साधारणपणे प्रत्येक नदी एक तर थेटपणे किंवा इतर कुठल्यातरी नदीशी संगम झाल्यानंतर समुद्राला जाऊन मिळते. पण भारतात एक अशी नदी आहे, की ती समुद्राला जाऊन मिळतच नाही. पण तिचे पाणी समुद्राप्रमाणे खारट मात्र आहे. या खारटपणामुळे या नदीचे नाव पडले आहे लवणावरी ऊर्फ लुणी. ‘लवणावरी’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे क्षारयुक्त नदी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लुणी नदी अरवली पर्वतरांगांमधल्या नाग टेकड्यांमध्ये उगम पावते. हे ठिकाण अजमेरजवळ आहे. या नदीची लांबी ४९५ किमी आहे. त्यापैकी ३३० किमी अंतर ती राजस्थानमध्ये पार करते. आणि उर्वरित भाग गुजरात राज्यात आहे. उगमानंतर ती ‘सागरमती’ या नावाने ओळखली जाते. गोविंदगड पार केल्यानंतर तिची उपनदी सरस्वती येऊन तिला मिळते. तिथून पुढे लुणी या नावाने तिला ओळखले जाते. ही थरच्या वाळवंटातली एक मोठी आणि महत्त्वाची नदी आहे. हिच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ ३७ हजार चौरस किमीपेक्षा जास्त आहे. अजमेर, नागौर, जोधपूर, बालोत्रा, पाली, जालोर, आणि सिरोही या राजस्थानमधल्या जिल्ह्यांतून वाहत वाहत ती गुजरातमध्ये प्रवेश करते आणि अखेरीस कच्छच्या रणात येऊन तिथल्या वाळवंटात लुप्त होते.

शुष्क प्रदेशातल्या काही छोट्या नद्या समुद्रापर्यंत पोचल्या नाहीत, तर त्यात नवल नाही. पण तुलनेने बरीच मोठी असूनही लुणी समुद्राला जाऊन मिळत नाही. थरच्या वाळवंटासारख्या शुष्क प्रदेशातून ती वाहत येते, त्यामुळे वाटेतच तिचे पाणी आटून जाते. लुणी नदी सागरापर्यंत पोचत नाही, म्हणून या नदीच्या जलनिस्सारणाचे (ड्रेनेज) वर्णन ‘अंतर्गत जलनिस्सारण’ असे करतात.

लुणीच्या मार्गात बालोत्रा नावाचे शहर येईपर्यंत तिचे पाणी सर्वसामान्य नदीप्रमाणे गोड असते. तिथून पुढे मात्र ते हळूहळू खारट होऊ लागते. ज्या प्रदेशातून ती वाहते तो दुष्काळी, अवर्षणग्रस्त आणि वाळवंटी असल्याने, बाष्पीभवन फार मोठ्या प्रमाणात वाढते. शिवाय, प्रवाहाबरोबर जे क्षार ती वाहून आणते, ते वाहून जात नाहीत. म्हणून पाणी खारट झालेले आहे.

लुणी नदीला फक्त पावसाळ्यात पाणी असते. वाळवंटाचा प्रदेश सपाट असल्याने येणारा पूर दूरवर पसरतो आणि आजूबाजूच्या भागांची सुपीकता वाढते. पिके चांगली येतात. पण उन्हाळ्यात मात्र नदी पूर्ण कोरडी पडते. या नदीवरील जोधपूर जिल्ह्यातल्या पिचियाक गावाजवळ १८९२ मध्ये जोधपूरचे महाराज जसवंतसिंह यांनी बांधलेल्या जसवंतसागर धरणामुळे मोठ्या प्रमाणात जमीन सिंचनाखाली आली आहे.

डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org