न उडणाऱ्या पक्ष्यांच्या ‘स्फेनीसिडी’ या कुळात सुमारे १७ प्रजाती ज्ञात आहेत. त्यापैकी पेंग्विन आपल्या परिचयाचा! दक्षिण गोलार्धातील अंटाक्र्टिक व उपअंटाक्र्टिक बेटांच्या बर्फाळ प्रदेशात, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील बेटांच्या समुद्रकिनारी पेंग्विन आढळतो. अतिशीत पाण्यात पोहण्यासाठी त्यांच्यात अनुकूलन दिसून येते. काळय़ा अथवा निळसर राखाडी आणि पांढऱ्या रंगसंगतीमुळे पोहताना ते पटकन नजरेस पडत नाहीत. शरीरातल्या मुबलक चरबीमुळे शरीर ऊबदार राहते. गुबगुबीत शरीर, निळय़ा जांभळय़ा रंगाची चोच, डोळय़ाभोवतीचा पिवळा किंवा लाल रंग यामुळे हा पक्षी आकर्षक दिसतो. छोटेसे परंतु मजबूत पाय शरीराचे वजन पेलू शकतात. पोहण्यासाठी व बर्फावर चालण्यासाठी त्यांच्या पायामधील पडद्यासारखी रचना सोयीची ठरते. वल्ह्यासारख्या पंखांचा त्यांना पोहताना उपयोग होतो. त्यांचा जीवनकाल १५ ते २० वर्षे असून ते अर्धे आयुष्य समुद्रात व उर्वरित जमिनीवर व्यतीत करतात.
हेही वाचा >>> कुतूहल: जागतिक ऑक्टोपस दिन
पेंग्विन नेहमी हजारांच्या संख्येने समूहात राहतात, पोहतात आणि स्थलांतरही करतात. निरनिराळे आवाज काढून एकमेकांशी संपर्क साधतात. शास्त्रज्ञांच्या मते एवढय़ा कलकलाटातूनही ते स्वत:च्या पिलाचा आवाज अचूक ओळखतात. एम्परर जातीचा पेंग्विन तर शिकारही समूहाने करतो. पेंग्विनच्या काही प्रजाती छोटे दगड, गोटे गोळा करून त्यांमध्ये अंडी घालतात तर काही प्रजाती घरटी बांधतात. प्रजनन काळात त्यांची एकच जोडी टिकून असते. अंडय़ातून पिल्ले बाहेर येण्यास सुमारे ३५ ते ४० दिवस लागतात. पुढे दोन महिन्यांपर्यंत नर व मादी त्यांची काळजी घेतात. पिल्लांचे रक्षणही सामूहिकरीत्या केले जाते. एम्परर जातीचा नर मात्र एकटय़ाने बालसंगोपन करतो.
पेंग्विन हा मांसाहारी पक्षी असून तो मासे, खेकडे, झिंगे, माकुल यांसारख्या छोटय़ा प्राण्यांचा आहार घेतात. पेंग्विनची सर्वात मोठय़ा आकाराची प्रजाती एम्परर पेंग्विन, तर फुटबॉलसारखा दिसणारा व सर्वात छोटा ४१ सेंटीमीटर उंचीचा तुराधारी (लिटल ब्लू पेंग्विन) पेंग्विन. या पेंग्विनच्या डोक्यावर पिवळय़ा रंगाचा डौलदार तुरा असतो. पेंग्विन माणसांना घाबरून दूर जात नाहीत. अशा या गोंडस पक्ष्यांची जागतिक स्तरावर घटत चाललेली संख्या ही चिंतेची बाब आहे. आययूसीएनच्या माहितीनुसार यांच्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
– डॉ. पूनम कुर्वे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org