पूर्वी वस्त्र म्हणजे मानवी शरीराला संरक्षणासाठी आवश्यक असलेले कवच, एवढेच त्याचे कार्य समजले जाई. भारतीय वस्त्रपद्धतींमध्ये परिवर्तन झालं. भारतीय वस्त्रविश्वाचं चित्र औद्योगिकीकरणानंतर व विशेषत: गेल्या दोन दशकांत जागतीकीकरणानंतर क्रांतिकारकरित्या बदललं. त्यामुळे जी वस्त्रपद्धती वर्षांनुवर्षे प्रचलित होती त्यात वेगाने बदल घडून आले. त्याला नुसतंच औद्योगिकीकरण कारणीभूत नसून भारतीय सिनेमादेखील त्यामध्ये सहभागी आहे. अगदी साधना कट किंवा काजोलचे फिट सलवार-कमीज, ते नूतन आणि वैजयंतीमाला यांच्या प्लेन एम्ब्रॉयडरी साडय़ा यांचा प्रभाव इतका होता की अशा प्रकारच्या कपडय़ांची मागणी ही वाखाणण्याजोगीच होती. १९७० ते २०१०च्या काळात दादा कोंडकेंच्या बर्मुडापासून ते हॅरिसन फोर्डच्या जीन्सपर्यंत तर माधुरी दीक्षितच्या पंजाबी ड्रेसपासून ते लोलो ब्रिजिडाच्या बिकिनीपर्यंत वस्त्रपद्धती कशा बदलत गेल्या हे पाहिलं तर लक्षात येतं, की टाइट सलवार-कमीज ते शॉर्ट स्कर्ट (मिनी, मिडी), पिंट्रेड टॉप्स, बेलबॉटम या उपभोक्त्याच्या लहरी गरजा पूर्ण करण्यात वस्त्र कमी पडले नाही. कशी मजा आहे पहा- जेव्हा कमतरता होती तेव्हा माणूस नुसतेच ते भागवून घेत नव्हता तर ते वस्त्र संपूर्ण अंग झाकेल इतके वापरण्याचा त्याचा रिवाज होता. त्या वेळी वस्त्र आताच्या तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध होते.
पूर्वी विणलेल्या वस्त्रांच्या पन्ह्य़ाची मर्यादा ९० सें.मी. होती, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ४.८२ मीटर पन्ह्य़ाचे वस्त्र उपलब्ध होऊ शकते. आता वस्त्र कमी वापरण्याची फॅशन प्रचलित आहे. यातील गमतीचा भाग बाजूला ठेवला तरी हे समजण्यासारखे आहे की, यामध्ये उत्पादन खर्च तर कमी होतोच पण पूर्वी ज्या पँटला वा स्त्रियांच्या उपयुक्ततेसाठी २.२५ मीटर कापड लागायचे ते काम आता फक्त १.३ मीटरमध्ये होते. वस्त्रपरंपरा श्रीमंत करण्यात भारतीय वस्त्रकारागिरांच्या कलाकुसर आणि कसबाचं योगदान पण बहुमूल्य आहे. ही कारागिरी व कलाकुसर कमी होत चालल्याबद्दल आश्चर्य व हळहळ वाटते. यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे आता अशा कलाकुसरीचं आणि कसबाचं काम अगदीच दुर्मीळ झालं आहे. याचा प्रत्यय पठणी, पोचंपल्ली, यावरील लेखांमध्ये अनुभवता येईल.
श्वेतकेतू , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर – ईस्ट इंडिया कंपनीचा वखार-विस्तार
सतराव्या शतकात केवळ व्यापाराच्या हेतूने ब्रिटिशांचे भारतात आगमन झाले त्या काळात ब्रिटिश आणि फ्रेंच राजवटींचा युरोपात तीव्र संघर्ष चालू होता. पोर्तुगीजांनी भारतात तत्पूर्वीच स्थिरस्थावर होऊन, मोगल दरबारात चांगले संबंध जोडून जकात माफी आणि इतर व्यापारी सवलती मिळविल्या होत्या. डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच या तिन्ही युरोपियन प्रतिस्पध्र्यावर युद्धात आणि मुत्सद्दीपणात मात करून, प्लासी आणि बक्सर युद्धातील विजयांनंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील आपली यशस्वी घोडदौड चालू केली. सुरत येथील ठाण्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील मछलीपट्टणम् येथे १६११ साली त्या प्रदेशातील राज्यकर्त्यांशी संबंध प्रस्थापित करून कंपनीने तेथे आपली वखार (म्हणजे व्यापारी तळ) स्थापन केली. ब्रिटिश लोक वखारीला ‘फॅक्टरी’ असे म्हणत. सन १६१९ मध्ये कंपनीने मद्रास येथे वखार स्थापन केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील व्यापाराचे बस्तान बसून १६४७ सालापर्यंत त्यांच्या २३ वखारी आणि ९० कर्मचारी असा व्याप वाढला होता. पोर्तुगिजांनी ब्रिटिशांना मुंबई बेट अंदण म्हणून दिले होते. ब्रिटिश राजवटीने पुढे मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपुर्द केले. त्यानंतर कंपनीने मुंबईत १६६८ साली आणि कलकत्त्यात १६९० साली आपल्या वखारी सुरू केल्या. अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आपला व्यापाराचा पाया भष्टद्धr(१३८)कम करीत असतानाच त्यात सुसूत्रता आणण्यासाठी तिने आपल्या मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या ठाण्यांवर गव्हर्नर नियुक्त केले. या तिन्ही ठिकाणांच्या गव्हर्नरांच्या कार्यालयांना ‘प्रेसीडेन्सी’ असे नांव पडले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com
अभंगधारा – ३. ऐलतटावर.. पैलतटावर
चहावाल्याच्या ‘चाय गरम’च्या तारस्वरानं वरच्या बर्थवर झोपलेल्या हृदयेंद्रला किंचित जाग आली. पडदा दूर करून तो खाली डोकावला. तिघे मित्र गप्पा ठोकत फराळ करीत होते. हृदयेंद्रकडे कर्मेद्राचं लक्ष गेलं.
कर्मेद्र – या.. सुप्रभात! प्रवासात तुम्ही फक्त शेंगदाणे, फळं खाता म्हणून आम्ही सुरू केलं.. चहा सांगू ना? की तोंड धुणार आधी?
हृदयेंद्र – तोंड पहाटेच धुतलंय. चहाच घेईन..
चौघांच्या हाती चहाचे छोटे प्याले आले. दिवाळीतल्या मातीच्या पणतीपेक्षा किंचित मोठय़ा व उभट अशा त्या ‘कुल्हड’मधील चहाला मातीचाही गंध होताच! हृदयेंद्रच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होता. ज्ञानेंद्रनं कुतूहलानं त्याच्याकडे पाहिलं. ‘काय झालं?’ असा मूक प्रश्न त्या नजरेत होता. हृदयेंद्र हसला आणि म्हणाला..
हृदयेंद्र – बराचसा अर्थ कळला..
योगेंद्र – कोणी सांगितला?
हृदयेंद्र – भिकाऱ्यानं!
ज्ञानेंद्र – काय? भिकाऱ्यानं? वेड लागलाय का?
प्रश्न ज्ञानेंद्रनं केला खरा, पण योगेंद्र आणि कर्मेद्रचं मनही त्याच प्रश्नानं विस्फारलं होतं! त्या तिघांकडे मंद स्मितकटाक्ष टाकत हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – ऐका तर! काल मध्यरात्रीनंतर झोप चाळवली. एक भिकारी डब्यात गात येत होता.
कर्मेद्र – या वातानुकूलित डब्यात? मध्यरात्री? आम्ही कुणीच नाही ऐकलं त्याला.
योगेंद्र – ऐकलं असतं तर हाकलंलं नसतं का?
हृदयेंद्र – मलाही हेच सारं वाटलं की हा डब्यात आलाच कसा आणि गाण्याची हिंमत करतोच कसा? मग ऐकलं की गातोयही मराठीत..
कर्मेद्र – (आश्चर्यानं) मराठीत?
हृदयेंद्र – हो एवढंच नाही तर तेसुद्धा ‘पैल तो गे काऊ’च!
‘काय?’ हा प्रश्न तिघांच्या मुखी उमटला. कर्मेद्रनं तर कुल्हडमध्ये चहाच आहे, याचीही खात्री करून घेतली!
हृदयेंद्र – हो रे.. आणि ते सुद्धा अगदी अशुद्ध स्वरांत.. शब्द मोडून तोडून.. त्या झोपेतच चरफडत ऐकलं.. जसजसं नीट ऐकू लागलो ना तसा अंगावर काटाच आला! त्या मोडतोडीतून अभंगाचा अर्थ सळसळत बाहेर पडत होता. ‘‘आगे आगे बढोगे तो अर्थ अपने आप समझ में आएगा,’’ या गुरुजींच्या शब्दाचंही प्रत्यंतर आलं. मी लगेच खाली उतरलो आणि डब्यात, दाराशी जाऊन सगळीकडे पाहिलं. कुठेच दिसला नाही तो.. पण काय गाऊन गेला!
ज्ञानेंद्र – असं काय गायला तो?
हृदयेंद्र – पैल तो गे काऊ कोऽहं कहता है! मग जाणवलं, ऐलतटावरच्या प्रपंचात मनसोक्त रुतलेल्या जिवाच्या मनात ‘कोऽहं’ हा मूळ प्रश्न उमटणं यापेक्षा सर्वात मोठा शुभशकुन कोणता? संकुचिताच्या हृदयात व्यापकाच्या आगमनाची ती खूणच नाही का? शुभसंकेतच नाही का?
योगेंद्र – व्वा!
ज्ञानेंद्र – पैल तो गे काऊ! ऐलतट आणि पैलतट!! मुंडकोपनिषदातला प्रसिद्ध मंत्रच आठवतो..
कर्मेद्र – आता हे उपनिषद कोणतं?
ज्ञानेंद्र – हे अथर्ववेदात आहे. ‘मुंडक’ हा शब्द ‘मुण्ड’ धातूपासून बनला आहे. मुण्ड म्हणजे मुंडन करणं. मनाचं मुंडण करून त्याला अज्ञानापासून सोडवणं. आत्मज्ञान हेच खरं ज्ञान आणि ते मिळवणं हाच मानवी जन्माचा हेतू आहे, हा या उपनिषदाचा घोषच आहे जणू. यातला प्रख्यात मंत्र आहे, ‘द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते..’ पुढचं आठवत नाही..
कर्मेद्रनं तोवर लॅपटॉप सुरू केलाही होताच. सर्वज्ञता किती ‘क्लिकसाध्य’ झाली आहे! तिघांकडे पाहात संस्कृत शब्दांशी झटापट करीत कमेंद्र म्हणाला, ‘‘शोधलंय मी! तयोरन्य: पिप्पलं स्वादु अत्ति अनश्रन अन्यो अभिचाकशीति।।’’
ज्ञानेंद्र – म्हणजे दोन पक्षी एकाच वृक्षावर राहातात. खालच्या फांदीवरचा पक्षी मधुर फळं खातो. वरच्या फांदीवरचा पक्षी स्वत: फळ न खाता नुसताच पाहातो. वृक्ष म्हणजे शरीर. दोन पक्षी म्हणजे जीव शिव. जीव सुख-दु:खंरूपी फळं खातो; आत्मा साक्षित्वानं राहातो.
कर्मेद्र – पण पैल तो गे काऊशी याचा काय संबंध?
ज्ञानेंद्र – सांगतो.. थोडा धीर धर..
चैतन्य प्रेम