आपल्याकडे नियोजनाअभावी शुद्ध देशी जातीच्या गाई/ म्हशींची संख्या कमी झाली आहे. देशी गाई उष्ण हवामान सहन करतात. त्यांची रोगप्रतिकार क्षमताही उच्च प्रतीची असते. आपल्याकडील गीर (गुजरात), साहीवाल (पंजाब, हरियाणा), थारपारकर (राजस्थान) जातींच्या गाई दुधाळ स्वरूपाच्या आहेत. दुधाळ स्वरूपाच्या विदेशातील होल्स्टीन, जर्सी या दुधाळ जातीच्या वीर्यमात्राशी संकर करून पदास झालेल्या संकरित गाईंच्या संगोपनाद्वारे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे बेरोजगारीची समस्या सोडवण्यास मदत होते. तथापी उत्कृष्ट दर्जाच्या संकरित गाई पदास करण्यासाठी आपल्या दुधाळ जातीच्या देशी गाईंचे संवर्धन करणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडील खिलार, गौळण, डांगी, कांगायम या देशी गाई दुधाळ स्वरूपाच्या नाहीत. तथापी वळू (बल) शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. बल काटक असल्याने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतात.
भारतातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीकामासाठी यंत्रांचा वापर व्यावहारिक नाही. त्यामुळे आपल्या ओढाळ जातीच्या गाईंचे संवर्धन करणे आवश्यक आहे. इंधनाचा तुटवडा आणि किंमत लक्षात घेता बलांचा वापर महत्त्वाचा ठरतो. टिकाऊ स्वरूपाचा दूध व्यवसाय करण्यासाठी देशी जातीच्या गाईंचे संवर्धन केले पाहिजे. म्हशींच्या बाबतीत आपण सुदैवी आहोत. जगातील सर्वात उत्कृष्ट जातीच्या म्हशी (मुरा, नीलरावी) आपल्याकडे आहेत. नागरी विभागात किफायतशीर दूध व्यवसाय करण्यासाठी या देशी म्हशींना पर्याय नाही. त्या दृष्टीने त्यांचे सवर्धन केले पाहिजे. पारडय़ांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करणे, म्हशींना सकस आणि समतोल आहार देणे, म्हशींची प्रजननक्षमता सुधारणे अशा उपाययोजनांद्वारे दर्जेदार म्हशींची संख्या वाढवता येईल. महाराष्ट्रातील पंढरपुरी आणि नागपुरी म्हशी तसेच गावठी स्वरूपाच्या म्हशींची दूध उत्पादनक्षमता वाढवण्यास मुरा वळूंच्या संयोगाने संकरित म्हशींची मोठय़ा प्रमाणात पदास करणे गरजेचे आहे. देशी गाईंच्या संवर्धनाबाबत शासनाने निश्चित धोरण ठरवले आहे.
जे देखे रवी.. – विचार स्वातंत्र्य
हल्ली हल्ली वर्तमानपत्रात हनी सिंग या गायकाने गायलेल्या गाण्याची चर्चा झाली. त्यात त्याने एकटीदुकटी पोरगी किंवा बाई सापडली तर तिला सोडू नका, तिचा यथेच्य उपभोग घ्या, असे ध्रुपद लावले आहे. मनात आले की, ह्य़ाच्या कानाखाली एक आवाज काढावा. आहे उलटेच. हा लोकप्रिय आहे आणि हा जे आवाज काढतो आहे तो आवाज लोक कान लावून ऐकत आहेत. एका स्तंभलेखिकेने लिहिले ‘ह्याला समजून घेऊन ह्य़ाची समजूत काढायला हवी, याच्याकडे अनुकंपेने बघायला हवे, कारण हा परिस्थितीचा गुलाम किंवा सावज झाला आहे. असेल बुवा! मी ते वर्तमानपत्र कचऱ्याच्या टोपलीत टाकून मोकळा झालो आणि हे लिहिण्यास बसलो. सूर्य हा मुठीएवढा भासत असला तरी तो सगळ्या जगाला जसा प्रकाश देतो, तसेच शब्दांचेही आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात तेव्हा ते सामर्थ्यांबद्दल बोलतात. आणि हे शब्द विद्रोह करताना कुशलतेने वापरता येतात. विद्रोह तर हवाच. त्याशिवाय समाज हलत नाही, कारण समाजाचे बूड जड असते. विद्रोह हा विशेष द्रोह असतो. त्याला उद्दिष्टे असतात. ज्ञानेश्वर स्वत: विद्वान विद्रोही. त्यांची पहिला बंडवाला अशी ख्याती आहे. नाटक काय, कविता काय किंवा कादंबरी काय, त्यात शेवटी माणसाच्याच कथा, व्यथा आणि अवस्था असतात. जुने ते सगळे सोने हे खचितच चूक आहे. परंतु सोने जुने झाले तरी त्याचे मूल्य कमी होत नाही, उलट हल्ली वाढलेच आहे. यातूनही बोध घ्यायला हवा. जुन्या काळात नाटक केवळ मनोरंजनासाठी आणि माणसांच्या व्यथांचे नग्न किंवा बीभत्स प्रदर्शन करण्यासाठी असू नये, असा दंडक होता.
दंडक हा शब्द बाजूला ठेवू, परंतु माणसाचे आयुष्य सुधारावे, त्याने सभोवारच्या परिस्थितीतून मार्ग काढून उन्नत व्हावे, असा उद्देश असायला काय हरकत आहे किंवा असावी? गडकरी या थोर नाटककाराच्या ‘एकच प्याला’ ह्य़ा नाटकातला ‘एकच’ हा शब्दच मुळी नाटकाचे सार सांगून जातो. त्या नाटकातल्या मुख्य पात्राचीच नव्हे तर त्याच्या कुटुंबाची दारूमुळे झालेली धूळधाण केविलवाणीच, परंतु त्या नाटकाच्या तीन तासांच्या प्रवासात पहिल्यांदा तळीराम या दारुडय़ाच्या माकडचेष्टा बघत हसणारा माणूस पुढे दारूमुळे होणाऱ्या त्या धूळधाणीमुळे अंतर्मुख होतो आणि काहीतरी शिकूनच बाहेर पडतो हे खचितच. मधे झोपडपट्टय़ामधील दारूच्या बेकायदेशीर भट्टय़ांवर धाडी टाकल्यामुळे दारूच्या अधिकृत दुकानातला खप वाढला आणि त्यामुळे सरकारी तिजोरीत दुप्पट भर पडली, असे विधान ऐकून मी सर्द झालो. एवढी आधुनिक अर्थव्यवस्था मला कळत नाही, परंतु एकच प्याला नाटकातल्या तळीराम या दारुडय़ाची दारूची भलामण करणारी विधाने आणि हे कर वाढल्याचे विधान करणाऱ्या माणसाला मला वाटते एकाच पंक्तीत बसवायला हवे.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – बेंबीचा हर्निया
लठ्ठपणामुळे पोटाचा हर्निया होऊन हैराण झालेल्या जास्त करून महिला अधूनमधून विविध वैद्यकीय चिकित्सकांकडे जात असतात. पोटाच्या बेंबीच्या आसपासच्या हर्नियाचे प्रमुख कारण लठ्ठपणा हे असते. या विकारात पोटाचा घेर वाढतो, स्नायूंवर ताण पडतो, ते कमकुवत होतात, खाण्या-पिण्याबाबत संयम न पाळल्यामुळे; तोंडावर ताबा न ठेवल्यामुळे; अवाच्यासव्वा व अवेळी जेवणामुळे पोट सतत फुगत राहते, बेंबी मोठी होते. बहुसंख्य महिलांना थोर थोर वैद्यकीय तज्ञ दुर्बिणीद्वारे शस्त्रकर्माचा सल्ला देतात. अशा पोटाच्या हर्नियाग्रस्त महिलांना आतडय़ांमध्ये व्रण किंवा गँगरिन होण्याचा धोका असतो. पोटाच्या स्नायूंमध्ये छिद्र तयार होते. हर्निया वारंवार त्रास देत राहिला; खाण्या-पिण्याचे बंधन न पाळता; खूप चढउतार वा भागदौडी केली, तर आतडय़ांना पीळ बसून आजार बळावतो.
काही वेळेस हर्नियाग्रस्त भागाला बायपास करून आतडय़ातील अन्नपदार्थ पुढे जाण्याकरिता वेगळा मार्ग, तज्ञ सर्जन करून देतात. असे शस्त्रकर्म एकदा केल्यानंतरही कुपथ्यकारक खाणेपिणे चालू राहिले तर, आतडय़ात नवीन ठिकाणी हर्निया उद्भवतो.
सर्जन मंडळी कितीही कुशल असली तरी आतडय़ाचा खूप मोठा भाग काढत नाहीत; हे रुग्णाने लक्षात ठेवावयास हवे. अशा हर्नियाची शंका आल्याबरोबर संबंधित महिलेने तोंडावर ताबा ठेवावा. चुकूनही पोटभर व फाजील जेवण जेवू नये. नेहमीपेक्षा कमी किंवा निम्मे जेवावे. पोटात गॅस धरेल असे पदार्थ कटाक्षाने टाळावे. वाटाणा, उडीद, भेळ, मिसळ, मेवामिठाई, मांसाहार, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम टाळावे. पाणी नेहमी गरम, सुंठयुक्त प्यावे. सायंकाळी लवकर व कमी जेवावे. कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईट, वजन, चरबी यांवर तपासणीने लक्ष ठेवावे. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, लाक्षादि, सिंहनाद, गुग्गुळ, प्र. ३, गोक्षुरादि व त्रिफळा गुग्गुळ प्र. ६, रसायनचूर्ण १ चमचा, दोन वेळा जेवणाअगोदर; जेवणानंतर अम्लपित्तवटी, सौभाग्यसुंठ गरम पाण्याबरोबर घ्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – १३ ऑगस्ट
१८९० > ‘बालकवी’ म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म. ‘बालकवी’ हा किताब १९०७ साली जळगावात भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात कविजनांकडून मिळला होता. ‘आनंदी आनंदे’,‘श्रावणमास’, ‘फुलराणी’, ‘औदुंबर’ यांसारख्या अजरामर कविता त्यांनी अल्पायुष्यात लिहिल्या.
१८९८ > मराठी साहित्याच्या कोणत्याही दालनात आपल्या लेखणी आणि वाणीने मुक्तसंचार करणारे लेखक, पत्रकार, नाटककार, पटकथाकार, शिक्षणतज्ज्ञ, मराठी विडंबनकाव्याचे दालन प्रशस्त करणारे साहित्याचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म. ‘झेंडूची फुले’ हा त्यांचा विडंबनकाव्य संग्रह, तसेच ‘कऱ्हेचे पाणी’ आणि ‘मी कसा झालो’ ही आत्मपर पुस्तके, ‘तो मी नव्हेच’, सारखी नाटके, ‘नवयुग’ साप्ताहिक व ‘मराठा’ दैनिक यांतील लेखन मिळून १० हजार पाने भरतील एवढे लिखाण अत्रेसाहेबांनी केले!
१९८० > मराठी नवकथेचे एक अध्वर्यू, पुढे डोंबिवलीकरांनी ‘भाषाभास्कर’ म्हणून गौरविलेले ख्यातकीर्त साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. २६ कथासंग्रह, आठ नाटके, १७ कादंबऱ्या, १२ लेखसंग्रह असे विपुल लेखन त्यांनी केले. ‘आदेश’ आणि ‘सावधान’ ही वृत्तपत्रे त्यांनी काढली होती.
– संजय वझरेकर