कोणतेही पीक काढायचे असेल तर शेतकरी सहसा बाजारात जाऊन त्याचे बियाणे खरेदी करतो. धान्य असो वा डाळी, कडधान्य असो वा तेलबिया, फळभाज्या असोत वा पालेभाज्या या विविध पिकांसाठी मुबलक वेगवेगळ्या प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत. यांच्यातून योग्य बियाणांची निवड कशी करायची, त्याकरिता कोणते निकष लावायचे, यासाठीचे अचूक मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळायला हवे. त्याच्या शेतजमिनीची गुणवत्ता, तेथील हवामान व पाऊसमान, पाऊस न पडल्यास पाण्याची पर्यायी व्यवस्था, पाण्याची उपलब्धता या सर्वाची अचूक माहिती त्याला असणे गरजेचे आहे. अनुभवाने यांतील काही बाबतीत शेतकरी सजग असतो. एकदा बियाणे खरेदी केल्यावर पेरणी करताना दोन रोपांमधील अंतर तसेच दोन रांगांमधील अंतर यांचेही ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे. भातासारखे पुनर्लावणी केले जाणारे पीक असेल तर याचा वापर पुढील टप्प्यांवर केला जातो. पण उत्पादनाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा घटक आहे. याचबरोबर पिकाला पाणी किती व केव्हा द्यायचे, पाऊस योग्य पडला तर केव्हा द्यायचे, कमी पडला तर केव्हा द्यायचे, नाही पडला तर केव्हा द्यायचे अशा सर्व बाजूंचा विचार होऊन तसे मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळायला हवे. त्याचबरोबर खते कोणती, किती, केव्हा द्यायची याचीही माहिती हवी. यासाठी माती परीक्षण केले असेल तर खूप सोयीचे ठरते. खताची मात्रा आवश्यक तेवढीच म्हणजे मर्यादित ठेवता येते. खर्च कमी व्हायला मदत होते. रासायनिक खते असतील तर खते कमी लागतील व पाणीही कमी लागेल. म्हणजे खर्च आणखी कमी होऊ शकतो. तणांचे नियंत्रण कसे करावे, त्यासाठी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे यांसारख्या बाबीही महत्त्वाच्या आहेत. अन्यथा मुख्य पिकाबरोबर तणही फोफावले तर उत्पादनावर दुष्परिणाम होणार हे नक्की. कीड नियंत्रणासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात, कोणत्या वेळी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी, त्याचे प्रमाण काय असावे अशी सगळी माहिती शेतकऱ्यांना हवी. सरतेशेवटी तोडणी केव्हा व कशी करावी, शेतमाल बाजारात कशा स्वरूपात न्यावा, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
– दिलीप हेल्रेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा