मेंडेलीव्हने १८७१ साली आवर्तसारणीच्या नियमांच्या आधारे एक भाकीत केले होते, ‘थोरिअम आणि युरेनिअम या दोन मूलद्रव्यांच्या मध्ये एक मूलद्रव्य असेल आणि नायोबिअम व टँटॅलमप्रमाणे याची ऑक्साइड 2O5 या प्रकारची असतील’. मेंडेलीव्हच्या भाकितानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे इ.स. १९०० मध्ये सर विलियम क्रुक्सने युरेनिअमच्या खनिजात एक नवीन मूलद्रव्याचे अस्तित्व असल्याचे दाखविले. या मूलद्रव्याला त्यांनी युरेनिअम (व) असे नाव दिले. पुढे व हे एक नसून दोन नवीन घटक व-१ आणि व-२ असल्याचे आढळले. पोलिश शास्त्रज्ञ कासिमीर फजान्स यांनी १९१३ साली व-२ म्हणजेच प्रोटॅक्टिअमचे २३४ अणुभार असलेले समस्थानिक शुद्ध स्वरूपात वेगळे काढले. ढं-२३४ अत्यंत अस्थिर समस्थानिक असून त्याचा अर्ध-आयुष्यकाल फक्त एका मिनिटाचाच आहे. कमी आयुष्य असलेल्या या मूलद्रव्याला फजान्सने ब्रेव्हिअम असे नाव दिले.

१९१७ साली जर्मन शास्त्रज्ञ लिझे माइटनर यांनी Pa-str हे स्थिर समस्थानिक वेगळे केले. याच वर्षी इंग्लंडमध्ये फ्रेडरिक सॉडी आणि जॉन क्रॅनस्टन यांनी देखील Pa-231 हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश मिळवले. या समस्थानिकाचा अर्ध-आयुष्यकाल ३३,००० वर्षे इतका आहे. या समस्थानिकाचे किरणोत्सर्गानंतर अ‍ॅनक्टिनिअममध्ये रुपांतर होते. ग्रीक भाषेत प्रोटोज (protos) म्हणजे प्रथम किंवा पालक. हे मूलद्रव्य अ‍ॅक्टिनिअमचे ‘पालक’ असल्याने त्याला प्रोटो-अ‍ॅक्टिनिअम असे नाव देण्यात आले. पुढे प्रोटो-अ‍ॅक्टिनिअमचे प्रोटॅक्टिनिअम असे नाव सर्वमान्य करण्यात आले. मेंडेलीव्हची आवर्तसारणी अणुभारावर आधारलेली होती. शिवाय त्या काळात समस्थानिकांविषयी काहीच माहिती नव्हती. तरीसुद्धा मेंडेलीव्हचे प्रोटॅक्टिनिअमचे भाकीत खरे ठरले. प्रोटॅक्टिनिअमचा अणुभार २३५ ऐवजी २३१ इतका भरला.

प्रोटॅक्टिनिअम चंदेरी रंगाचे आणि तीव्र किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. प्रोटॅक्टिनिअमची घनता १५.३० ग्रॅम प्रति घन सेमी तर वितलनांक १८४० अंश सेल्सिअस आहे.

निसर्गात अत्यंत दुर्मीळ असणारा प्रोटॅक्टिनिअम पिचब्लेंड या युरेनिअमच्या खनिजात अत्यल्प प्रमाणात आढळतो. अणुभट्टीत प्रोटॅक्टिनिअमची निर्मिती होते. १९६१ साली इंग्लंडच्या अणुऊर्जा विभागाने ६० टन वापरलेल्या अणुइंधनापासून १२५ ग्रॅम प्रोटॅक्टिनिअम धातू स्वरूपात वेगळा केला. तेव्हापासून जगात शुद्ध धातू-रूपात इतकाच प्रोटॅक्टिनिअम अस्तिवात आहे. स्वाभाविकच इतक्या दुर्मीळ मूलद्रव्याचे संशोधनाव्यतिरिक्त इतर कुठलेही ज्ञात उपयोग नाहीत.

– योगेश सोमण मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org