आवर्तसारणीत मूलद्रव्यांची शंभरी गाठणारे मूलद्रव्य म्हणजे फर्मीअम! फर्मीअमच्या शोधाचे रहस्य हायड्रोजन बॉम्बच्या पहिल्या चाचणीमध्ये दडलेले आहे. पॅसिफिक महासागरातील मार्शल द्वीप-समूहावर आटोल येथे १ नोव्हेंबर १९५२ रोजी घडवून आणलेल्या आणि ‘आयव्हीमाइक’ असे नामकरण केलेल्या या चाचणीच्या अवशेषांमध्ये या मूलद्रव्याचे अस्तित्व प्रथमत आढळले. निसर्गात आढळणाऱ्या युरेनिअम-२३८ नंतरच्या मूलद्रव्यांचे अस्तित्व शास्त्रज्ञांना विरळ वाटत होते. कारण अशा मूलद्रव्यांच्या निर्मितीसाठी युरेनिअम-२३८चे न्यूट्रॉन कणांशी मीलन व त्यानंतर बीटा कणांचे उत्सर्जन होणे आवश्यक असते. परंतु वरील चाचणीच्या अवशेषांमध्ये प्लुटोनिअम-२४४ हे मूलद्रव्य आढळल्यामुळे युरेनिअम-२३८ पुढील मूलद्रव्यांच्या अस्तित्वाची आशा बळावली. त्यामुळे ‘आयव्हीमाइक’ हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचे अवशेष बर्कले येथील कॅलिफोíनया विद्यापीठात आणून त्यावर संशोधन करण्यात आले. यामध्ये अमेरिकन भौतिकी अणुशास्त्रज्ञ अल्बर्ट घिओसरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या नवीन मूलद्रव्याचा शोध लावला. अशा या आवर्तसारणीत शंभर अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याला भौतिकी अणुशास्त्रात भरीव संशोधन केलेल्या आणि पहिल्या कृत्रिम अणुभट्टीचा निर्माता असणाऱ्या एन्रिको फर्मी यांचे नाव सार्थपणे देण्यात आले. फर्मीअमचा शोध ही एक महत्त्वपूर्ण घटना होती. परंतु त्यावेळी असलेल्या शीत युद्धाच्या परिस्थितीमुळे हे संशोधन गुप्त ठेवण्यात आले व पुढे १९५५मध्ये यथावकाश ते प्रसिद्ध करण्यात आले. याच दरम्यान स्टॉकहोम येथील ‘नोबेल इन्स्टिटय़ूट फॉर फिजिक्स’मधील शास्त्रज्ञांनी युरेनिअम-२३८वर ऑक्सिजन-१६ चा मारा करून फर्मीअमची निर्मिती केली व त्यांनी हे काम १९५४ मध्ये प्रसिद्ध केले. या शास्त्रज्ञांनी नवीन मूलद्रव्याचा अणुक्रमांक शंभर असल्यामुळे त्याचे नाव सेन्चुरीअम असे ठेवले; असे असले तरी फर्मीअमच्या शोधाचे मूळ श्रेय अल्बर्ट घिओसरे आणि त्यांच्या चमूला दिले जाते. तसेच १९५७ मध्ये या मूलद्रव्याच्या ‘फर्मीअम’ या नावावर आयुपॅक या संस्थेने शिक्कामोर्तब केले. फर्मीअमची वीस समस्थानिके आहेत, त्यातील फर्मीअम-२५७ हे सर्वात जास्त म्हणजे १०० दिवसांचे अर्धायुष्य असलेले समस्थानिक आहे.
फर्मीअमची निर्मिती दृश्य आणि मुबलक प्रमाणात करण्यात अद्याप तरी यश मिळालेले नाही. फर्मीअम किरणोत्सारी असल्यामुळे भविष्यात त्याचा उपयोग कर्करोग इलाजावार होऊ शकेल का, याची चाचपणी घेण्यात येत आहे.
– डॉ. शिवराज गर्जे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org