डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
ताणाची व्यक्त- अव्यक्त कारणं अनेक असतात. आपल्या हातून योग्य प्रकारे, जास्तीत जास्त चांगलं काम व्हावं यासाठी काही वेळा ताण येतो, तो आवश्यक ताण असतो. या आवश्यक ताणामुळे फारशा चुका आणि त्रुटी न राहता चांगलंच काम हातून व्हावं यासाठी आपण प्रवृत्त होतो.
कधीकधी हा आवश्यक ताण हाताबाहेर जातो. याची लक्षणं शरीरात कुठे ना कुठे नक्कीच जाणवतात. अस्वस्थ वाटतं. हृदयाची धडधड वाढते. जे काम चालू आहे, जिथे आपलं लक्ष होतं, तिथून ते लक्ष उडतं. काहीतरी चुकीचं घडतंय, हे काम जमणार नाही असं वाटतं. पुन्हा त्या कामाकडे मन एकाग्र होत नाही. काहीही करू नये. नुसतं बसून राहावं असं वाटतं. आहे त्या परिस्थितीतून माघार निघून जावंसं वाटतं. याचा अर्थ आपल्याला कसलातरी ताण जाणवतोय.
हे ताण मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत कोणालाही येतात. मुलं हे सांगू शकत नाहीत. काही वेळेस मुलं रडण्यातून, किंचाळून, ओरडून, विरोध करून, गप्प बसून, सगळ्यांकडे पाठ फिरवून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलेले हे इशारे आपल्याला समजले पाहिजेत. काही मुलं ताण सहन करतात. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. पोटात दुखणं, ताप येणं, वजन कमी होणं ही शारीरिक लक्षणं असतात. पण आत काय चाललं आहे हे समजत नाही. चेहरा हसरा नसला, नजर स्वस्थ वाटली नाही तर मनात काहीतरी खळबळ माजलेली असू शकते.
हा ताण नराश्यापर्यंत (डिप्रेशन) जाणंही योग्य नाही. कारण यातून माणसाच्या हातून मोठय़ा चुका घडू शकतात. एका क्षणी असं होतं की माणसाला जगावंसं वाटत नाही. असे विचार मनात येणं वेगळं आणि तशी कृती होणं वेगळं!
नव्या संशोधनावरून असं दिसून आलं की स्वत:ची घृणा वाटणं, आपल्याने आता परिस्थितीवर कोणताही उपाय होऊ शकत नाही, सगळ्या आशा-अपेक्षा संपून गेल्या आहेत असं वाटणं आणि त्यापुढे जाऊन या सर्वावर उपाय म्हणून स्वत:ला मारून टाकायचं हे घडतं ते मेंदूतल्या क्विनोलिनीक अॅसिडच्या प्रभावामुळे!
या स्थितीपर्यंत माणसांनी जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं आधी त्याच्या स्वत:च्या आणि त्यानंतर आसपासच्या लोकांच्या हातात असतं.