कुतूहल
अग्निरोधक फर्निचर
घरातील फर्निचर करण्यासाठी लाकडाचा बऱ्याच मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. लाकूड ज्वलनशील असल्याने ते लवकर पेट घेते आणि आग वेगाने पसरू शकते. परिणामी बऱ्याच मोठय़ा प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. या त्याच्या गुणधर्मामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर काही प्रमाणात सीमित होतो. ही समस्या सोडवण्यासाठी आज अनेक अग्निरोधक रसायने उपलब्ध आहेत. यातील योग्य प्रकारची अग्निरोधक रसायने काळजीपूर्वक वापरल्यास आगीची भीती न बाळगता आपण लाकडी फर्निचरचा वापर मोठय़ा प्रमाणात करू शकतो. अशा अग्निरोधक रसायनाचे आवरण जर फíनचरवर असेल तर ते लवकर पेट घेत नाही आणि जेव्हा ते पेटते तेव्हा ते पेटल्यावर त्यातून कमी प्रमाणात उष्णता बाहेर पडते. या अग्निरोधक रसायनामध्ये फॉस्फरस, सिलिका, बोरोन आणि त्यांची संयुगे त्याचप्रमाणे मोनो अमोनिअम फॉस्फेट, ओर्थो फोस्फोरिक आम्ल, बोरॅक्स, बोरिक आम्ल आणि बोरिक ऑक्साइड इत्यादींचा समावेश असतो. या रसायनांचे ज्वलन झाल्यावर कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ तयार होते. तसेच पृष्ठभागावर फेस तयार झाल्याने जळणाऱ्या फíनचरचा हवेशी संपर्क तुटतो आणि त्यामुळे त्यांची ज्वलनक्षमता कमी होते.
अग्निरोधक रसायने ही लाकडाच्या आतमध्ये टाकल्याने ते लवकर जळत नाही. तसेच त्यावर लेप करतानाही अग्निरोधक रसायने वापरतात. फíनचरला जे लेप असते ते दिसण्यासाठी कसे आहे आणि त्याचा वापर किती काळ करून त्यांची दुरुस्ती कशी करायची, या सर्व गोष्टींवर ते अवलंबून आहे. त्या लाकडाला रंग किंवा द्रवरूप रंग तर कधी पिग्मेन्ट, तर कधी पारदर्शक पदार्थाचा थर दिला जातो.
लाकडी फíनचरवर वातावरणाचा परिणाम होतो. पावसाळ्यात वातावरणात बाष्प जास्त असल्याने ते फुगते तर उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेमुळे लाकडातील बाष्प निघून गेल्याने ते आकसते. त्यामुळे त्याला असे लेप हवे की दोन्ही वातावरणात उपयोगी असेल.
लाकडी फíनचरची अजून एक समस्या म्हणजे त्याला लागणारी वाळवी.आर्द्रतेमुळे फर्निचरला वाळवी लवकर लागते. ही आर्द्रता कमी करण्यासाठी जलरोधक रसायने घरात आणि घराबाहेरील भागात वापरतात.
प्रा. श्यामकुमार देशमुख (सोलापूर)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’
सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बौद्धधर्म हिंदुस्थानांतून परांगदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडीवाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मते, आर्याच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी ७००० र्वष धरली, तर इतकी र्वष हे आमचे मोक्षदाते देव; देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरडय़ा भाकरीची पंचाईत! पण या देवांना सकाळची न्याहारी! दुपारी पंचपक्वान्नांचे भरगच्च ताट! पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाही.’’ प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात लिहितात –
‘‘हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंडय़ा जमा करून एखाद्या मोठय़ा मध्यवर्ती शहरांत त्यांचे एक कायम प्रदर्शन करावे. म्हणजे भावी हिंदू पिढय़ांना आणि इतिहास संशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदुजनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यासता येईल. रिकामी पडलेली देवळे आणि त्यांची कोटय़वधी रुपयांची उत्पन्न्ो याचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कसकसा उपयोग करावयाचा, हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय िहदू मंडळ नेमावे. अशा काही योजना झाल्यास पंथ, मत, पक्ष भेदांचा निरास होऊन देवळांचा अनेक सत्कार्याकडे उपयोग होईल.. हिंदू समाजात माणूसघाण पसरविणाऱ्या देवळांतला बागुलबुवा किंवा बागुलबाईच एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली, की हिंदुसंघटनाचा मार्ग पुष्कळच मोकळा होईल. या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदू जनांना दाखविता येत नसेल, तर स्वराज्यालाच काय, पण जगायलाही ते कुपात्र ठरतील, यात मुळीच संदेह नाही.’’

मनमोराचा पिसारा
रुबाबदार नि दमदार
रस्ते सरळ असतात. वळणावळणाचे असतात. सोपे वाटावे तोच अवघडल्यासारखे गर्रकन वळतात. रुंद-अरुंद असतात. नेहमीचे असतात. परके असतात. न संपणारे असतात. तर काही संपू नये असं वाटणारे असतात; पण रस्त्यांच्या या विविध वाटा, आणि मार्ग यांना छेद देणारा असा राजपथ आहे, ज्याच्याविषयी असं ठरावीक बोलताच येणार नाही. आपण दरवर्षी या रस्त्यावरची परेड पाहतो, तर कधी सिनेमात शहर ‘दिल्ली’ आहे हे एस्टाब्लिश करण्यापुरता या राजपथावरून नायकाची कार, नाही तर बाइक भुर्रकन जाते.
पण मित्रा हा रस्ता नुसता पाहायचा नाही, तर हा तुडवत तुडवत पाय तुटेपर्यंत चालायचा असतो. हा ‘राजपथ’ म्हणजेच राष्ट्रपतिभवन म्हणजे रायसिना हिल ते इंडिया गेटपर्यंतचा हा रस्ता विलक्षण दिमाखदार आहे.
मुळात लांब नि रुंद, ऐसपैस अशा रस्त्याला सौंदर्याचा वरदहस्त लाभलाय. रंगाऱ्याच्या जोरकस फटकाऱ्यांनी हा रस्ता रंगलेला आहे. काळ्या कुळकुळीत रस्त्याला, लालबुटुक मातीचे शोल्डर, त्या पलीकडे हिरव्यागार हिरवळीचे लांबसडक पट्टे, पाण्याचे कॅनाल्स आणि त्या पलीकडे घनदाट वृक्षराजी. ल्यूटननं मोठय़ा रसिकतेनं आखणी केलेल्या या रस्त्यावर, वाटेत विजय चौक आणि लोकसभेची वर्तुळाकार इमारत लागते. डावी-उजवीकडे जुन्या संस्थानिकांचे रुबाबदार बंगले आहेत. वाटेत जनपथ आडवा येतो. इंडिया गेटमध्ये अमर जवान ज्योत दिसते.
राष्ट्रपती भवनाच्या भव्य पायऱ्यांसमोर आयताकृती लाल मैदान आहे (इथे काल शपथविधी झाला. तिथे उभं राहिलं की, रायसिना हिलचा डौलदार उतार आणि इंडिया गेट दिसतं. बाणासारखा जाणारा सरळ रस्ता इज प्राइड ऑफ इंडिया.
इथे चालताना आपण भारावून जातो. असं वाटतं, या अवाढव्य देशाचा कारभार चालविण्याकरिता निवडलेल्या व्यक्तींची पावलं इथे उमटली होती, आहेत आणि राहतील. देशाची विशालता आणि विविधता यांच्या वैभवाची हा रस्ता साक्ष आहे. आमचा इतिहास भव्य आहे आणि तितकंच भविष्य भरभराटीचं आहे. एकदा चालून तर पाहा.. अहं. असं टुरिस्ट बस, टॅक्सीने नाही, मान वर करून रुबाबदारपणे दमदार पावलं टाकत.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

Story img Loader