इमारतीच्या आतील भिंतीपेक्षा बाहेरील भिंतींना सूर्यप्रकाश, तापमानातील बदल, पाऊस, वारा, हवेतील प्रदूषणकारी घटक इत्यादी अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. बाहेरील भिंतींना पाण्याचे व सांडपाण्याची पाइप यातून येणारी पाण्याची गळती, भिंतीला पडणारे तडे आणि वाळवी यांचा सामना करावा लागतो. अन्यथा त्या इमारतीच्या आयुष्यावर या सगळ्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. बाहेरील रंग इमारतीचे वरील धोक्यापासून संरक्षण करणारे असावे लागतात. तसेच इमारतीचा आकर्षकपणा वाढवणारे असतात.
या सर्व बाबींचा विचार करून इमारतीच्या बाहेरील बाजूला लावायचे रंग तयार केले जातात. त्यामध्ये सिमेंट पेन्ट, विशिष्ट पोताचा पेन्ट आणि अॅक्रिलिक इमल्शन पेन्ट असे तीन मुख्य प्रकार असतात. सिमेंट पेन्ट सर्वात स्वस्त असतात. त्यांची अनेक बाबतीतील परिणामकारकता कमी असते. त्याचा उपयोग एका वर्षांपेक्षा अधिक काळ होत नाही. बुरशीचा त्रास एका वर्षांत उद्भवतो. ही भिंत धुणे अडचणीचे ठरते. तसेच सूर्यप्रकाशात हा रंग फिका पडतो. हा रंग लावण्यापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी मारून भिंती ओल्या ठेवाव्या लागतात. त्यामुळे पाण्यावर होणारा खर्च वाढतो. विशिष्ट पोताच्या पेन्टच्या बाबतीत भिंतीचे संरक्षण चांगले होते, बुरशीचा त्रास कमी प्रमाणात होतो. हा रंग लावलेली भिंत सहज धुता येते. सूर्यप्रकाशामुळे रंग फिका होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे रंग टिकण्याचा कालावधी ३ ते ४ वर्षांपर्यंत वाढतो. धूळ मात्र मोठय़ा प्रमाणात साठते. पण पाण्याने धुतल्यास भिंत स्वच्छ करता येते. या रंगासाठी पाण्याचा वापर खूप कमी प्रमाणात करावा लागतो.
अॅक्रिलिक इमल्शन पेन्टचा वापर सर्वच दृष्टीने उजवा ठरतो. तसेच दीर्घकालीन फायद्याचा ठरतो. भिंतीचे संरक्षण उत्तम प्रकारे होते. विशिष्ट रसायनांच्या रंगातील वापरामुळे बुरशीचा त्रास होत नाही किंवा सहजी भिंत धुता येते. सूर्यप्रकाशात हा रंग उत्तम टिकून राहतो. धूळ चिकटून बसत नाही. पाण्याची गरज अत्यंत कमी असते. पाच ते सहा वष्रे हा रंग टिकून राहतो. या रंगाचे पापुद्रे निघून येत नाहीत हा एक आणखी फायदा आहे.
दिलीप हेल्रेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा