पृथ्वीवरील वातावरणात वनस्पतीसृष्टी ही इथल्या सजीवांच्या जगण्याचा भाग बनून आहे. हवेतल्या कार्बन डायऑक्साइड वायूचे सूर्यप्रकाशात अन्नात रूपांतर करून वनस्पती ऑक्सिजन वायू मुक्त करीत असतात. पृथ्वीवरील वाढती गर्दी लक्षात घेता, माणूस आता अंतराळात वस्ती करण्याचे स्वप्न पाहत आहे. साहजिकच वनस्पती सृष्टीची तिथे कुठेतरी वाढ करणे आवश्यक ठरणार आहे. तत्सबंधीचे प्रयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध अंतराळकेंद्रांत हाती घेतलेले आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाखाली झाडांची वाढ करणे शक्य आहे का, याचा अभ्यास सुरू आहे.
हायड्रोट्रोपी या तंत्राद्वारे ऑक्सिन या वनस्पती संप्रेरकचा वापर करून, संशोधक या अंतराळातील लागवडीविषयी प्रयत्नशील आहेत. जपानमधील एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सीने हा प्रकल्प हाती घेतला असून तिथे लागवड केलेल्या रोपांची मुळे कुठल्या दिशेने वाढत जातात, याचा मागोवा घेतला जात आहे. काकडीच्या बियांवर हा प्रयोग करताना अंतराळवीरांनी त्या बिया अंतरळात नेल्या आणि बियातून येणारी मुळे पाण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतात का याची पाहणी केली. या हायड्रोट्रोपीच्या प्रयोगात प्रथमत: बियांना अर्धा तास हायड्रोट्रोपी चेंबरमध्ये सुकविण्यासाठी ठेवण्यात येते. नंतर, पाणी किंवा क्षाराच्या द्रावणात बुडवून रुजण्यासाठी प्रवृत केले जाते. त्यानंतर चार-पाच तासांनी पाणी देण्यात येते. रुजलेल्या बिया गोठवून पृथ्वीवर आणतात व त्याचे विश्लेषण केले जाते.
या प्रयोगातून रेण्वीय पातळीवर रोपे कशी वाढतात याचा शोध शास्त्रज्ञांना घेता येईल. यातून वनस्पती वाढताना त्यांचा ग्राविटोपिसम (गुरुत्वाकर्षण) व हायड्रोट्रोपिसम (पाणी) यांच्या दिशेने असणारी ओढ नीटपणे पारखता येईल आणि त्यानुसार, वातावरणनिर्मिती करता येईल. वनस्पतीच्या संवेदना आणि त्यांच्या वाढीस कारणीभूत असणाऱ्या ऑक्सिजन या संप्रेरकाच्या विविध प्रमाणांमुळे होणारा परिणाम पडताळून संशोधक जनुकीय पातळीवर वनस्पतीच्या वाढीचा अभ्यास करीत आहेत. केवळ अंतराळातच नव्हे तर पृथ्वीवर पिके काढण्यासाठीदेखील हे हायड्रोट्रोपी तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे.
अंतराळातील दीर्घ प्रवासात वनस्पतीचा अन्न आणि ऑक्सिजनचा स्रोत म्हणून वापर करता यावा हा या संशोधनामागचा उद्देश आहे. विशेषत: मंगळावरील स्वारीसाठी हा शोध खूप फलदायी ठरू शकतो.
(दुसरा भाग पुढील बुधवारी)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा