पूर्वी वस्त्र म्हणजे मानवी शरीराला संरक्षणासाठी आवश्यक असलेले कवच, एवढेच त्याचे कार्य समजले जाई. भारतीय वस्त्रपद्धतींमध्ये परिवर्तन झालं. भारतीय वस्त्रविश्वाचं चित्र औद्योगिकीकरणानंतर व विशेषत: गेल्या दोन दशकांत जागतीकीकरणानंतर क्रांतिकारकरित्या बदललं. त्यामुळे जी वस्त्रपद्धती वर्षांनुवर्षे प्रचलित होती त्यात वेगाने बदल घडून आले. त्याला नुसतंच औद्योगिकीकरण कारणीभूत नसून भारतीय सिनेमादेखील त्यामध्ये सहभागी आहे. अगदी साधना कट किंवा काजोलचे फिट सलवार-कमीज, ते नूतन आणि वैजयंतीमाला यांच्या प्लेन एम्ब्रॉयडरी साडय़ा यांचा प्रभाव इतका होता की अशा प्रकारच्या कपडय़ांची मागणी ही वाखाणण्याजोगीच होती. १९७० ते २०१०च्या काळात दादा कोंडकेंच्या बर्मुडापासून ते हॅरिसन फोर्डच्या जीन्सपर्यंत तर माधुरी दीक्षितच्या पंजाबी ड्रेसपासून ते लोलो ब्रिजिडाच्या बिकिनीपर्यंत वस्त्रपद्धती कशा बदलत गेल्या हे पाहिलं तर लक्षात येतं, की टाइट सलवार-कमीज ते शॉर्ट स्कर्ट (मिनी, मिडी), पिंट्रेड टॉप्स, बेलबॉटम या उपभोक्त्याच्या लहरी गरजा पूर्ण करण्यात वस्त्र कमी पडले नाही. कशी मजा आहे पहा- जेव्हा कमतरता होती तेव्हा माणूस नुसतेच ते भागवून घेत नव्हता तर ते वस्त्र संपूर्ण अंग झाकेल इतके वापरण्याचा त्याचा रिवाज होता. त्या वेळी वस्त्र आताच्या तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध होते.
पूर्वी विणलेल्या वस्त्रांच्या पन्ह्य़ाची मर्यादा ९० सें.मी. होती, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ४.८२ मीटर पन्ह्य़ाचे वस्त्र उपलब्ध होऊ शकते. आता वस्त्र कमी वापरण्याची फॅशन प्रचलित आहे. यातील गमतीचा भाग बाजूला ठेवला तरी हे समजण्यासारखे आहे की, यामध्ये उत्पादन खर्च तर कमी होतोच पण पूर्वी ज्या पँटला वा स्त्रियांच्या उपयुक्ततेसाठी २.२५ मीटर कापड लागायचे ते काम आता फक्त १.३ मीटरमध्ये होते. वस्त्रपरंपरा श्रीमंत करण्यात भारतीय वस्त्रकारागिरांच्या कलाकुसर आणि कसबाचं योगदान पण बहुमूल्य आहे. ही कारागिरी व कलाकुसर कमी होत चालल्याबद्दल आश्चर्य व हळहळ वाटते. यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे आता अशा कलाकुसरीचं आणि कसबाचं काम अगदीच दुर्मीळ झालं आहे. याचा प्रत्यय पठणी, पोचंपल्ली, यावरील लेखांमध्ये अनुभवता येईल.
श्वेतकेतू , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा