इमारतीच्या आतील भिंतीपेक्षा बाहेरील भिंतींना सूर्यप्रकाश, तापमानातील बदल, पाऊस, वारा, हवेतील प्रदूषणकारी घटक इत्यादी अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. बाहेरील भिंतींना पाण्याचे व सांडपाण्याची पाइप यातून येणारी पाण्याची गळती, भिंतीला पडणारे तडे आणि वाळवी यांचा सामना करावा लागतो. अन्यथा त्या इमारतीच्या आयुष्यावर या सगळ्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. बाहेरील रंग इमारतीचे वरील धोक्यापासून संरक्षण करणारे असावे लागतात. तसेच इमारतीचा आकर्षकपणा वाढवणारे असतात.
या सर्व बाबींचा विचार करून इमारतीच्या बाहेरील बाजूला लावायचे रंग तयार केले जातात. त्यामध्ये सिमेंट पेन्ट, विशिष्ट पोताचा पेन्ट आणि अॅक्रिलिक इमल्शन पेन्ट असे तीन मुख्य प्रकार असतात. सिमेंट पेन्ट सर्वात स्वस्त असतात. त्यांची अनेक बाबतीतील परिणामकारकता कमी असते. त्याचा उपयोग एका वर्षांपेक्षा अधिक काळ होत नाही. बुरशीचा त्रास एका वर्षांत उद्भवतो. ही भिंत धुणे अडचणीचे ठरते. तसेच सूर्यप्रकाशात हा रंग फिका पडतो. हा रंग लावण्यापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी मारून भिंती ओल्या ठेवाव्या लागतात. त्यामुळे पाण्यावर होणारा खर्च वाढतो. विशिष्ट पोताच्या पेन्टच्या बाबतीत भिंतीचे संरक्षण चांगले होते, बुरशीचा त्रास कमी प्रमाणात होतो. हा रंग लावलेली भिंत सहज धुता येते. सूर्यप्रकाशामुळे रंग फिका होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे रंग टिकण्याचा कालावधी ३ ते ४ वर्षांपर्यंत वाढतो. धूळ मात्र मोठय़ा प्रमाणात साठते. पण पाण्याने धुतल्यास भिंत स्वच्छ करता येते. या रंगासाठी पाण्याचा वापर खूप कमी प्रमाणात करावा लागतो.
अॅक्रिलिक इमल्शन पेन्टचा वापर सर्वच दृष्टीने उजवा ठरतो. तसेच दीर्घकालीन फायद्याचा ठरतो. भिंतीचे संरक्षण उत्तम प्रकारे होते. विशिष्ट रसायनांच्या रंगातील वापरामुळे बुरशीचा त्रास होत नाही किंवा सहजी भिंत धुता येते. सूर्यप्रकाशात हा रंग उत्तम टिकून राहतो. धूळ चिकटून बसत नाही. पाण्याची गरज अत्यंत कमी असते. पाच ते सहा वष्रे हा रंग टिकून राहतो. या रंगाचे पापुद्रे निघून येत नाहीत हा एक आणखी फायदा आहे.
दिलीप हेल्रेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – जपून टाक पाऊल गडय़ा..
तू जपून टाक पाऊल गडय़ा, जीवनातल्या मुशाफिरा.. असा थेट संदेश देणारं गाणं अतिशय प्रभावीपणे आपल्यासमोर मांडतं. केसानं गळा कापणारे, दुसऱ्याला फशी पाडणारे दुर्जन जगात मातले आहेत, त्यामुळे जीवनाची वाटचाल करताना दुसऱ्यावर विश्वास टाकण्यासारखे महत्त्वाचे पाऊल, अरे मुशाफिरा, अत्यंत जपून टाक.. असा धडा या गाण्यातून शिकायला लावलाय.
प्रत्यक्षात प्रत्येकाला जीवनाची वाटचाल करताना, हातात हात घेऊन पुढे नेणारे, कधी पाठ थोपटून धीर देणारे, पुढच्या रस्त्याकरिता आपल्या अनुभवाची शिदोरी देणारेही भेटतात. त्यामुळे सत्य एकांगी नसते, बहुअंगी आणि पैलूदार असते, हे विसरून चालणार नाही.
जपून पाऊल टाकण्याच्या या सल्ल्यावर काही मर्मग्राही निरीक्षणं मांडायची आहेत.
त्यासाठी आपण आणखी एका रूपकाचा अथवा ‘मेटॅफर’चा वापर करू.
जपून पाऊल टाकण्याचा सल्ला आपण निसरडय़ा वाटेवरून चालताना आवर्जून दिला जातो. निसरडा रस्ता म्हणजे पाय घसरण्याची शक्यता बरीच असते. रस्ता शेवाळामुळे, चिखलामुळे असेल किंवा आणखी काही कारणानं निसरडा झाला असल्यास, त्याच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात. त्यामुळे आपण अधिक सजग होतो. पाऊल जपून टाकतो. तोल सांभाळतो आणि चाल मंदावून हळूहळू पुढे जातो. अनेकदा अशा ठिकाणी सूचनादर्शक पाटय़ा असतात. सहप्रवासी सावधानतेचा इशारा न मागताही देतात.
म्हणून दिसतं की, रस्ता निसरडा नसताना केळीच्या सालावरून घसरण्याचं प्रमाण किती तरी अधिक असतं. आपल्यासारख्या सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत बेजबाबदार असणाऱ्या समाजात रस्त्यावर अशा अनेक निसरडय़ा गोष्टी पडलेल्या असतात. त्यावरून पाय घसरतो का? कारण आपण रस्ता एरवी ठाकठीक असल्यानं बेसावध असतो.
आपलं आपल्या वाटचालीकडे लक्ष नसतं. आपापल्या दिशेनं कामाच्या घाईगर्दीत आपण झरझर चालतो आणि अशा एखाद्या बेसावध क्षणी हमखास घसरतो नि आपटतो.
रस्ता निसरडा असणं हे जगातलं एक अटळ वास्तव आहे. जीवनमार्गावर निसरडेपणा सांगून आडवा येत नाही. अचानक येतो, तर कधी त्याची पूर्वसूचना मिळाली तर मिळते.
जीवनमार्गाची वाटचाल करताना सावध राहाणं, हे अतिशय महत्त्वाचं. जीवनमार्गाच्या वाटचालीतल्या निसरडय़ा जागा म्हणजे मूल्यांची गल्लत करणं, चुकीच्या मोहात अडकून राहाणं, आपल्या अंतिम उद्दिष्टाचा विसर पडणं. या निसरडय़ा जागा खचितच अचानक, अनपेक्षितपणे आडव्या येतात. त्या जागा निसरडय़ा आहेत हेदेखील, खाली आपटल्यावरच कळतं.
गंमत आहे ना, जगणं म्हणजे! मित्रा, सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं तसं प्रेमात पाय घसरून पडणंही कदाचित जास्त महत्त्वाचं!!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – ईश्वराधिष्ठित धर्मापलीकडे..
‘‘विचार जेव्हा समुदायाची पकड घेतात, त्या वेळी ते सामाजिक शक्ती बनतात; असे एक सुप्रसिद्ध वचन आहे. धर्माधता ही दुर्दैवाने अशी विघातक सामाजिक शक्ती बनवण्यात आली. एका धर्माने हे सुरू केले की, कमी-जास्त प्रमाणात सर्वच धर्मात हे लोण पोहोचते. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन या धर्माचे नागरिक धर्माच्या नावाने संघटित होऊ लागतात. तोंडात उदात्त भाषा व आधुनिक विचार असतो; परंतु व्यवहार मात्र शेकडो अथवा हजारो वर्षांपूर्वीच्या धर्मतत्त्वज्ञानात सर्व उत्तरे शोधण्याचा असतो. धर्माधता राजकारणात आणली जाते. राजकीय स्वार्थासाठी तिला हिंसेची फोडणी दिली जाते. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता तर भंग पावतेच, पण आधुनिक संस्कृतीचा सारांश असलेली लोकशाही प्रणालीदेखील उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण होतो..’’
नरेंद्र दाभोलकर ‘समता-संगर’ (जून २०१४) या पुस्तकातील ‘प्रबोधन मोहिमेच्या निमित्ताने’ (३ एप्रिल १९९९) या लेखात धर्माधतेचे सार्वत्रिक स्वरूप सांगत त्याविषयी लढण्याचे उपाय सांगताना लिहितात –
‘‘धर्माधताविरोधी धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय एकात्मेसाठी प्रभावी प्रबोधन मोहीम या सर्व वातावरणात मुकाबला करू इच्छिते. तरुणांशी सतत संपर्क असल्याने आम्ही असे म्हणू शकतो की, आजच्या युवापिढीला मूल्यविाचर समजून घेण्याची एकूणच अनास्था आहे. तेव्हा ही मोहीम आकर्षकपणे, आक्रमकपणे चालवावी लागेल; ज्यामुळे तरुणांना भिडेल. घटनेतील धर्मस्वातंत्र्य हे राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक नीतिमत्ता, कायदा-सुव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्याचे मूलभूत हक्क या गोष्टींसाठी मर्यादित करता येते, हे पोहोचवावे लागेल. त्याचे आग्रह धरावे लागतील. महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांनी धर्मसंकल्पनांचा एक उन्नत-कृतिशील आशय लोकांसमोर उभा केला, तो जागवावा लागेल. ईश्वराधिष्ठित धर्मापलीकडे जाऊन अखिल मानवजातीला विवेकी आचार-विचाराचे स्वप्न सांगावे लागेल आणि वाढती जीवघेणी आर्थिक विषमता व त्यामुळे एकसंध समाजाला निर्माण झालेला गंभीर धोका या विरोधात कृतिशील असणाऱ्या सर्वाबरोबर मैत्रीचा विधायक हात पुढे करावा लागेल. त्यांचे सामथ्र्य एकत्रित करावे लागेल.’’