आपण एखादं काम करण्यासाठी आतल्या खोलीमध्ये जातो आणि जाईपर्यंत हे विसरून जातो की आपण इथं कशासाठी आलो आहोत. किंवा आपण सरळ रस्त्याने एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले असतो; परंतु ज्या वेळेला चौक येतो, त्या वेळेला अचानक मंदावतो आणि नक्की आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचं आहे हे पुन्हा एकदा चाचपडून बघतो. आणि मग योग्य रस्ता निवडतो.

मनातल्या मनात असं हरवल्यावर आपला मेंदू नेमकं काय करतो?

काहीही आठवायचं असेल तर आपला मेंदू याआधी ती वस्तू कुठं ठेवली होती हे आठवतो. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण कम्प्युटरचं बटण बॅक नेतो किंवा टेप ‘रिवाइंड’ करतो. तसंच आपल्या आठवणीही शिस्तबद्ध पद्धतीने मागे मागे नेतो.

आपण इथं येण्यापूर्वी कुठं होतो? त्या वेळेला आपण कोणाशी बोलत होतो? आपण फोनवर होतो का? हे सगळं आपण अनेकदा आठवू शकतो. अशा प्रकारे घडलेल्या घटना रिवाइंड करून आठवण्याला एपिसोडिक मेमरी म्हणतात.

आपण जेव्हा अनुभव लेखन किंवा अनुभव कथन करतो, तेव्हा अशा प्रकारे स्मरणशक्ती विकसित होते. शाळांमध्ये घडलेले प्रसंग, सहलीचं अनुभव कथन करायला मुलांना सांगितलं जातं तेव्हा एपिसोडिक मेमरीला चालना मिळते.

घडलेले विशेष प्रसंग सांग, अशी सवय जर घरीसुद्धा मुलांना लावली तर पुन्हा तीच घटना क्रमवार आठवणं आणि ती दुसऱ्याला सांगणं यामध्ये आठवणींची उजळणी होते. काही मुलांना हे जमतं, काहींना क्रमवार सांगण्यासाठी प्रयत्न घ्यावे लागतात. योग्य आठवणी आणि आवश्यक ती शब्दसंपत्ती असावी लागते. याशिवाय दीर्घकालीन परिणाम बघायचे असतील तर अशा प्रकारच्या सरावामुळे मेंदूला हळूहळू घटना जाणीवपूर्वक बघण्याचीसुद्धा छान सवय लागते. अनुभवांकडे स्वतंत्र दृष्टिकोनातून बघण्याची सवय होते. असे उपक्रम शाळांमध्ये व्हायला हवेत. प्रश्नांची उत्तरं लिहिणं, पाठ करून निबंध लिहिणं, पाठ करून भाषण म्हणणं यापेक्षा हा वेगळ्या प्रकारचा अभ्यास आहे. याने मेंदूला चालना तर मिळेल आणि वर्गातल्या सर्व मुलांना संधी मिळेल. अशा प्रकारे एपिसोडिक मेमरीला कामाला लावता येतं.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

Story img Loader