सध्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावंतवाडी हे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे राजधानीचे शहर होते. ५५० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या सावंतवाडी संस्थानात दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि उत्तर गोव्यातील बिचोलिम, पेडणे आणि सत्तारी या गावांचा अंतर्भाव होता. सावंतवाडीचे मूळ नाव सुंदरवाडी. बऱ्याच वेळा सुंदरवाडीचा उल्लेख ‘वाडी’ किंवा ‘वारी’ असाही आढळतो. उदयपूरच्या सिसोदिया घराण्याचा मांग या तरुणाने सुंदरवाडी परिसरात रोजगारासाठी वास्तव्य केल्यावर सावंत-भोसले हे उपनाव लावले. त्याचा मुलगा फोंड सावंत हाही वडिलांप्रमाणे आदिलशाहीत नोकरी करीत होता. त्याचा मुलगा खेम सावंत प्रथम याने १६२७ मध्ये आदिलशाहकडून देशमुखी मिळविली. खेम सावंताने वाडीच्या आसपासचा काही प्रदेश घेऊन आपले छोटे राज्यही स्थापन केले. आदिलशाही फौजेच्या मराठय़ांशी झालेल्या युद्धात खेम सावंत आदिलशाहबरोबर होता. त्याच्यानंतर गादीवर आलेल्या खेम सावंत द्वितीयची कारकीर्द इ.स.१६७५ ते १७०९ अशी झाली. त्याने पोर्तुगिजांना नामोहरम करून मोठा राज्यविस्तार केला. अठराव्या शतकातील खेम सावंत तृतीय याने विविध कलाकारांना राजाश्रय दिला. सावंतवाडी परिसरात आढळणाऱ्या पांगारा झाडाचे लाकूड हलके आणि कोरीव काम करण्यासाठी उपयुक्त आहे हे त्याने हेरून आंध्र आणि राजस्थानातल्या काष्ठ कारागिरांना उत्तेजन देऊन सावंतवाडीत वसविले. हे कारागीर लाकडी खेळणी, मुखवटे, लाकडी फळे, बाहुल्या आणि लाखेच्या बांगडय़ा तयार करण्यात वाकबगार होते. त्याचप्रमाणे इराण, टर्की या देशांत पूर्वी खेळल्या जाणाऱ्या ‘गंजीफा’ या पत्त्यांचा प्रकारासाठी लाकडाच्या, चितारलेल्या चकत्या तयार करण्यातही त्यांचा हातखंडा होता. ६०-७० कुटुंबांना पोसणारा हा व्यवसाय सावंतवाडीत चांगलाच फोफावला.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा