डॉ. आनंद दिनकर कर्वे यांनी शेती उत्पन्न वाढावे,शेतकऱ्याला शेती किफायतशीर व्हावी,त्याला पावसाचे पाणी वर्षभर पुरावे,त्याच्या शेतातील पिकांचा कचरासुद्धा फायदेशीर व्हावा म्हणून केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची अनेक शिबिरे घेतली. ग्रीन ऑस्कर म्हणून समजला जाणारा इंग्लंडचा अॅश्डेन पुरस्कार त्यांना दोनदा मिळाला.
१९३६ साली जन्मलेले डॉ.आनंद कर्वे यांचे शिक्षण पुणे व नंतर जर्मनीत झाले. पंजाब, (तत्कालीन) मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठांत प्राध्यापकी करून नंतर फलटणचे ‘निंबकर सीड्स संशोधन केंद्र’, युनायटेड नेशन्सच्या म्यानमार प्रकल्पात भुईमूग तज्ज्ञ, जर्मनीत संशोधन, हिंदुस्थान लिव्हर इत्यादी ठिकाणी काम करून पुढे त्यांनी स्वतची एॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) नावाची संस्था काढली.मग त्यांच्या शेतकऱ्यांसाठीच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचा कचरा, उष्टे-खरकटे व खराब झालेले अन्न वापरून बायोगॅस करायचे तंत्र त्यांनी विकसित केले. पारंपारिक संयंत्राला लागणाऱ्या ४० किलो शेणाऐवजी डॉ.कर्वे यांच्या संयंत्राला फक्त एक किलो जैव खाद्य लागते. त्यातून ५०० ग्रॅम गॅस तयार होतो.
ब्रिटनच्या राजवाडय़ात या संयंत्राची प्रस्थापना करण्यासाठी इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ.कर्वे यांना आमंत्रित केले होते. अशी ७०० यंत्रे महाराष्ट्राच्या नागरी आणि ग्रामीण भागात उभारली गेली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात उसाचे पीक घेतले जाते. त्यातून दरवर्षी ४५ लाख टन उसाचा कचरा निर्माण होतो. तो शेतातच जाळला जातो. देशभरात गव्हाचे काड,मक्याच्या बुरकुंडय़ा, बाजरीचे सरमाड, भाताचा पेंढा, तसेच इतर पिकांचा काडी-कचरा, फळबागांचा पालापाचोळा, नारळाच्या झावळ्या-करवंटय़ा, कडधान्याच्या शेंगांची टरफले न जाळता त्यापासून कांडी कोळसा बनवण्याची शक्कल डॉ.कर्वे यांनी काढली. यातून एकूण जैवभाराच्या २० टक्के कोळसा मिळतो, त्यापासून कांडी कोळसा बनवत येतो. तो जाळण्यासाठी त्यांनी शेगडीही विकसित केली.
शेतात पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांबूचा पिंजरा बनवून त्यात मोठमोठय़ा फ्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवून पाणी साठवल्यास स्वस्तात पाणी साठवता येते. अशीच पिकांची नर्सरी तयार करण्याची नवीन कल्पना त्यांनी काढली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा