अ‍ॅन फेल्डहाउस या मूळच्या अमेरिकन असलेल्या विदुषींची महाराष्ट्राविषयीची उत्कट आत्मीयता उल्लेखनीय आहे. त्यांचा महाराष्ट्रीय संस्कृतीचा, धार्मिक चालीरीतींचा आणि मराठी भाषेचा अभ्यास असून सामाजिक शास्त्रांमधल्या विविध पद्धतींचा अवलंब करून केलेले सखोल संशोधन वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यांनी महाराष्ट्रात अनेक वष्रे राहून विविध लोकसमूहांच्या जीवनशैलींचा आणि मौखिक वाङ्मयाचा अभ्यास केला आणि त्यावर इंग्रजीत पुस्तके लिहिली. विशेषत: धनगर समाजाच्या ओव्यांचा, त्यांचा अभ्यास स्तिमित करणारा आहे. अ‍ॅन फेल्डहाउस यांचा जन्म १९४९ सालचा. सध्या त्या अ‍ॅरिझोना विद्यापीठात ‘डिस्टिंग्विश्ड फौंडेशन प्रोफेसर ऑफ रिलिजस स्टडीज’ म्हणजे विद्यापीठीय धर्मअभ्यास विभागाच्या अध्यापिका आहेत. भारतात त्या १९७० साली प्रथम आल्या तेव्हा त्यांनी या राज्याचे नावसुद्धा ऐकले नव्हते. त्यानंतरच्या ४८ वर्षांतील त्यांचा महाराष्ट्रातील भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्थांचा अभ्यास, तसेच त्यावरील चिंतन आणि साहित्य हे थक्क करणारे आहे. भारतीय आणि पौर्वात्य विद्यांचे तज्ज्ञ समजले जाणारे प्रख्यात इंग्रजी भाष्यकार जॉन हॉली म्हणतात की, ‘अ‍ॅन या सर्व अभारतीय अभ्यासकांपकी सर्वोत्कृष्ट, चतुरस्र अभ्यास केलेल्या महाराष्ट्र विद्यातज्ज्ञ आहेत’.मॅनहॅटनव्हिले कॉलेजात पौर्वात्य धार्मिक, सांस्कृतिक विषयांचा अभ्यास करताना त्यांना भारतात येण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्या आठ महिने पुण्याला एका मराठी विद्वान, उच्चशिक्षित कुटुंबात राहिल्या. अ‍ॅनच्या कुटुंबात इतर धर्माबद्दल सहिष्णुतेची शिकवण होतीच. पुण्यात त्या ज्यांच्याकडे राहिल्या त्यांनी भगवद्गीता, उपनिषदे आणि इतर धर्मग्रंथांमधील तत्त्वज्ञान याबाबत संक्षिप्त माहिती दिली. आळंदी, देहू आणि इतर मंदिरे, श्रद्धास्थाने पाहून प्रभावित झालेल्या अ‍ॅन १९७०अखेरीस अमेरिकेत परतल्या. मॅनहॅटनव्हिले कॉलेजातून शिक्षण पूर्ण करून पुन्हा महाराष्ट्रात राहण्यासाठी, मराठी लोकांमध्ये मिसळण्यासाठी त्यांनी , अ‍ॅरिझोना स्टेट विद्यापीठातून पीएच्.डी. करताना मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचा कसून अभ्यास केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com