कॉर्नवॉल या इंग्लंडच्या नैर्ऋत्येला असणाऱ्या प्रदेशात ‘मानसिक आरोग्य आणि समुद्र’ या विषयावर अभ्यास केला गेला आणि त्याला ‘नील आरोग्य’ म्हणून संबोधले गेले. निसर्गातील निळाई आणि विशेषत: सागराची अथांगता मानवी आयुष्यातील ताणतणाव दूर करायला मदत करते. २६ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यातून हाती आलेल्या विदेचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला.
किनारी प्रदेशात राहणाऱ्या आणि समुद्राच्या सान्निध्यात राहणाऱ्यांची मानसिकता सकारात्मक असते, असा या अभ्यासाचा निष्कर्ष होता. आणखी एका अभ्यासात २० हजार स्मार्टफोन धारकांकडून माहिती गोळा करण्यात आली. त्यांनी सर्वाधिक आनंददायी ठिकाण म्हणून समुद्रकिनारी प्रदेशाचा उल्लेख केला.
हेही वाचा >>> कुतूहल : सागरी दिन आणि मारपोलचे अर्धशतक
मॅथ्यू व्हाइट या पर्यावरण मानसशास्त्रज्ञाने याची तीन शास्त्रीय कारणे दिली. ती म्हणजे, किनारी प्रदेशात सूर्यप्रकाश जास्त असतो आणि प्रदूषण कमी असते. पाण्याजवळ राहणारे अधिक चपळ असतात. पाण्यात एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक चैतन्य आणि उत्साह निर्माण करण्याचा गुणधर्म असतो. सागराच्या आसपास असल्याने लवकर ध्यानस्थ होऊन आपण जास्त सकारात्मक होतो आणि ताण कमी होतात. आपल्या श्वसनाचा वेगही संथ होऊन समुद्राशी एकरूप होऊ पाहतो. केवळ समुद्राकडे टक लावून पाहत राहिले तर मेंदूतील विद्युत आवेग बदलू शकतात. निळय़ा रंगाने आणि लाटांच्या गाजेने चित्तवृत्ती शांत होतात. लाटांद्वारे वातावरणात आयन सोडले जातात. त्यांच्यामुळे नैराश्यासारख्या व्याधी दूर होण्यास हातभार लागतो. समुद्रस्नानाने ‘ड’ जीवनसत्त्व मिळाल्याने त्वचेचे आणि एकूणच आरोग्य सुधारते.
हेही वाचा >>> कुतूहल : समुद्रतळावरील नक्षीदार वर्तुळे
शास्त्रज्ञ जो. टी. म्हणतात, ‘‘समुद्र तुम्हाला निसर्गाशी तद्रूप कसे व्हावे हे शिकवतो. समुद्राच्या पाण्यात असताना त्याची गाज, खारटपणा, अफाट शक्ती याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते त्यामुळे तुम्ही जमिनीवरच्या समस्या विसरून जाता.’’ समुद्रकिनारी नियमित चालल्यास निद्रानाशाची व्याधी दूर होते. या अभ्यासात असेही आढळून आले की किनाऱ्यावर रपेट मारणारे सरासरी ४७ मिनिटे अधिक गाढ झोपू शकतात. भावनांचे व्यवस्थापन समुद्राच्या साहाय्याने चांगले करता येते.
अर्थात, एखाद्या दुर्दैवी प्रसंगात सागरामुळे एखाद्याचे जिवलग कायमचे निघून गेले असतील तर अशांची मते आणि अनुभवदेखील अभ्यासात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
– डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org