गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. यात वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकाना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे त्यांना संपूर्ण वाढीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.
सेंद्रिय खताचे मुख्य दोन प्रकार आहेत –
भरखते : शेणखत – जनावरांचे शेण, मूत्र व गुरांनी खाऊन राहिलेले चारा-वैरणीचे अवशेष हे यात मोडतात. चांगले कुजून तयार झालेल्या शेणखतात नत्र ०.७५ टक्के स्फुरद ०.५० टक्के व पालाश ०.७५ टक्के असते.
कंपोस्ट – शहरातील तसेच खेडय़ातील केरकचऱ्याचे जीवाणूंमुळे विघटन होऊन हे तयार होते. यात नत्र १.५ टक्के, स्फुरद एक टक्का व पालाश १.२ टक्के एवढे असते.
एफवायएम – फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे एफवायएम हे खत शेतातील गवत, पिकाचे कापणीनंतर उरलेले भाग, भुसा, ऊसाचे पाचट वगरे कुजवून तयार केले जाते. यात जनावरांचे शेण किंवा मूत्र वापरले जात नाही. त्यामुळे शेणखत वा कंपोस्ट खतापेक्षा या खतात नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण कमी असते.
हिरवळीचे खत – दाट पेरणी केलेले शेंगवर्गीय पीक फुलोऱ्यात आले की ते शेतातच गाडून कुजवतात. पिकाच्या निवडीप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. कोरडवाहू विभागात या खताचा वापर कमी दिसतो.
गांडूळ खत – नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गुरांचे कुजलेले शेण, मूत्र, गांडुळांची विष्ठा, गांडुळांची अंडी आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा यात समावेश असतो. त्यामुळे इतर खतांपेक्षा हे सेंद्रिय खत पिकांना जास्त प्रभावी ठरते.
जोरखते : या वर्गात हाडाचे खत, मासळी खत, खाटीक खान्यातील रक्तखत, कोंबडीखत आणि तेलबियांच्या पेंडी इत्यादी नमूद करता येतील. भरखताच्या तुलनेत जोरखतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. यामुळे ही खते भरखतापेक्षा कमी प्रमाणात पिकांना दिली तरी अन्नाची गरज भागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा