण अन्न आहे. त्यामध्ये मानवी शरीरास लागणारी वेगवेगळी प्रथिने आढळतात. अशा प्रकारचे प्रथिनांचे समतोल मिश्रण आपले शरीर तयार करू शकत नाही. ही प्रथिने शरीरबांधणीसाठी व पेशींच्या चयापचयाच्या क्रियेत महत्त्वाचे कार्य करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. याव्यतिरिक्त प्रथिने शरीरातील हाडे, स्नायू, त्वचा व रक्त चांगले ठेवून शरीराची झीज भरून काढतात. शरीरात स्निग्ध व पिष्टमय पदार्थ साठवले जातात, परंतु प्रथिने साठवली जात नाहीत. त्यामुळे प्रथिनांचा राखीव साठा शरीरात उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत अंडय़ातील प्रथिनांचा स्रोत शरीराला सर्वोत्तम आहे. विशेषत: वजन कमी करताना अंडय़ातील प्रथिने शरीरावर विपरीत परिणाम होऊ देत नाहीत.
अंडय़ातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जीवनसत्त्व ब-२. हे पाण्यात विरघळणारे असून शरीरातील चयापचय प्रक्रियेत महत्त्वाचे कार्य करून शरीरवाढीसाठी व ऊर्जा पुरवण्यासाठी मदत करतात. विशेषत: लहान मुलांच्या शरीरवाढीसाठी व झीज भरून काढण्यासाठी ही जीवनसत्त्वे उपयोगी ठरतात.
अंडय़ामध्ये जीवनसत्त्व-ड मोठय़ा प्रमाणात असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीराची हाडे कमकुवत होतात आणि रोगप्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे हृदयरोग व कॅन्सर यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. एक अंडे प्रतिदिन शिफारशीपेक्षा २० टक्के जास्त जीवनसत्त्व-ड याचा पुरवठा शरीरास करते.
अंडय़ातील मध्यभागी असलेल्या पिवळ्या घटकात कोलीन हा पदार्थ असतो. हा पदार्थ मेंदूची वाढ व कार्य करण्यास मदत करतो. दररोज एक अंडे शरीराला लागणाऱ्या कोलीनची गरज भागवते. त्यामुळे लहान मुलांना दररोज अंडे खाऊ घालणे फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त पिवळ्या घटकात ल्युटीन आणि झी-झॅन्टीन हे घटक असतात. यामध्ये ऑक्सिडंट रोधक गुणधर्म आहेत. हे घटक डोळ्यांतील स्नायूंना मजबूत ठेवून मोतीबिंदू नियंत्रणात ठेवतात.
अंडय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात खनिज पदार्थ असतात. विशेषत: सेलेनियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अंडय़ात ऑक्सिडंटरोधक गुणधर्म आहेत. वार्धक्यात स्नायूंचा कमजोरपणा रोखणे, आंधळेपणा रोखणे आदी काय्रे या खनिजजन्य पदार्थामुळे होतात.
– डॉ. माणिक धुमाळ (परभणी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल-अंडे: पोषक अन्न
अंडे हे पूर्ण अन्न आहे. त्यामध्ये मानवी शरीरास लागणारी वेगवेगळी प्रथिने आढळतात. अशा प्रकारचे प्रथिनांचे समतोल मिश्रण आपले शरीर तयार करू शकत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eggs nutritious food