वनस्पतींच्या संकरित जाती हा आधुनिक शेतीतला महत्त्वाचा भाग आहे. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी संकरित जातींचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. पण या संकरित जातींचं मूळ एकोणिसाव्या शतकातील ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केलेल्या संशोधनात आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
प्राणी असो अथवा वनस्पती, त्यांच्यातील गुणधर्म पुढील पिढीत कसे संक्रमित होतात, हे शोधून काढणं त्या वेळी महत्त्वाचं पण खूप आव्हानात्मक होतं. मागील पिढीकडून पुढील पिढीकडे होणारी गुणधर्माच्या संक्रमणाची प्रक्रिया सर्वात प्रथम शोधणारे शास्त्रज्ञ ग्रेगर जोहान मेंडेल होत. त्यामुळे त्यांना ‘फादर ऑफ जेनेटिक्स’ असं संबोधलं जातं. पूर्वी ऑस्ट्रिया देशाचा भाग असलेल्या आणि आता चेक रिपब्लिकमध्ये समाविष्ट झालेल्या एका खेडय़ात, एका बागायतदाराच्या कुटुंबात ग्रेगर मेंडेल यांचा जन्म झाला.
एका चर्चमध्ये धर्मोपदेशक म्हणून नेमणूक झाल्यावर चर्चच्या कामातून मिळणाऱ्या फावल्या वेळेत मेंडेलने तिथल्या बागेत वाटाण्याच्या वेलींवर प्रयोग करायला सुरुवात केली. वाटाण्याच्या वेलींवर केलेले प्रयोग आणि या प्रयोगांचे आनुवंशिकतेच्या दृष्टीने मिळालेले निष्कर्ष १८८५ साली त्यांनी प्रसिद्ध केले.
पण त्यांचे हे विचार काळाच्या इतके पुढे होते की, त्या वेळच्या शास्त्रज्ञांना ते अजिबात पटले नाहीत. त्यांनी मेंडेल यांच्या संशोधनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे मेंडेल प्रचंड निराश झाले.
चर्चच्या प्रमुख पदावर नेमणूक झाल्यानंतर मेंडेल यांना या प्रयोगांकडे लक्ष देणं शक्य झालं नाही. १८८४ साली जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते शास्त्रज्ञ म्हणून जगाला पूर्णपणे अपरिचित होते. १९०० साली त्यांनी प्रसिद्ध केलेलं संशोधन कार्य हॉलंडचे ह्यूगो डी व्हाइस, जर्मनीचे कार्ल कॉरेन्स आणि ऑस्ट्रियाचे एरिक व्हॉन टेशमार्क या तीन शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे अभ्यासलं आणि मेंडेल यांना त्यांनी केलेल्या संशोधन कार्याचं श्रेय दिलं गेलं. पुढे हे संशोधन ‘मेंडेलचे आनुवंशिकतेचे नियम’ या नावाने प्रसिद्ध झालं आणि आधुनिक जनुक/अनुवंश शास्त्राचा पाया ठरलं. पण आपल्या हयातीमध्ये आपल्या कामाची दखल घेतली गेली नाही, हे शल्य उरात घेऊनच मेंडेल यांनी या जगाचा निरोप घेतला.
– प्रिया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा