श्रुती पानसे

जगातली पहिली प्रेमाची भावना ही आई आणि तिचं पिल्लू यामधली असावी, असं संशोधकांचं मत आहे. ही आई म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये लिंबिक सिस्टीम (भावनानिर्मितीच्या यंत्रणा) विकसित झाली आहे अशी आई. मांजर, माकड, कुत्रा अशा सस्तन प्रजातीतली आई. पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा सस्तन प्राण्यांचा जन्म झाला, तेव्हाच प्रेमाची भावना निर्माण झाली. आपल्या पिल्लांबद्दल प्रेम निर्माण झालं. असं प्रेम त्या आधीच्या प्रजातींच्या आई-पिल्लामध्ये आढळून येत नाही.

सस्तन प्राण्यांमध्ये मांजर पिल्लांची काळजी घेते. सुरुवातीच्या काळात पिल्लं तिच्या दुधावर जगतात. ती त्यांच्यावर प्रेम करते. त्यांचं संरक्षण करते. यासाठी ती पिल्लांच्या जागा बदलते. इतर सस्तन प्राणी-आई त्यांच्या मेंदूतल्या यंत्रणेनुसार प्रेम करतात आणि आपल्या पिल्लांची काळजी घेतात. पिल्लं वागायला चुकली, जास्त अल्लडपणा केला, शिकार करताना चुका केल्या तर गुरगुरतात. एवढंच नाही तर स्वसंरक्षण, शिकार अशी काही जीवन कौशल्यंदेखील शिकवतात.

ही पालकत्वाची लक्षणं सस्तन प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात दिसून येतात. मात्र काही काळाने हे आपलं पिल्लू आहे हे ते विसरून जातात. कारण त्यांच्यातली भावानिक केंद्र आणि स्मरणशक्तीचं केंद्र यांना जोडणारा पूल पूर्ण विकसित झालेला नसतो. कुत्री वासावरून आपलं घर, आपली माणसं लक्षात ठेवतात. कारण नाक आणि स्मरणशक्ती हा पूल मजबूत असतो.  मेंदूच्या त्रिस्तरीय टप्प्यामधला पहिला स्तर आहे- सरपट मेंदू. जिथे स्वसंरक्षण असतं. त्यावरचा दुसरा स्तर आहे- भावनिक मेंदू. लिंबिक सिस्टीम. आकृतीमध्ये हा भाग मेंदूच्या साधारण मधल्या भागात दिसतो आहे. उत्क्रांतीच्या काळात सरपट मेंदूवर प्रथिनांचं आवरण निर्माण होत गेलं. या आवरणामध्ये काही करय वाढली. त्यातलं एक कार्य म्हणजे भावनांची निर्मिती.

सस्तन प्राण्यांमध्ये सरपट मेंदूचा पहिला + भावनिक मेंदूचा दुसरा असे दोन स्तर असतात. त्यामुळे या प्राण्यांचा मेंदू जलचरांपेक्षा अधिक प्रगत आहे.  याशिवाय दुसऱ्या स्तरातली भावनानिर्मितीही असते. माकड, हत्ती अशा सर्व सस्तन प्राण्यांमध्ये स्वत:चं संरक्षण करण्याची प्रबळ भावना असतेच. माणूस या सर्वापेक्षा अजून वरचा आहे. कारण त्याच्या मेंदूत तिसराही स्तर असतो.

contact@shrutipanse.com

Story img Loader