सीझरच्या खुनानंतर सिनेटला डावलून रोममध्ये इ.स.पूर्व ४३मध्ये स्थापन झालेले सरकार हे रोमच्या इतिहासातले दुसरे ट्रायमव्हिरेट. सीझरच्या हयातीत इ.स.पूर्व ६०मध्ये जुलियस सीझर, पॉम्पे आणि मार्कस क्रासस यांनीही अशा प्रकारे सिनेटला डावलून आपले ट्रायमव्हिरेट उभे केले होते. सीझरचा पुतण्या ऑक्टेव्हियनच्या तिघांच्या सरकारला पहिले आव्हान होते सीझरचे मारेकरी ब्रुटस आणि कॉशियसचे. त्यांचा नायनाट केल्यावर या सरकाराला एका आगळ्या आव्हानाला सामोरे जावे लागले. सत्तेतला भागीदार मार्क अॅन्टोनी याने सीझरची प्रेमिका क्लिओपात्राशी लग्न केले! क्लिओपात्राशी लग्न करून तिच्या मदतीने रोम जिंकून आपले अधिराज्य तयार करावे, असा मार्क अॅन्टोनीचा डाव होता. त्यातून तिसरे यादवी युद्ध पेटले. ऑक्टेव्हियनने अॅन्टोनी-क्लिओपात्रा संयुक्त सन्याचा पराभव केल्यावर त्याचे सामथ्र्य पाहून सिनेट आणि प्रजेने त्याला रोमच्या पहिल्या सम्राटपदी बसविले. क्लिओपात्रा आणि अॅन्टोनीने आत्महत्या केली. इ.स.पूर्व २७मध्ये ऑक्टेव्हियनला सम्राटपदी बसवून रोमन साम्राज्याची पायाभरणी झाली. पुढे हे साम्राज्य इ.स. ४७६पर्यंत टिकले. ऑक्टेव्हियनने सम्राटपद धारण करताना ऑगस्टस सीझर हे नाव धारण केले. ऑगस्ट सीझर युद्धनिपुण नव्हता, पण थोर मुत्सद्दी होता. त्याच्यानंतर त्याचा सावत्र मुलगा टैबेरियस रोमच्या सम्राटपदी आला. इ.स. १४ ते ६८ या काळात जुलीयो-क्लाडियन घराण्याच्या तबेरियस, कालिगुला, क्लाडियस आणि निरो या चार सम्राटांनी राज्य केले. हे चारही सम्राट त्यांच्या अतिटोकाच्या विक्षिप्तपणामुळे रोमन इतिहासात बहुचíचत आहेत. तबेरियस हा अत्यंत साधी आणि काटकसरी राहणीचा सम्राट प्रजाहितदक्ष म्हणून विख्यात होता. बदफैली स्त्रियांविरुद्ध त्याने केलेल्या कडक कायद्यातून पळवाट म्हणून अनेक विवाहित घरंदाज स्त्रिया स्वत:ला वेश्याव्यवसाय करीत असल्याचे घोषित करीत असत! आयुष्याच्या अखेरीला तबेरियस अति संशयी, क्रूर बनला. संशयातून आपली सून आणि नातू यांना त्याने ठार मारले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
सोनमोहोर.. ‘तांब्याची शेंग’
भारतीय नसूनही भारतात रुळलेल्या वृक्षांच्या यादीतलं एक नाव म्हणजे ‘सोनमोहोर’. दिसायला साधारण गुलमोहोरासारखा. फुलं पिवळी म्हणून ‘सोनमोहोर’. शेंगांचा रंग तांब्यासारखा असल्याने इंग्रजीत ‘कॉपर पॉड’, त्याचंच मराठीत भाषांतर ‘तांब्याची शेंग’. संपूर्ण कोवळ्या फांद्यांवर तपकिरी लव असते म्हणून ‘रस्टी शील्ड बेअरर’. अशी अनेक नावं मिरवणाऱ्या या झाडाचं शास्त्रीय नाव आहे, ‘पेल्टोफोरम फेरूजिनियम’ पेरोकारपम मूळ श्रीलंका, मलेशिया व उत्तर ऑस्ट्रेलियातला हा वृक्ष गुलमोहराच्या म्हणजे लेग्युमिनोसी, सीसॅल्पिनीऑइडी (िशबी) कुळातला आहे.
गुळगुळीत करडय़ा-तपकिरी, मजबूत खोडाचा, १२ ते २४ मीटपर्यंत उंच वाढणाऱ्या या पानझडी वृक्षाची वाढ भराभर होते, शिवाय छत्रही डेरेदार, त्यामुळे शहरांत रस्त्यांवर मुद्दाम लावलेला. दीड-दोन फूटी, गडद हिरवं, संयुक्त पिसासारखं (द्विगुणित पिच्छाकृती) गुलमोहोरापेक्षा मोठय़ा उपपर्णिकांचं पान. साधारण डिसेंबर-जानेवारीमध्ये पानगळ होते, नि फेब्रुवारीत पालवी येते.
फुलांचा बहर मार्च-मेपर्यंत तर कधी पुन्हा सप्टोंबर-नोव्हेंबरातही येतो. गंमत म्हणजे सोनमोहराचे वृक्ष एकदम फुलतीलच असं नाही. प्रत्येकाची ‘मेरी मर्जी’. एक पानोपानी फुललेला तर दुसरा कळ्या घेऊन फुलावं का, या विचारात. तिसरा सोनफुलं उतरवून तांबशेंगा मिरवणारा, तर चवथा कर्तव्य नाहीच्या थाटात, स्थितप्रज्ञासारखा!
सोनमोहराचे पानांतून आभाळाकडे झेपावणारे पिवळ्या फुलांचे तुरे विलोभनीय दिसतात. फुलोऱ्याच्या डहाळीवर खालच्या बाजूला फुललेली मंद सुवासिक पिवळी फुलं आणि वपर्यंत लहान-लहान होत गेलेल्या लालसर कळ्या दिसतात. फूल म्हणजे क्रेपच्या कागदासारख्या चुरगळलेल्या पाच सुटय़ा पिवळ्या पाकळ्या. पाकळ्यांना देठाजवळ तपकिरी तीट आणि तिथूनच बाहेर आलेले, पाकळ्यांपेक्षा लहान असे एका स्त्रीकेसरासहीत दहा नािरगी पुंकेसर.
सोनफुलांचा सोहळा संपता-संपता तांब्याच्या शेंगा डोकावू लागतात. बघता बघता सगळं झाड तांब्याचं होऊन जातं. साधारण दोन सें.मी.लांबीच्या, टोकदार, चपटय़ा शेंगेत २-४ बिया असतात.
‘शोभेचे झाड’ यापलीकडे सोनमोहोराचा फारसा उपयोग नसला तरी लाकडाचा उपयोग फíनचर बनवण्यासाठी होऊ शकतो. सालीपासून पिवळा रंग काढतात. साल कातडं कमावण्यासाठीही वापरतात. जावामध्ये सालीचा उपयोग आमांश, गुळण्यांसाठी, नेत्ररोगात डोळे धुण्यासाठी करतात. पानांत प्रथिने जास्त असल्याने गुरांसाठी चारा म्हणून वापरतात.
– चारुशीला जुईकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org