शेतीमध्ये मातीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच मातीतून झाडाच्या वाढीचे घटक शोषून घेतले जातात. खासकरून शेतजमिनीचा वरचा साधारणपणे १० सेमी जाडीचा थर सर्वात महत्त्वाचा असतो. या जागेतच हे घटक असणे आवश्यक असते. जमिनीची धूप होते असे आपण म्हणतो, त्यावेळी हा थर नेमका वाहून गेलेला असतो. अशी कसदार माती तयार व्हायला अनेक वर्षे लागतात, असा अनुभव आहे. याला कारणेही अनेक प्रकारची आहेत.
वर्षांनुवष्रे जमीन पडीक राहिल्यास पावसाच्या माऱ्यामुळे ही धूप होते. तसेच जमीन उताराची असेल तरीही हे घडू शकते. जोराच्या पावसाने ही धूप होते. जमिनीवर झाडे उभी असल्यास या सर्वाना अटकाव होतो व ही धूप कमी करता येते. झाडांच्या मुळांमुळे माती धरून ठेवण्यास मदत होते. उताराऐवजी जमीन समतल करून घेऊन त्याच मातीचे बांध जरी शेताभोवती घातले तरी शेतातील माती शेतात राहायला मदत होते. शिवाय शेताच्या सभोवताली खंदक करून घेतल्यास वाहून जाणारी माती खंदकात अडकून राहते. पावसाचे थोडेसे पाणीही या खंदकात राहिल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहायला मदत होते. पाण्याचा थोडा ताण पडला तरी पिके टिकून राहायला हा ओलावा उपयुक्त ठरतो.
पाणी अडविण्याबरोबरच माती अडविणे तितकेच महत्त्वाचे आहे. माती आणि पाणी या दोन्ही शेतीच्या गरजा आहेत. या दोन्ही गरजांची पूर्तता केली गेली पाहिजे. तरच चांगल्या उत्पादनाची अपेक्षा करता येईल. अगदी डोंगर उतारावरही सलग समतल चर करून पाणी आणि माती अडविण्याची पद्धत प्रा. भगवंतराव धोंडे यांनी प्रथम वापरली. त्याचा मुबलक प्रमाणात वापर वनाधिकारी वसंतराव टाकळकरांनी केला. उजाड डोंगरावर वनश्रीची पुनस्र्थापना केली. टाकळकरांच्या या कामामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांची ओळख ‘पाण्याचा देव’ अशी होती. टाकळकरांचे हे काम मुख्यत्वे अहमदनगर आणि सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांत झाले आहे, हे तेवढेच महत्त्वाचे.
– दिलीप हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
जे देखे रवी..: वेद प्रतिपाद्या
हा ज्ञानेश्वरीतला दुसरा शब्द. वेद हा शब्द विद या धातूपासून आला आहे. विद्वान, विद्वत्ता, विद्या (आणि अविद्या), वेदना (आणि संवेदना) आणि इंग्रजीतले Video आणि Vision या सगळ्या शब्दांचा हा विद खापर पणजोबा. कळणे, आकलन होणे असा याचा गोळाबेरीज अर्थ आहे. कारण Video आणि Vision या क्रिया कळण्याशी संबंधित आहेत. प्रतिपाद्यामधला प्रति, प्रतिपक्ष किंवा प्रतिवादमधला ‘प्रति’ नाही. ‘आपल्या प्रति आमच्या भावना’ असा प्रयोग होतो त्यामध्ये ‘आपल्याबद्दल’ असा अर्थ असतो तसा हा प्रति आहे. पाद्यामध्ये पद हा मूळ शब्द आहे. पद म्हणजे शब्द असा साधारण अर्थ म्हणता येईल. प्रतिपादन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचे मत किंवा विचार किंवा स्पष्टीकरण. हे प्रतिपादन आद्याबद्दल आहे आणि ते वेदामध्ये आहे, म्हणून वेद प्रतिपाद्या असा हा वेद प्रतिपाद्याचा शाब्दिक कीस आहे. पण खरी गोम वेगळीच आहे. हे फक्त प्रतिपादन आहे, अंतिम शब्द, निर्णय, सत्य नव्हे असे वेद स्वत:च कबूल करतात. जिथे तर्क संपतो, वेदांची मती कुंठीत होते असले काही तरी हे आद्या प्रकरण आहे. मधमाश्यांच्या पोळ्यातल्या कामगार माशीला ती पोळ्याचा भाग असून पोळ्याचे स्वरूप कळत नाही किंवा आईच्या पोटातल्या बाळाला आईचे वय माहीत नसते किंवा जसे स्वत:च्या पाठीवर स्वत:ला चालता येत नाही (हा दृष्टान्त ज्ञानेश्वरांचा) तसा हा आद्या आहे. भारतातच (मध्यपूर्व आशियाचे सोडा) अशी तीन निरनिराळी प्रतिपादने आहेत. जैन म्हणतात, हे विश्व घडलेले नाही. ते कायम अस्तित्वात होते, आहे आणि राहील. इंग्लंडमधले हॉइल आणि आपले नारळीकर यांचेही असेच काही तरी म्हणणे आहे. गौतम बुद्धाने या ‘आद्या’विषयी विचार करणे अनावश्यक आहे. बुद्धिभेदापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे प्रतिपादन केले आहे. चार्वाक तर म्हणतात, जे दिसते, अनुभवाला येते तेच खरे, बाकी सगळे दिशाभूल करण्याचे प्रयत्न आहेत. ही दिशाभूल माणसाला लौकिक सुखापासून वंचित करते. या तिघांना नास्तिक असे संबोधन आहे. वेद मानतात ते आस्तिक, नाही मानत ते नास्तिक. नास्तिक ही शिवी नाही. किंबहुना, आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचा देव या कल्पनेशी सुतराम संबंध नाही. मुळात उपनिषदांमध्ये देव या गोष्टीची सुसंगत व्याख्या मला तरी सापडली नाही. ‘हीच ती जागा जिथून चार किंवा सहा हातांचे देव बाहेर पडतात,’ अशी ज्ञानेश्वरांची ओवी आहे. त्यात माझ्यासारख्या हीन माणसाला उपहास केल्याचा भास होतो. पण माणूस जातीला देव या कल्पनेने घेरले आहे हे नक्की. आस्तिक असोत वा नास्तिक, भगवान विष्णू, भगवान बुद्ध किंवा भगवान महावीर असेच वाक्प्रचार रूढ आहेत. त्यातल्या त्यात चार्वाकी बरे. ते टिकले असते तर मॉल संस्कृतीने ते मोठे सुखावले असते.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस : मूतखडा भाग-१
आयुर्वेदाच्या महासागरातील काही शिंपले माझ्या हाती लागले. त्याचे प्रत्येकाचे मोती झाले असे मला वाटते. शास्त्रावर नितांत श्रद्धा ठेवून अविरत परिश्रम केले, तर नितांत रुग्णसेवेत यश निश्चितच आहे. या सेवायज्ञात विद्यालयातील शिक्षण एक भाग व रोज भेटणाऱ्या रुग्णांनी शिकवलेले नऊशे नव्याण्णव भाग असा माझा निरंतर शिक्षणाचा अनुभव आहे. माझे वडील मूतखडा विकाराकरिता दगडीबेर-एका खनिज युनानी औषधाचा भरपूर वापर करत असत. माझ्या चिकित्सेच्या सुरुवातीच्या काळापासूनच माझ्याकडे मूतखडय़ाचे खूप रुग्ण येऊ लागले. माझ्या ‘वनस्पती व औषधांच्या निरंतर अभ्यासातून मी तीन औषधे निवडली. त्यांचा यशस्वी वापर केल्यानंतरच; ‘आयुर्वेद सर्वाकरिता’ या छोटय़ा पुस्तिका मालिकेतील ‘मूतखडा’ ही पुस्तिका छापली.
काळय़ा चिकण मातीच्या शेतात चिक्कार पाऊस पडल्यावर चिखल झाला व त्यावर कडक प्रखर असे ऊन पडल्यावर तो चिखल वाळला की एक प्रकारचा कडक, टणक दगडासारखा चिखल तयार होतो. त्याप्रमाणेच शरीरास खूप पीडा देणाऱ्या मूतखडय़ाची निर्मिती वृक्कांत (किडनी) होत असते. काटा असलेल्या व मरणप्राय वेदना देणाऱ्या मूतखडय़ाचा विचार येथे आपण करत आहोत. त्याचे वर्णन कॅल्शियम ऑझलेट असे आधुनिक शास्त्रात आहे. (येथे मूत्राशयात बनणारे पांढऱ्या-पिवळय़ा रंगाचे, पीडा न देणारे फॉस्फेट मूतखडे त्यांचा विचार नाही.)
एक दिवस एका वैद्यांच्या पोटात डाव्या बाजूस दुखावयास लागले. चिरंजीवांनी पुण्यातील थोर मूत्रपिंड विकारतज्ज्ञांकडे नेले. त्यांनी तत्काळ मूतखडा शस्त्रकर्म सुचविले. हे मजदूर वैद्य रोजच मूतखडय़ाच्या रुग्णांना औषधे द्यायचा व त्यांचा ‘दुवा’ घ्यायचे. या वैद्यांनी गोक्षुरादिगुग्गुळ व रसायनचूर्ण, नेहमीच्या प्रमाणापेक्षा दुप्पट घेतले. दुसऱ्या दिवशी सायंकाळपासून डाळिंबाच्या दाण्यासारखे मूतखडे एका मागोमाग एक पडले. ही सर्व गोखरूची कृपा!
‘गोक्षुरं शरणं गच्छामि । माम रक्षतु गोक्षुर:।।’
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत : १ जून
१८७२> ‘चाफा बोलेना’, ‘माझी कन्या’ अशा आजही रसिकांच्या ओठांवर असलेल्या कविता लिहिणारे नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ‘बी’ यांचा जन्म. ५० कविता त्यांनी लिहिल्या, त्या ‘फुलांची ओंजळ’ या संग्रहात आहेत. त्यापैकी ‘कमला’ हे उत्कृष्ट काव्य मानले जाते.
१९५०> कादंबरीकार व कथाकार रंगनाथ गबाजी पठारे यांचा जन्म. आणीबाणीच्या कालखंडावर ‘दिवे गेलेले दिवस’, तर जातीयवाद- दलितांचे प्रश्न आणि ‘सहकारा’चे नाव घेणारे राजकारण यांवर बेतलेली ‘ताम्रपट’ या कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत. ‘अनुभव विकणे आहे’, ‘गाभ्यातील प्रकाश’ हे कथासंग्रह, तसेच ‘सत्याची भाषा’ हा समीक्षात्मक लेखसंग्रह ही त्यांची आजवरची उल्लेखनीय पुस्तके आहेत. यापैकी ‘ताम्रपट’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
२००६ > ‘चौफेर’, ‘दृष्टिक्षेप’ हे स्तंभलेख संग्रह, ‘असा हा महाराष्ट्र’, ‘एक झलक पूर्वेची’ ही स्थल-काल वर्णने, ‘भ्रष्टाचार्य अंतुले’, ‘साहित्यातील हिरे आणि मोती’ तसेच ‘निर्धार ते लोकसत्ता’ हे आत्मचरित्र अशी पुस्तके लिहिणारे ‘लोकसत्ता’चे माजी संपादक माधव गडकरी यांचे निधन. सुमारे तीस पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
– संजय वझरेकर