प्रयोगशाळेत काही विशिष्ट रोगांचं निदान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि चाचण्या केल्या जातात. ‘ईएसआर’ म्हणजेच ‘एरीथ्रोसाईट सेडीमेंटेशन रेट’ ही अशीच विशिष्ट रोगांच्या निदानासाठी केली जाणारी एक रक्ताची चाचणी आहे. या चाचणीलाच ‘सेड रेट’ असंही म्हटलं जातं. ही एक तुलनेनं करण्यास सोपी आणि कमी खर्चाची असलेली रक्ताची चाचणी आहे.
ही चाचणी करण्यासाठी प्रथम रोग्याच्या रक्ताचा नमुना घेतला जातो. कोणत्याही रक्त चाचणीसाठी रक्त घेताना ते गोठू नये म्हणून त्यात पोटॅशियम ऑक्झ्ॉलेट, ईडीटीए यासारखे विशिष्ट द्रव मिसळले जातात. हे रक्त एका कमी व्यासाच्या आणि जास्त उंचीच्या विशिष्ट परीक्षानळीत (जिला ‘वेस्टरग्रेन पिपेट’ म्हटलं जातं) भरण्यात येतं. ही परीक्षानळी स्टॅण्डवर स्थिर उभी ठेवली जाते. मग त्यातल्या लाल रक्तपेशी तळाशी बसत जातात. एका तासानंतर परीक्षानळीच्या वरील भागात किती मिलिमीटर पारदर्शक प्लाझ्मा आहे. याची नोंद घेतली जाते. जितके मिलिमीटर पारदर्शक प्लाझ्मा लाल रक्तपेशींवर असेल, तितके मिलिमीटर ‘ईएसआर’, असे धरले जाते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या रक्तात असलेल्या काही असाधारण प्रथिनांमुळे लाल रक्तपेशी एकमेकांना चिकटतात आणि त्यामुळे त्या जास्त वेगाने परीक्षानळीच्या तळाशी जातात. साधारणपणे ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरोगी पुरुषांमध्ये ‘ईएसआर’ ताशी १५ मिलिमीटरहून कमी असतो. स्त्रियांमध्ये ‘ईएसआर’ पुरुषांपेक्षा जास्ती असतो. नवजात बाळाचा ‘ईएसआर’ ताशी २ मिलिमीटर तर लहान मुलांमध्ये तो ताशी २ ते १३ मिलिमीटर असतो. वयोमानानुसारदेखील ‘ईएसआर’ वाढत जातो. काही वेळा काही विशिष्ट औषधांच्या सेवनानंतरसुद्धा ‘ईएसआर’ वाढू शकतो.
या चाचणीद्वारे एखाद्या रोगाविषयी थेट निष्कर्ष काढता येत नसला तरी अनेक रोगांचं निदान करताना ती उपयुक्त ठरते. विशेषत: एखाद्या रुग्णाला रोगजंतूंचा प्रादुर्भाव झाला असल्यास तो कितपत आहे हे ठरवण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. डॉक्टरांना एखाद्या विशिष्ट रोगाची शंका येत असल्यास कुठल्या इतर चाचण्या कराव्या लागतील हे ‘ईएसआर’च्या अहवालावरून ठरवता येतं. तसंच रोग्याला दिल्या जाणाऱ्या उपचारांचा त्याच्यावर योग्य परिणाम होत आहे की नाही हेदेखील या चाचणीतून जाणून घेता येतं.
–प्रिया लागवणकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
ओ. एन. व्ही. कुरुप- साहित्य, सन्मान
ओ. एन. व्ही. कुरुप यांच्या काव्यसाधनेचा उत्तम नमुना असलेले पुरस्कारप्राप्त दीर्घकाव्य आहे ‘उज्जयिनी’. कवी कुलगुरू कालिदासाच्या व्यक्तिरेखेला वेगळ्या दृष्टिकोनातून व्यक्त करण्याचा प्रयत्न या कवितेत आहे. राज्याधिकारापेक्षा काव्याधिकाराचे महत्त्व अधिक मानणाऱ्या कालिदासाचे एक वेगळे रूप इथे शब्दबद्ध केले आहे. ययातिची मुलगी माधवीची कथा सांगत, स्त्रीचे स्वातंत्र्य आणि स्वनिर्णयक्षमतेचे महत्त्व व्यक्त करणारे ‘स्वयंवर’ हे आख्यान काव्यही कुरुप यांचेच. महाभारतातील या कथेचा आधार घेत, कुरुप यांनी हे आख्यानकाव्य लिहिले आहे.
‘मृगया’ हे त्यांचे एक मिथकीय लघुकाव्य. महाभारतातील पांडुराजाच्या संदर्भातील एका घटनेवर ते लिहिले आहे. पांडुने मुनी किंदमनाचा वध केला तेव्हा मरण्याअगोदर या मुनीने त्याला शाप दिला की कामातुर होऊन पत्नीजवळ गेलास की तुला अकाली मृत्यू येईल. माद्रीने विरोध करूनही, पांडूने ऐकले नाही आणि त्याचा मृत्यू ओढवला. या कथेच्या आधारावरच ‘मृगया’ काव्याची रचना आहे.
त्यांचे काव्य १९६०, १९७० अशा टप्प्यांवर बदलत गेले. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला कविता आहेत, त्याही काळानुरूप बदललेल्या दिसतात. ‘मन्दिर मस्जिद’ ही कविता आजकालच्या धार्मिक संघर्षांवर संकेत करणारी आहे. न्यूयॉर्कच्या गल्लीत सर्कस दाखवून भीक मागणाऱ्या एका बांगलादेशीयाने आपल्या देशाचे नाव लपवून, त्या कार्यक्रमात ‘भारत के गरीब’ हे बॅनर लावले होते. यामागचे कारण न समजल्याने कवीमन शंकातुर झाले आणि कवीने ‘भारत पुअर’ ही कविता लिहिली.
स्वत:चे दु:ख, अवतीभवतीच्या समाजातील दु:ख, पर्यावरणाचा गंभीर प्रश्न, भारत-चीन संघर्ष, इतर देशांतील प्रवासादरम्यान तेथील संस्कृतींचे आलेले अनुभव या साऱ्यांचा वेध घेत कुरुप यांनी काव्यलेखन, गीतलेखन केले. त्यांची ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली, अनेक सन्मानही प्राप्त झाले. प्रगतीवादी लेखक संघाचे अध्यक्ष (१९९३), साहित्य अकादमी, दिल्लीच्या कार्यकारिणीचे सदस्य, केरळमधील केरळ कलामंडळाचे अध्यक्ष (१९९६-२००१) अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. तसेच पद्मश्री, केरल साहित्य अकादमी पुरस्कार, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, वयलार पुरस्कार व (गीतलेखनासाठी) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com