जे शेवटचे हिमयुग होऊन गेले, त्यात सध्या हयात असणाऱ्या सस्तन प्राण्यांचे पूर्वज अस्तित्वात होते. त्यातले काही आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आजच्या प्राण्यांपेक्षा आकाराने मोठे होते. त्यांच्या जीवाश्मांवरून वैज्ञानिकांनी त्यांच्याविषयीची अत्यंत विश्वासार्ह माहिती संकलित केली आहे. गंमत म्हणजे त्या वेळी आपले रानटी अवस्थेत राहणारे पूर्वजही हिमयुगाचे संकट झेलत स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत होते. ज्या गुहेत ते राहात होते, त्या गुहेच्या भिंतींवर त्यांनी या महाकाय प्राण्यांची चित्रे काढून ठेवली आहेत. पुढे पर्यावरण प्रतिकूल झाले तेव्हा असे अवाढव्य प्राणी विलुप्त झाले.

या महाकाय प्राण्यांमध्ये एका मृग कुळातील प्राण्याचा समावेश होता. वैज्ञानिक त्याला ‘आयरिश एल्क’ या टोपणनावाने ओळखत असले, तरी तो एल्क या प्रकारचा प्राणी नव्हता. खरे तर एल्क हाही मृग कुळातील प्राणीच आहे. तथापि, या विलुप्त झालेल्या प्राण्याचे साधर्म्य एल्कपेक्षा काळविटाशी जास्त होते. तसेच तो फक्त आर्यलडमध्येच अस्तित्वात होता असेही नाही. वैज्ञानिकांना त्याच्या अस्तित्वाच्या खुणा सायबेरिया, जर्मनी, आर्यलड, स्पेन अशा उत्तर युरोपातील फार मोठय़ा पट्टय़ात आढळल्या आहेत. या आयरिश एल्कची उंची तीन मीटर होती. त्याची शिंगे जितकी मोठी होती, तितकी मोठी शिंगे मृग कुळातील कोणत्याही प्राण्याची नाहीत. उजव्या शिंगाच्या टोकापासून डाव्या शिंगाच्या टोकापर्यंतचे अंतर दोन मीटरहूनही अधिक होते.

सध्या अस्तित्वात असणाऱ्या काळविटांप्रमाणे आयरिश एल्कची शिंगेही दरवर्षी गळून पडत असत. विणीच्या हंगामात नवीन शिंगे फुटत. हिंस्र पशूंपासून आपले रक्षण करण्यासाठी, स्वजातीय नरांवर वचक बसवण्यासाठी आणि मादीला आकर्षित करण्यासाठी तो शिंगांचा उपयोग करून घेत असे. मादीला शिंगे नव्हती. मादी नरापेक्षा आकाराने लहानखुरी होती.

आयरिश एल्कच्या पाठीवर, मानेपासून काहीसे जवळ, छोटेसे विशड होते. वर्षांकाठी ऋतूमान चांगले असेल, तेव्हा त्या वाशिंडात चरबी साठत असावी. थंडीचा कडाका फारच वाढला आणि अन्नाची ददात भासू लागली की त्याला या चरबीचा उपयोग होत असे.

आयरिश एल्क विलुप्त होण्याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या देखण्या आणि तगडय़ा प्राण्यांचे शेवटचे अवशेष साडेसात हजार वर्षांपूर्वीचे आहेत. ते रशियात सापडले आहेत.

डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader