देवमासा आणि त्याच्याच कुळातल्या डॉल्फिन आणि पॉरपॉइज या प्राण्यांच्या उत्क्रांतीची कथा मोठी रंजक आहे. त्यांच्यातल्या एका प्राण्याला आपण ‘देवमासा’ म्हणतो. शिवाय हे प्राणी जलचर असून अगदी माशांसारखे दिसतात. तथापि ते मत्स्यवर्गीय प्राणी नाहीत. ते आहेत सस्तन प्राणी. कल्ल्यांद्वारे ते पाण्यातला ऑक्सिजन घेत नाहीत. पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन फुप्फुसांद्वारे हवेतला ऑक्सिजन घेतात. त्यांची मादी अंडी घालत नाही. तर पिल्ले आईच्या पोटातून जन्म घेतात आणि आईच्या दुधावर पोसतात.

जीवाश्मांचा अभ्यास सांगतो, की इओसीन नावाच्या कालखंडात, म्हणजे साडेपाच ते साडेतीन कोटी वर्षांपूर्वी, जमिनीवर राहाणारे, पण पाण्याकाठी उगवणाऱ्या वनस्पतींवर जगणारे काही समखुरी (आर्टिओडॅक्टायला) सस्तन प्राणी होते. ते या प्राण्यांचे पूर्वज होते. शत्रू आला की ते झाडीमागच्या पाण्यात लपत. जसजसे ते पाण्यात जास्त काळ राहू लागले, तसतसे त्यांच्यात पाण्यात राहण्यासाठी आणि पोहण्यासाठी अनुकूल असे बदल घडून येऊ लागले. पुढच्या पायांचे रूपांतर वल्ह्यांसारख्या परांमध्ये (फ्लिपर) झाले. थंडीपासून रक्षणासाठी असणारे त्वचेवरचे दाट केस जाऊन पाण्यात राहण्यासाठी त्वचेखाली चरबीयुक्त जाड थर (ब्लबर) आले. मागच्या दोन पायांचे रूपांतर सशक्त शेपटीत होऊन शरीर लांबट झाले. पाण्याच्या पृष्ठभागापाशी येऊन, डोके बाहेर काढून हवेत श्वासोच्छवास करणे शक्य व्हावे, यासाठी नाकपुड्या हळूहळू डोक्याजवळ सरकल्या.

मग समुद्रातले छोटे प्राणी आणि वनस्पती यावर त्यांची गुजराण होऊ लागली. अन्न मिळवण्यासाठी काही जातींमध्ये दातांच्या जागी ‘बलीन’ नावाचे, फणीसारखे फटी असणारे अवयव विकसित झाले. पाणी तोंडात घेऊन तोंड मिटले, की फटींमधून पाणी बाहेर निघून जाते, छोटे प्राणी तोंडातच राहातात. ते गिळून हे प्राणी आपले पोट भरतात.

देवमाशाची पिल्ले आईच्या पोटात असताना सुरुवातीच्या काळात गर्भाला अगदी छोटे, मागचे दोन पाय असतात. पण जन्माला येईपर्यंत त्यांचे रूपांतर जाडजूड शेपटीत झालेले असते. गर्भाची वाढ म्हणजे उत्क्रांतीची संक्षिप्त आवृत्ती (रीकॅपिच्युलेशन) असते. देवमाशाच्या पिल्लांची गर्भावस्थेतली ही वाढ उत्क्रांतीच्या टप्प्याचा पुरावाच आहे.

पाण्याकाठी राहाणारे समखुरी पूर्वज आणि आजचे देवमाशाच्या कुळातले प्राणी यांच्यातला दुवा म्हणजे जीवाश्मांमुळे माहिती झालेला, चार कोटी वर्षांपूर्वीचा बॅसिलोसॉरस नावाचा सागरी जलचर प्राणी. तोही अवाढव्य होता. त्याचे मागचे पाय शेपटीत पूर्णपणे रूपांतरित झाले नव्हते. पण पुढच्या पायांच्या जागी पर होते. देवमाशाचे कुळ सोडून सील, वॉलरस, ड्युगाँग आणि मॅनाटी असेही अन्य काही सस्तन प्राणी जलचर आहेत.

डॉ. श्वेता चिटणीस 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org