डॉ. आनंद दिनकर कर्वे यांनी शेती उत्पन्न वाढावे,शेतकऱ्याला शेती किफायतशीर व्हावी,त्याला पावसाचे पाणी वर्षभर पुरावे,त्याच्या शेतातील पिकांचा कचरासुद्धा फायदेशीर व्हावा म्हणून केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची अनेक शिबिरे घेतली. ग्रीन ऑस्कर म्हणून समजला जाणारा इंग्लंडचा अ‍ॅश्डेन पुरस्कार त्यांना दोनदा मिळाला.
१९३६ साली जन्मलेले डॉ.आनंद कर्वे यांचे शिक्षण पुणे व नंतर जर्मनीत झाले. पंजाब, (तत्कालीन) मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठांत प्राध्यापकी करून नंतर फलटणचे ‘निंबकर सीड्स संशोधन केंद्र’, युनायटेड नेशन्सच्या म्यानमार प्रकल्पात भुईमूग तज्ज्ञ, जर्मनीत संशोधन, हिंदुस्थान लिव्हर इत्यादी ठिकाणी काम करून पुढे त्यांनी स्वतची एॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) नावाची संस्था काढली.मग त्यांच्या शेतकऱ्यांसाठीच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचा कचरा, उष्टे-खरकटे व खराब झालेले अन्न वापरून बायोगॅस करायचे तंत्र त्यांनी विकसित केले. पारंपारिक संयंत्राला लागणाऱ्या ४० किलो शेणाऐवजी डॉ.कर्वे यांच्या संयंत्राला फक्त एक किलो जैव खाद्य लागते. त्यातून ५०० ग्रॅम गॅस तयार होतो.
ब्रिटनच्या राजवाडय़ात या संयंत्राची प्रस्थापना करण्यासाठी इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ.कर्वे यांना आमंत्रित केले होते. अशी ७०० यंत्रे महाराष्ट्राच्या नागरी आणि ग्रामीण भागात उभारली गेली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात उसाचे पीक घेतले जाते. त्यातून दरवर्षी ४५ लाख टन उसाचा कचरा निर्माण होतो. तो शेतातच जाळला जातो. देशभरात गव्हाचे काड,मक्याच्या बुरकुंडय़ा, बाजरीचे सरमाड, भाताचा पेंढा, तसेच इतर पिकांचा काडी-कचरा, फळबागांचा पालापाचोळा, नारळाच्या झावळ्या-करवंटय़ा, कडधान्याच्या शेंगांची टरफले न जाळता त्यापासून कांडी कोळसा बनवण्याची शक्कल डॉ.कर्वे यांनी काढली. यातून एकूण जैवभाराच्या २० टक्के कोळसा मिळतो, त्यापासून कांडी कोळसा बनवत येतो. तो जाळण्यासाठी त्यांनी शेगडीही विकसित केली.
शेतात पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांबूचा पिंजरा बनवून त्यात मोठमोठय़ा फ्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवून पाणी साठवल्यास स्वस्तात पाणी साठवता येते. अशीच पिकांची नर्सरी तयार करण्याची नवीन कल्पना त्यांनी काढली.

वॉर अँड पीस – मनोविकार भाग-२ / तोतरेपणा
लक्षणे- सुरुवातीला बोलावयास स्टार्ट घ्यावयास वेळ लागणे. एकदा बोलावयास लागल्यावर पुढे अडचण न येणे. नेहमी व्यवस्थित बोलता येणे, पण वरिष्ठांच्या घरातल्या एखाद्या मोठय़ा व्यक्तीच्या दडपणाने अडखळत बोलणे.
कारणे- शारीरिक व्यंग, आखूड वा जड जीभ, चुकीच्या जागी टाका असणे, स्वरयंत्रात अडथळा असणे, कानात दोष असणे, आत्मविश्वासाचा अभाव, घरातील मोठय़ांचे/वरिष्ठांचे दडपण, हस्तमैथुनामुळे ओजक्षय, कृमी, जंत वा पोटाच्या तक्रारीने सदैव अस्वस्थता, नपुंसकत्व.
शरीर व परीक्षण- जीभ, घसा, गळा यांचे परीक्षण, बोलण्याचे परीक्षण अडथळय़ाकरिता करावे.
अनुभविक उपचार- ब्राह्मीवटी व ज्वरांकुश प्र. ३ गोळय़ा, ब्राह्मीप्राश ३ चमचे सकाळ-सायंकाळ घ्यावा. झोपेची तक्रार असल्यास निद्राकरवटी रात्री ६ गोळय़ा दुधाबरोबर, दोन्ही जेवणानंतर सारस्वतारिष्ट ४ चमचे पाण्याबरोबर घ्यावे. मैदानात जाऊन खूप मोठय़ाने ओरडण्याचा प्रयत्न करणे.
रुग्णालयीन उपचार- गरम पाणी, मीठ व हळद यांच्या गुळण्या झोपताना किंवा सकाळी अवश्य कराव्यात. त्याअगोदर विधिपूर्वक अणुतेलाचे नस्य करवावे. पोटात वायू धरत असल्यास आठवडय़ातून एकवेळ निरूहबस्ती (एनिमा) घ्यावा.
पथ्यापथ्य- थंड, तेलकट, डालडा असे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जेवणात पुदिना, तुळस, आले, लसूण यांचा वापर असावा.
शक्य असल्यास रोज एक बदाम किंवा जर्दाळू खावा.
‘माझा मुलगा तोतरा बोलतो, उच्चार अस्पष्ट आहेत, मित्रमंडळी टिंगल करतात’ अशा तक्रारी घेऊन आई-वडील वैद्य डॉक्टरांना नेहमीच भेटत असतात. बालकांच्या शरीराची संपूर्ण वाढ एकदम कधीच होत नाही. अशा बालकांना उगाचच ब्रेन टॉनिकचा मारा करण्यापेक्षा वेखंडाची कांडी थोडय़ा मधात उगाळून असे चाटण जिभेला दिवसातून दोन वेळा करावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. – श्रीकृष्ण
हा सात बहिणींच्या पाठीवर जन्मला. दोन मुलीनंतर मुलगा झाला तरी उगाच केवढे कौतुक होते. हा जन्मला नाही तर लगेचच बिचारा निर्वासित झाला मग यशोदेकडे वाढला. असावा तरी कसा तर गुंडा. शिवाय सावळा.  हा चोरून लोणी खाणारा! एकदा यशोदेने पकडले तेव्हा तेव्हा तिने त्याला तोंड उघडायला भाग पाडले. तेव्हा यशोदेला सगळे विश्व त्याच्या तोंडात दिसले. यशोदा चपापली आणि समजली की हे प्रकरण काहीतरी निराळेच आहे. हा मोठा झाला तेव्हा दुष्टांना कुस्तीत चीतपट करायचा त्यामुळे गोपी भाळल्या. रानावनात हा वेळू वाजवायचा. याची वेळूची शीळ हृदयाला गवसणी घालणारी. त्या गवसणीत राधा अडकली. स्वत: लग्न झालेली पण असे समर्पण फक्त स्त्रियाच मनाने करू शकतात. एकदा खूप पाऊस पडला घरे गळू लागली. हे स्त्रियांच्या दृष्टीने अक्रितच, कारण घर हेच तर त्यांचे जग. मग याने एक डोंगरच उचलून धरला. तेव्हा सगळ्या खूश. गोपी नदीत अंघोळ करायच्या तेव्हा हा त्यांचे कपडे लपवायचा. बायकांना थोडीफार चेष्टा खुलवते त्यात त्यांचे स्त्रीत्व गुंतले असेल तर या खासगीत गुलगुलु हसतात. पण हा वेळेवर कपडे परत करायचा. अशीच अगदी वेळेवर त्याने द्रौपदीला एकाहून एक भरजरी लुगडी पुरवली. ‘अहो नुसते षंढा सारखे बसलात काय? किंवा ‘तुमचे हे एका टोकाचे वागणे कसले?’ असे दोन्ही प्रश्न त्याला विचारणे अवघड होते, कारण तो बसून असायचा तेव्हा पुढचे काहीतरी आखायचा आणि जरूर पडेल तेव्हाच टोकाला जायचा. बलरामाने सुभद्रेसाठी दुर्योधनाचे स्थळ आणले. ती भाळली होती अर्जुनावर. तिला पळून जायला यानेच मदत केली. त्या आधी रुक्मिणी दुर्योधनाबद्दल सांगू लागली तेव्हा ‘तुम्ही का नाही केलंत शिशुपालाशी? तेव्हा तुम्हाला दादाच हवा होता ना?’ या सुभद्रेच्या प्रश्नातला दादा म्हणजे श्रीकृष्ण. याला अनेक बायका. त्यांच्या मधली धुसफूस स्त्रीपुरुषांच्या अनेक पिढय़ांनी आनंदाने ऐकली आहे.
महाभारत युद्ध सुरू व्हायच्या आधी याच्या जिवावरच बेतले होते. तेव्हा ‘माझे सैन्य आणि मी’ अशी वाटणी करणारा हाच. ती एक मोठी चालच होती. युद्धातही याने नुसत्या युक्तीच्या गोष्टी सांगितल्या नाहीत. तर चिथावणीखोर शब्द काढले आणि अर्ध सत्याचाही प्रयोग केला.
अशा माणसाने एखादा धर्मग्रंथ सांगावा? तीच तर गोम आहे. ‘धर्म सांगतात पुरुष आणि पाळतात बायका’ असे म्हणतात. त्या सगळ्या बायका याला शरण आणि व्यवहार करत करत धर्म सांगणारे पुरुष व्यवहार ओळखून असतात म्हणून लागतो श्रीकृष्ण.
कपिल आणि पातंजली मुनींनी काय सांगितले हे एखाद्या हीरोकडून सांगितले जाते तेव्हा निदान कानात तरी शिरते. वळते की नाही हे प्रश्न त्याही पुढचे.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २७ मे
१८३१ > लोकभाषांचे अभ्यासक केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांचा जन्म. ‘वऱ्हाडी भाषेचे व्याकरणविशेष’ आणि ‘गोंड लोक व गोंड भाषा’ या दोन निबंधांसह काही चरित्रात्मक लेख व ‘आत्मवृत्त’ त्यांनी लिहिले होते.
१९०६ > तिसरे ‘मराठी ग्रंथकार संमेलन’ सातारा येथे र. पा. करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले.
१९२४ > विनोदी लेखक म्हणून अधिक गाजलेले बाळ गंगाधर सामंत यांचा जन्म. ‘मस्करी’, ‘गोंधळ’, ‘नवरा बायको’,  ‘करामत’ आदी तब्बल ४० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत, त्यात मराठी नाटय़संगीत, रिचर्ड बर्टनचे चरित्र (शापित यक्ष), बालगंधर्व, हिटलर, ‘मरणात खरोखर जग जगते’, ‘प्रेमग्रंथ’ असे वैविध्यही आहे. ‘लोकसत्ता’साठी त्यांनी ‘न संपणाऱ्या गोष्टी’ हे सदर लिहिले होते. जानेवारी २००९ मध्ये त्यांचे निधन झाले.
१९९४ > तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन. ‘विचारवंत’ या बिरुदाला साजेसे काम त्यांनी केले. वेदाभ्यास, मानवेंद्रनाथ रॉय यांचे राजकीय विचार, जडवाद असे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. मराठी विश्वकोशाचे संपादक, तसेच मराठीचे ज्ञानभाषापण टिकविणाऱ्या पुस्तकांचे ते लेखक होत.
– संजय वझरेकर

Story img Loader