डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्रचळ आजाराचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कृती करण्याची सक्ती असते. दुसऱ्या प्रकारात अशी कृती असतेच असे नाही; पण मनात एकच विचार परत परत येतो आणि त्या विचाराचीच भीती वाटू लागते. बाळ अंगावर पीत असलेल्या काही स्त्रियांना हा त्रास होतो, त्या वेळी माझ्या या बाळाला मी काहीतरी इजा करेन असा विचार त्या मातेच्या मनात येत राहतो. त्यामुळे ती अस्वस्थ राहते. ‘बाळाला/ जोडीदाराला अपघात होईल, जोडीदाराचे अनैतिक संबंध आहेत, कुणी तरी आपल्यावर करणी केली आहे, आर्थिक नुकसान होऊन दारिद्रय़ येईल..’ यांसारखे विचार मनात सारखे येत राहतात. तो विचार चुकीचा आहे हे बुद्धीला पटत असते, पण मनातून तो विचार जात नाही. ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’ करायला हवे हे माहीत असते; पण मनात येणाऱ्या या नकारात्मक विचारांचे काय करायचे, हा प्रश्न काही सुटत नाही. काही जणांना लैंगिक विचार पुन्हा पुन्हा येतात, लैंगिक अवयवांची चित्रे दिसतात, आपल्या विचारांची आणि त्यामुळे स्वत:चीच त्यांना घृणा वाटू लागते. काही रुग्णांना दिसणाऱ्या प्रतिमा खऱ्या आहेत असे भास होतात. अशा वेळी मानसरोगतज्ज्ञांकडून औषधे घेणे आवश्यक असते.

मंत्रचळ असलेल्या माणसांच्या मेंदूची तपासणी केली असता, त्यात मुख्यत: दोन बदल दिसतात. भीतीपोटी कृती करण्याची सवय असते, त्या वेळी त्या व्यक्तीच्या मेंदूतील ‘अमीग्डला’ हा भावनिक मेंदूचा भाग अधिक सक्रिय असतो. दुसरा बदल म्हणजे, ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’मध्ये ‘डॉर्सोलॅटरल प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ हे मुख्य लक्षवेधी केंद्र आहे. आपले ‘अटेन्शन’ कोठे असावे, ते हा भाग ठरवतो. म्हणूनच याला मेंदूचा सीईओ असे म्हणतात. कारण रोजच्या व्यवहारात कशाला महत्त्व द्यायचे आणि कशाला नाही, हे जसे सीईओ ठरवतो; तसेच कोठे लक्ष द्यायचे, हे मेंदूतील हा भाग ठरवत असतो. ओसीडीचा त्रास असणाऱ्या माणसात हे केंद्र नीट काम करीत नाही. त्यामुळेच आपण विचारांच्या तंद्रीत आहोत याचे भान त्यांना लवकर येत नाही. मनात भीतीचे किंवा लैंगिक विचार येणे ही काही विकृती नाही. असे विचार सर्वानाच येतात; पण त्या विचारांना किती महत्त्व द्यायचे, याचे भान आरोग्यासाठी आवश्यक असते. सजगतेच्या सरावाने हे भान वाढले, की विचारांचा त्रास कमी होतो.

yashwel@gmail.com