सध्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावंतवाडी हे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे राजधानीचे शहर होते. ५५० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या सावंतवाडी संस्थानात दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि उत्तर गोव्यातील बिचोलिम, पेडणे आणि सत्तारी या गावांचा अंतर्भाव होता. सावंतवाडीचे मूळ नाव सुंदरवाडी. बऱ्याच वेळा सुंदरवाडीचा उल्लेख ‘वाडी’ किंवा ‘वारी’ असाही आढळतो. उदयपूरच्या सिसोदिया घराण्याचा मांग या तरुणाने सुंदरवाडी परिसरात रोजगारासाठी वास्तव्य केल्यावर सावंत-भोसले हे उपनाव लावले. त्याचा मुलगा फोंड सावंत हाही वडिलांप्रमाणे आदिलशाहीत नोकरी करीत होता. त्याचा मुलगा खेम सावंत प्रथम याने १६२७ मध्ये आदिलशाहकडून देशमुखी मिळविली. खेम सावंताने वाडीच्या आसपासचा काही प्रदेश घेऊन आपले छोटे राज्यही स्थापन केले. आदिलशाही फौजेच्या मराठय़ांशी झालेल्या युद्धात खेम सावंत आदिलशाहबरोबर होता. त्याच्यानंतर गादीवर आलेल्या खेम सावंत द्वितीयची कारकीर्द इ.स.१६७५ ते १७०९ अशी झाली. त्याने पोर्तुगिजांना नामोहरम करून मोठा राज्यविस्तार केला. अठराव्या शतकातील खेम सावंत तृतीय याने विविध कलाकारांना राजाश्रय दिला. सावंतवाडी परिसरात आढळणाऱ्या पांगारा झाडाचे लाकूड हलके आणि कोरीव काम करण्यासाठी उपयुक्त आहे हे त्याने हेरून आंध्र आणि राजस्थानातल्या काष्ठ कारागिरांना उत्तेजन देऊन सावंतवाडीत वसविले. हे कारागीर लाकडी खेळणी, मुखवटे, लाकडी फळे, बाहुल्या आणि लाखेच्या बांगडय़ा तयार करण्यात वाकबगार होते. त्याचप्रमाणे इराण, टर्की या देशांत पूर्वी खेळल्या जाणाऱ्या ‘गंजीफा’ या पत्त्यांचा प्रकारासाठी लाकडाच्या, चितारलेल्या चकत्या तयार करण्यातही त्यांचा हातखंडा होता. ६०-७० कुटुंबांना पोसणारा हा व्यवसाय सावंतवाडीत चांगलाच फोफावला.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
कुतूहल
धागा धागा अखंड विणू या..
धागा धागा अखंड विणू या। विठ्ठल विठ्ठल मुखें म्हणू या, अक्षांशाचे रेखांशाचे. उभे आडवे गुंफुनी धागे. विविध रंगी वसुंधरेचे ..वस्त्र विणिले पांडुरंगे
किती सुंदर भक्तिगीत. अक्षांश आणि रेखांशांच्या उभ्या- म्हणजे वार्प आणि आडव्या – म्हणजे वेफ्ट धाग्यांनी विणून विविध रंगांचे वस्त्र वसुंधरेसाठी स्वत: परमेश्वराने बनविले अशी ही संकल्पना साऱ्या वस्त्रोद्योगाला गौरवास्पद आहे. ही संकल्पना तशी काल्पनिक भासली तरी अक्षांश – रेखांशांसारखे विस्तृत व घनिष्ठ आपले मार्केटिंग नेटवर्क असावे. अगदी जगभर पसरलेले. असे प्रत्येक वितरकाला वाटत असते. तशा शक्यताही पडताळून पहिल्या जात असणार आणि मग आपल्या कंपनीला साजेसा असा आपल्या पुरवठा साखळीचा डोलारा उभा राहतो. त्यात कालानुरूप बदलही करावे लागतात. घाऊक विक्रेत्यांची शृंखला ही वस्त्रोद्योगातील पारंपरिक देशांतर्गत वितरणासाठीची मुख्य प्रणाली. मुंबई तसेच अहमदाबाद ही प्रमुख वितरण केंद्रे मानली जायची. मुंबईच्या प्रसिद्ध मूळजी जेठा मार्केटला सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. कालांतराने आपल्या देशातील इतर प्रमुख शहरेही अर्धघाऊक बाजारपेठ म्हणून विकसित झाली. काही उत्पादकांनी थेट अर्धघाऊक बाजारपेठांत आपले वितरक नेमले तर काहींनी किरकोळ बाजारपेठेला प्रमुख स्थान दिले. तरीही बऱ्याच प्रमाणात आजही घाऊक अथवा अर्धघाऊक प्रणाली अस्तित्वात आहे. गेल्या चार दशकांत रेडीमेड गारमेंट्सकडे उपभोक्त्यांचा कल वाढलेला आहे. समाजाकडे खर्चाला उपलब्ध पसा वाढत गेला. ग्राहकांच्या अभिरुचीत परिवर्तन होऊ लागले. फॅशनचे महत्त्वही वाढत गेले. ग्राहकांच्या अभिरुची समजून घेत त्यांना समर्पक साद देण्याची गरज भासू लागली. मोठय़ा प्रमाणात वैयक्तिक ठोकताळ्यांवर अवलंबून राहणाऱ्या या उद्योगास ग्राहकांच्या मनाचा कानोसा घेण्यासाठी सोयीनुसार औपचारिक आणि अनौपचारिक बाजारपेठेची माहिती मिळू शकणाऱ्या पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक वाटू लागले. बाजारात स्पर्धाही खूप तीव्र झाली. वितरणाबरोबरच उत्पादन विविधतेमध्ये कालानुरूप नावीन्यपूर्ण बदल करणे आवश्यक झाले. या सर्व आव्हानांना ग्राहक देवतेस केंद्रस्थानी मानून व्यावसायिकता अंगीकारत सामोरे जावे लागणार हे नि:संशय. मार्केटिंग तसं बघितलं तर ग्राहक देवतेची खऱ्या अर्थाने साधनाच म्हणावयास हवी. उत्पादक कंपन्या, त्यांचे वितरक तसेच वितरणास हातभार लावणारे एजंट्स हे सर्व या साधनेत सहभागी असतात अगदी. तहे दिल से, ग्राहकदेवताय नमो नम:.
ल्ल सुनील गणपुले (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org