महाराष्ट्रातील सोळा जिल्हे यंदा दुष्काळाने होरपळत आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. भविष्यातील पाण्याच्या संकटाचा अंदाज बांधून काही शेतकऱ्यांनी मात्र नियोजन करून ठेवले. माळीनगर (जि. सोलापूर) येथील कृषिभूषण सुरेश वाघधरे हे त्यातलेच एक. सोलापूर जिल्हा पाणीटंचाईच्या झळांनी हैराण झाला असताना सुरेश वाघधरे यांची शेती आणि पाच लाख कलमी रोपे असलेली रोपवाटिका हिरवीगार आहे. यामागे वाघधरे यांची तपश्चर्या आहे.
सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्यातील वाघधरे यांच्या घरची परिस्थिती फार बरी नव्हती. बी.कॉम.चे शिक्षण घेता घेता कधी दुसऱ्यांच्या शेतात, तर कधी कारखान्यात काम करून सुरेशरावांनी कुटुंबाला हातभार लावला. पुढे रीतसर नोकरीत मुख्य लेखाधिकारी पदापर्यंत प्रवास झाला. आई केशरबाई शेती करण्यासाठी सतत प्रेरणा देत होती. नोकरीत असतानाच एकरी दोन हजार याप्रमाणे त्यांनी २० एकर पडीक जमीन विकत घेतली. काही काळाने पूर्णवेळ शेती करण्यासाठी नोकरी सोडली. ‘हा निर्णय आतबट्टय़ाचा आहे’, असे काहींनी हिणवले. वाघधरे यांनी या पडीक जमिनीचे केलेले नंदनवन बघितल्यावर हा निर्णय किती हुशारीचा होता, हे सिद्ध झाले.
रासायनिक खतांच्या आधारावरील शेती भविष्यात परवडणार नाही, हे हेरून वाघधरे यांनी ११ देशी गाई पाळल्या. (आज त्यांची संख्या शंभरवर आहे) गायींच्या शेण-मूत्रावर आधारित सेंद्रिय शेती सुरू केली. ‘कमी खर्चाची सेंद्रीय शाश्वत शेती’ हा त्यांचा मंत्र होता. त्यात असंख्य प्रयोग केले. गोबरगॅस, त्यापासून वीजनिर्मिती, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क याबाबत स्वत:च्या अनुभवातून केलेले प्रयोग व त्यातील बदल अत्यंत यशस्वी ठरले. त्यामुळे शेतीचा खर्च झपाटय़ाने कमी होत गेला. कांदा, भुईमूग, केळी, ऊस, भाजीपाला, फुले अशा अनेक पिकांमध्ये त्यांनी यश मिळवले. पुढे शेतीपूरक व्यवसाय म्हणून केशर नर्सरी सुरू केली. केशर आंबा, आवळा, नारळ, चिकू यांची कलमे केशर नर्सरीत तयार होतात. या वृक्षांची दर्जेदार मातृकलमे त्यांनी देशभरातून धुंडाळून आणली. म्हणूनच केशर नर्सरीतली कलमे म्हणजे ‘शंभर नंबरी सोने’, असे समीकरण बनले.
सुनील चव्हाण (पुणे) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,
चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा