मानवी आयुष्याचा उद्देश यावर मत मांडणारे अस्तित्ववाद तत्त्वज्ञान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विकसित झाले. त्यानुसार साऱ्या वस्तू निर्माण होतानाच त्या कशासाठी आहेत, हे ठरलेले असते. म्हणजे पेन लिहिण्यासाठी, खुर्ची बसण्यासाठी आहे, हे नक्की असते. माणूस जन्माला येताना मात्र तो कशासाठी जन्माला आला आहे, हे ठरलेले नसते. तो वेळोवेळी जे निर्णय घेतो त्यानुसार त्याचे आयुष्य उलगडत जाते. अन्य साऱ्या वस्तूंचा उद्देश नक्की असतो. माणसाच्या आयुष्याला असा नक्की उद्देश कोणताही नाही. त्याचे अस्तित्व हाच उद्देश आहे, असे हे तत्त्वज्ञान सांगते; म्हणून याला अस्तित्ववाद- एग्झिस्टेन्शिअलिझम- म्हणतात. आपल्या देशातील बहुसंख्य लोक ‘सटवाई पाचव्या दिवशी बाळाचे भविष्य लिहिते’ असे मानतात. परदेशांतही अशा कल्पना आहेत, तसे तत्त्वज्ञानही आहे. स्पिनोझा हा तत्त्वज्ञ असेच मांडतो की, माणूस कोण होणार हे जन्माला येतानाच नक्की झालेले असते. आयुष्यात वेळोवेळी मी निर्णय घेतो असे त्याला वाटत असले, तरी तो भ्रम आहे. तो कोणता निर्णय घेणार हे आधीच ठरलेले असते.
हे म्हणणे अस्तित्ववादाने नाकारले. कारण ते स्वीकारले की प्रयत्न, संस्कार, नीतीचा उपदेश यांना काही अर्थच राहत नाही. एखादी इमारत बांधली जाते त्या वेळी तिची ब्ल्यूपिट्र तयार असते. माणसाच्या आयुष्याची अशी ब्ल्यूपिट्र नसते.
मात्र या विचाराचे दुसरे टोक असे की, माणसाचे आयुष्य हे अर्थहीन आहे! अशा अर्थहीनतेचे भान आले की, माणसाला एक पोकळी जाणवते, उदासी येते. या अवस्थेला ‘एग्झिस्टेन्शिअल क्रायसिस’ म्हणतात. ‘अर्थहीन भासे मज हा कलह जीवनाचा’ यासारखी ही अवस्था. पण माणसाचे आयुष्य ही कोरी पाटी असेल, तर त्यावर आपल्या कर्तृत्वाने माणूस लिहू शकतो! आयुष्य अर्थहीन असले तरी त्याला अर्थ देणे हे माणसाच्या हातात असते. आयुष्यात वेळोवेळी अनेक पर्याय उपलब्ध होतात, अनेक रस्ते दिसतात. त्या वेळी तो जे निर्णय घेतो, ते महत्त्वाचे असतात. घेतलेले निर्णय तो पुढील काळात बदलूही शकतो. इंजिनीअर झालेला माणूस आयुष्यभर तेच काम करतो असे नाही.. तो नंतर हॉटेल काढू शकतो, कादंबरी लेखक होऊ शकतो. आयुष्य अर्थपूर्ण करण्याची क्षमता माणसाकडे आहे. ती कशी विकसित करायची, हे सांगणारी ‘लोगो थेरपी’ नावाची मानसोपचार पद्धती त्याच काळात लोकप्रिय झाली. तिची माहिती उद्या घेऊ.
डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com