पिकांच्या मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेल्या पाण्याच्या फक्त एक टक्का पाणी पिकांच्या पेशीत साठवले जाते. वनस्पतीच्या पानांद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाला बाष्पोच्छवास म्हणतात. याचे प्रमाण खूप जास्त असल्याने हे कमी करण्याचा व्यावहारिक मार्ग सापडला, तर पिकांची पाण्याची गरज कमी होईल, दुष्काळी भागात तर याचे महत्त्व खूप असेल.
झाडातून होणारे बाष्पीभवन तीन प्रकारच्या घटकांवर अवलंबून असते. (१) हवामान व पर्यावरणीय घटक (सूर्यप्रकाश, आद्र्रता, तापमान, वारा)  (२) झाडाचे शरीरशास्त्र घटक (पर्णरंध्रे, त्यांची उघडझाप, पानांची संख्या, मुळांची खोली, कॅनॉपी) (३)  सिंचन पद्धती, वाऱ्याचा प्रतिरोध, खते हे बाष्पीभवन कमी करण्यासाठी नको असलेल्या वनस्पती काढून टाकणे, अनुत्पादक पानांची संख्या कमी करणे, काचघर, पॉलिथिन हाउस वापरून पिकांची वाढ करणे, वाऱ्याच्या दिशेने उंच झाडे लावणे या पद्धतींचा वापर करतात.
पॉलिथिन हाउस खूप खíचक असले तरी त्यामुळे पाण्याची मोठय़ा प्रमाणात बचत होते. या रचनेमध्ये हवामान व पर्यावरणीय घटक यांचा विचार केला आहे.
दुसऱ्या प्रकारच्या घटकांचा विचार करताना, ज्या पिकांच्या जाती कमी बाष्पोच्छवास करतील अशा जाती निर्माण करणे हा मार्ग वापरू शकतो. सूर्यकिरणे पानावर पडल्याने बाष्पीभवन होते. त्यांना परावर्तित करणारी द्रव्ये पानावर फवारली तर पानाचे तपमान कमी होते. त्यामुळे पानावाटे होणारा बाष्पोच्छवास कमी होतो. ही द्रव्ये पर्णरंध्रे बंद करीत नाहीत. तसेच प्राणवायू व कर्बवायूच्या आदानप्रदानात अडथळे आणत नाहीत. बाष्पोच्छवासरोधक द्रव्ये वापरूनही पाण्याचा अपव्यय कमी करता येतो. या द्रव्यांवर सध्या संशोधन सुरू आहे. पर्णरंध्रे बंद करणारी किंवा त्यावर फिल्मसारखे आवरण निर्माण करणारी द्रव्येही उपलब्ध आहेत. या द्रव्यांची किंमत, त्यांचे सूर्यप्रकाशामुळे, सूक्ष्मजीवाणूंमुळे होणारे विघटन, पिकांच्या चयापचयात निर्माण होणारा अडथळा यांचा विचार करूनच या द्रव्यांचा वापर करावा लागतो.
तिसऱ्या प्रकारचे घटक विचारात घेताना, सिंचनाच्या प्रवाही पद्धतीत ठिबकपेक्षा जास्त बाष्पीभवन होणार, म्हणून पाणी मुळाशी देण्याचा विचार करतात. मातीचे नळकांडे भूमिगत करून हे साध्य करता येते.

जे देखे रवी.. – वाचणे आणि लिहिणे/ कुंडलिनी
मागच्या लेखात माझ्या एके काळच्या रिकामटेकडेपणाबद्दल लिहिले होते. तेव्हापासून वाचणे आणि नंतर काही काळानंतर लिहिणे ही एक सवयच करून घेतली आहे. या दोन्ही गोष्टी स्वस्त, सुंदर आणि मजबूत आहेत, अशी माझी समजूत आहे. विशेषत: विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या वाचनाने जो प्रकाश डोक्यात पडतो तो मोठा लखलखीत असतो. हल्लीचेच वाचलेले इथे उतरवतो. आपल्या शरीरात १०००,०००,०००,००० गुणिले दहा एवढय़ा पेशी असतात; परंतु १०००,०००,०००,००० गुणिले शंभर म्हणजे पेशींच्या दहापट इतर जिवाणू असतात. आपल्या पेशींमध्ये २३,००० प्रकारची जनुके असतात, म्हणजे हे जे जिवाणू आपल्यात राहतात त्यांची जनुके त्याच्या दसपट असतात. यांचा आणि आपला सहप्रवास शांततापूर्ण असतो. हे जिवाणू आपल्यातल्या टाकावू गोष्टी खाऊन जगत असले तरी ते आपल्याला मदतही करतात. अन्नाचे विघटन करून ते शोषण्याच्या आपल्यातल्या प्रक्रियेला मदत करतात, काही जीवनसत्त्वे बनवितात. आपल्याला उपद्रव देणाऱ्या जिवाणूंचा नाश करतात. तेव्हा आपण ज्याला ‘मी’ म्हणतो तो ‘मी’ नसतोच तर तो ‘मी’ खरेतर ‘आपण’ किंवा ‘आम्ही’ असतो. हे जिवाणू सर्वत्र असले तरी मुख्यत: आतडय़ात आणि त्वचेत राहतात. आता एक मोठी घृणास्पद गोष्ट सांगतो. आधुनिक औषधे घेतल्यामुळे हे जिवाणू मृत्युमुखी पडण्याचा संभव असतो. जर ते अब्जावधीने मेले तर शरीर दुबळे होते. म्हणून आता एक नवीनच प्रयोग सुरू झाला आहे. त्यात निरोगी माणसाचे जे मल सकाळी बाहेर टाकले जाते ते मल पाण्यात मिसळून एका नळीद्वारे (एनिमा) रोगी माणसाच्या गुदद्वारातून आत घातले जाते, जेणेकरून रोग्याच्या आतडय़ाला या आपल्या मित्र जिवाणूंचे दान मिळेल आणि प्रकृती सुधारायला मदत होईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कुंडलिनी विद्येची भूमिका थोडीफार अशीच आहे. सोनखत, शेणखत हे प्रकार आपल्याला माहीत आहेतच. हे नैसर्गिक खत सर्वात उत्तम असते. हे मोठय़ा टाकीमध्ये टाकून त्यातून येणारा वायू जळण म्हणून वापरता येतो. हे निसर्गातल्या चैतन्याचे एक रूपच असते. कुंडलिनी विद्येचे म्हणणे असे आहे की, जर एका ठरावीक आसनात गुदद्वारावर दबाव आणून आपल्या आतडय़ाला मल-वायू जर वर वर नेता आला तर हा वायू त्याच्यातल्या नैसर्गिक चैतन्य ऊर्जेद्वारे आपल्या शरीरातली हाडे किंवा मांस किंवा इतर इंद्रिये त्यांच्यातले जडत्व नाहीसे करून त्यांचा फडशा पाडतो आणि निखळ चैतन्याचे अस्तित्व जागवितो. अर्थात ही विद्या किंवा त्याचे प्रात्यक्षिक झालेले नाही. हा आत्मानुभव असतो आणि तो सिद्ध करणे अवघडच. किंबहुना या भानगडीत तू पडू नकोस मर्यादेत राहा आणि कर्म करीत बस, असाच संदेश श्रीकृष्ण अर्जुनाला देतो असेच ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

Borgaonkarwadi parking lot, Kalyan,
सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…

वॉर अँड पीस     – डोळय़ाचे विकार : भाग ३
अनेकानेक नेत्र विकारांत पुढील प्रकारे कारणे संभवतात
१) डोळ्यांची लाली – जागरण, उन्हात हिंडणे, डोळे चोळणे, रडणे, चिंता, फार काळ काम करणे. खूप तिखट, आंबट, खारट, उष्ण पदार्थ खाणे, चहा, दही, मिरच्या, मांसाहार, दारू, सिगारेट, तंबाखू यांचा अतिरेक.
२) खुपऱ्या, खाज व पू – थंड, शिळे/आंबट/खारट जास्त खाणे. गार वारे लागणे, सर्दी, ताप, शौच साफ न होणे. जागरण अतिश्रम.
३) रांजणवाडी – परसाकडे साफ न होणे. उष्ण, गरम, तिखट, आंबट, खारट, मांसाहार यांचा अतिरेकी वापर.
४) पाणी येणे – वाचनाचा व बघण्याचा ताण, जागरण, गार वारे,  धूळ सहन न होणे, तीव्र व घाण वासाच्या वायूमध्ये काम करणे. शरीरातील मांसल भाग कमी होणे व काम, चिंता यांचा ताण वाढणे.
५) डोळे येणे – डोळ्यांची साथ असणे, घाणेरडे कपडे, रूमाल, टॉवेल, पंचा यांना डोळे पुसणे, खराब वायूशी सतत संपर्क येणे.
६)ऱ्हस्वदृष्टी वाढणे – अनुवंशिकता, बारीक अक्षरांचे कमी उजेडात झोपून किंवा वाहनांचे प्रवास करताना वाचन, अकाली दात काढणे, तीव्र उजेडात संरक्षणाशिवाय काम.
७) मोतीबिंदू – पन्नाशीचे पुढे वय असणे. बारीक अक्षरांचे कमी उजेडात वाचन. मज्जारज्जूस काही कारणाने धक्का पोहोचणे.
८) फूल पडणे – व्रण होणे. तापाच्या साथीत डोळ्यावर सारा किंवा फूल येऊन तसेच कायमचे स्वरूप राहणे.
डोळ्याच्या विविध तक्रारींकरिता रोगपरत्वे हवामान, विविध ऋतू, वय, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती यानुसार अनेकानेक उपचार आहेत, पण सामान्यपणे पुढील पथ्यापथ्याचे नियम पाळल्यास बहुसंख्य नेत्रविकारात तुरंत आराम मिळतो. मलमूत्रादी नैसर्गिक वेग अडवू नये, जेवणावर जेवण टाळावे. धूळ, धूर, विषारी वायू व खूप ऊन, गार वारे, कोंदट हवा जागरण किंवा अति वाचन, अतिश्रम अति उजेड या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. दही, मासे, लोणची, पापड, डालडा, मिसळ हे पदार्थ डोळ्याला हितकारक नाहीत.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ३० मार्च
१९०९ > अहिल्या, राणी पद्मिनी, राजकन्या संयोगिता आदी कथाकाव्ये व अनेक कविता लिहिणारे ‘कवि विनायक’ ऊर्फ विनायक जनार्दन करंदीकर यांचा ३७व्या वर्षी प्लेगने मृत्यू. त्यानंतर  ‘कविता विनायकाची’ हा त्यांचा संग्रह संपादित-प्रकाशित झाला.
१९४२ > कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि रेखाचित्रकार वसंत आबाजी डहाके यांचा जन्म. ‘योगभ्रष्ट’ या दीर्घकवितेमुळे ते प्रकाशात आले. ‘शुभवर्तमान’, ‘शुनशेप’ हे काव्यसंग्रह, ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या, ‘यात्रा-अंतर्यात्रा’ हे चिंतनपर ललितलेखन व ‘मालटेकडीवरून’ , या लेखनाखेरीज त्यांचे समीक्षालेखन आणि साहित्यविषक सैद्धान्तिक लिखाण महत्त्वाचे आहे. चंद्रपूर येथील (२०१२) अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९७८ > ‘आपटय़ाची पाने’ (विनोदी कविता) ‘माझ्या व्यवसायातील गमतीजमती’  या पुस्तकांतून मिष्किलपणे समाजनिरीक्षण नोंदवणारे वकील गोपाळ लक्ष्मण आपटे यांचे निधन. त्यांनी नाटकेही लिहिली होती.
१९८९ > ‘सोबत’साप्ताहिकाचे संपादक व तेथील लिखाणाचे ‘सोबतचे पहिले पान’ (४ खंड) , ‘हरवलेले पुणे’ आदी संग्रह तसेच अनेक कादंबऱ्या अशी ३० हून अधिक पुस्तके लिहिणारे ग. वा. बेहेरे यांचे निधन.
– संजय वझरेकर

Story img Loader