वाढती लोकसंख्या, वाढते औद्याोगिकीकरण, सिंचन व इतर गरजांसाठी केवळ भूपृष्ठावरील पाणी पुरेसे ठरत नाही. भूपृष्ठावरच्या पाण्याच्या कमतरतेमुळे आणि प्रदूषणामुळे पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी भूजलावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे अलीकडच्या काळात कूपनलिकांचे (बोअरवेल) प्रमाण खूप वाढले आहे. त्यासाठी भूजलाचा शोध घेणे अनिवार्य ठरते. त्यासाठी काही वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातात. भूजलाचा असा शोध घेण्याच्या प्रक्रियेला ‘भूजल अन्वेषण’ (ग्राउंडवॉटर एक्स्प्लोरेशन) म्हणतात. सामान्यत: त्यासाठी भूभौतिकीय सर्वेक्षण पद्धतींचा वापर केला जातो.

यामधे विद्याुत प्रतिरोधकता सर्वेक्षण (इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी), भूकंपलहरी तंत्रज्ञान (साईस्मिक वेव्ह्ज) व विद्याुत चुंबकीय (इलेक्ट्रो मॅग्नेटिक) या प्रमुख पद्धती आहेत. विद्याुत प्रतिरोधकता सर्वेक्षण ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पद्धत आहे; या पद्धतीत जमिनीची प्रतिरोधकता मोजण्यासाठी ठरावीक अंतरावरील विद्याुत अग्रांद्वारे (इलेक्ट्रोडस) विद्याुत प्रवाह जमिनीत सोडून, अन्य दोन विद्याुत अग्रांद्वारे जमिनीचा प्रतिरोध मोजला जातो. मिळालेल्या विद्याुत रोधकतेच्या वेधांकांवर (रीडिंग) गणिती प्रक्रिया करून अनुमान काढले जाते. जमिनीची प्रतिरोधकता जमिनीतील आर्द्रता व तापमानातील बदलांवर अवलंबून असते. ओलावा वाढला की प्रतिरोध कमी होतो; त्यामुळे शुष्क जमिनीच्या तुलनेत ओलावा असलेल्या जमिनीचा प्रतिरोध कमी असतो. या तत्त्वाचा या पद्धतीत वापर केला जातो.

भूकंप पद्धतीमध्ये भूकंपीय वक्रीभवन (साइस्मिक रिफ्रॅक्शन) व भूकंपीय परावर्तन (साइस्मिक रिफ्लेक्शन) अशा दोन पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी वक्रीभवन पद्धतीचा वापर भूजल शोधण्यासाठी केला जातो. या पद्धतीमध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर एक छोटासा आघात करून त्यातून निर्माण होणाऱ्या भूकंप लहरींना जमिनीत प्रवेश करून भूपृष्ठाखालील खडकांमध्ये वक्रीभवन होऊन परत भूपृष्ठावर येण्यासाठी लागणारा वेळ मोजला जातो. भूकंप लहरी या ध्वनी लहरींसारख्या असल्याने त्यांनी किती अंतर पार केले व त्यासाठी किती वेळ लागला हे शोधून काढता येते व त्यावरून खडकाची खोली काढता येते. खडकांवर आपटून परत येणाऱ्या लहरी मोजण्यासाठी जिओफोन (भूध्वनीसंवेदक) नावाचे उपकरण वापरले जाते.

विद्याुतचुंबकीय पद्धतीत अतिउच्च वारंवारतेच्या लहरी (हाय फ्रिक्वेन्सी वेव्ह्ज) जमिनीत सोडल्या जातात व त्याची यंत्राद्वारे नोंद घेतली जाते. मिळालेल्या माहितीवर योग्य गणिती क्रिया करून निष्कर्ष काढता येतो. विस्तीर्ण व दुर्गम भागातील भूजलाचा शोध घेण्यासाठी सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) व भौगोलिक माहिती प्रणालीचा (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) उपयोग केला जातो. सुदूर संवेदन तंत्रज्ञानाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांद्वारे व उपग्रहांद्वारे मिळालेली माहिती भूजलाचा शोध घेण्यात साहाय्यभूत ठरते.

डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org