मरळ, मागूर, झिंगा हे मांसभक्षक मासे व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे असतात.
अ)मरळ : पृष्ठपर व गुदपर लांब, शेपटीचा पर गोलाकार असलेले हे मासे खाण्यास रुचकर असतात. याच्या डोक्याचा आकार सापाच्या डोक्यासारखा असतो. मरळ हवेतील प्राणवायू घेऊ शकतात. मांसभक्षक असल्याने इतर जातीच्या माशांबरोबर याचे संवर्धन करत नाहीत.
ब)मागूर : हिरवट तांबूस रंगाच्या कॅटफिश जातीच्या या माशाचे डोके चपटे असते. पृष्ठभाग तसेच गुदपर लांब असते. ते प्राणवायू कमी असलेल्या पाण्यातही चांगल्या प्रकारे राहू शकतात.
क) झिंगा: कॅटफिश जातीचा हा मासा तोंडाभोवतीच्या मिशांमुळे ओळखला जातो. त्याचा पृष्ठभाग लहान, गुदपर लांब, शेपटी गोलाकार असते. अंगावर खवले नसतात.
मत्स्यसंवर्धन करताना तलावामध्ये पाणी चांगल्या प्रकारे गाळून घ्यावे. पाण्याचा सामू नियंत्रित राखण्याकरिता प्रति हेक्टरी २५० ते ३०० किलोग्रॅम चुना टाकावा. चुन्याची मात्रा पाण्याच्या सामूवर अवलंबून असते. पाण्याची प्रत व व्यवस्थापनानुसार संगोपन तलावामध्ये दहा लाख ते एक कोटी मत्स्यजिऱ्यांची, रेअिरग तलावामध्ये तीन ते चार लाख मत्स्यबीजांची व संचयन तलावांमध्ये आठ ते दहा हजार मत्स्य बोटुकलींचे संचयन करावे. तलावांमध्ये नसíगक अन्ननिर्मितीसाठी ताज्या शेणाचा वापर १० ते २० टन प्रति हेक्टर प्रति वर्ष एवढा करावा. त्यापकी अर्धी मात्रा मत्स्यबीज सोडण्याच्या पंधरा दिवस अगोदर पुरवावी. उर्वरित मात्रा प्रत्येक महिन्याला समान भागांमध्ये पुरवावी. माशांना पुरवले जाणारे अन्न कमी पडणार नाही वा शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण योग्य राखण्याकरिता हवेच्या पंख्यांचा उपयोग करावा. पाण्यामध्ये इतर अनावश्यक मासळी असल्यास महुआ पेंड, चहाची पेंड, डेरीस मुळाची पावडर अथवा ब्लिचिंग पावडर यांचा उपयोग करावा. नर्सरी तलावामधील पाणकीटक मारण्याकरिता तेल, केरोसिन, डिझेल, वनस्पतीपासून मिळणारे तेल इत्यादी व साबण किंवा डिर्टजट यांचे मिश्रण वापरावे. माशाचे आरोग्यमान तपासण्याकरिता नियमित नमुना चाचणी करावी. माशामध्ये रोग आढळल्यास मत्स्यसंवर्धन तज्ञांची मदत घ्यावी.
जे देखे रवी..- संसार करावा नेटका
प्रत्येक माणसाला कधी ना कधी तत्त्वज्ञानातले प्रश्न पडतातच. डॉ. राधाकृष्णन म्हणतात, यशाच्या शिखरावर किंवा दु:खाच्या दरीत हे प्रश्न जास्त भेडसावतात. शिखरावरची झुळुक असते. दरीत झळा लागतात. जगाच्या बाजारपेठेत किंवा जत्रेतही गूढ प्रश्नांची माळ गळ्यात पडते.
कारमाझॉफ बंधू या सुप्रसिद्ध कादंबरीतला मित्या म्हणतो तुमचे पैसे तुम्हाला लखलाभ होवोत. मला हवी आहेत माझ्या प्रश्नांची उत्तरे. हेन्री डेव्हिड थोरो नावाचा एक श्रीमंत कुटुंबाचा वारसदार अरण्यात जाऊन झोपडी बांधून राहिला. तो म्हणाला, इथे मला कधी उशीर होतच नाही. निसर्गातला अव्याहत संथपणा मला वेळेवरच आल्याचा भास देतो. तत्त्वज्ञान खुरडते, विज्ञान त्यामानाने केवढय़ातरी झेपा मारते. तत्त्वज्ञानचे हे संथ खुरडणे माणूस विचार करायला लागला तेव्हापासून चालू आहे. ससा आणि कासवांतल्या गोष्टीतले हे कासव आहे. पण हेच पुरून उरेल आणि ससा हरेल असे म्हटले जाते. कारण विज्ञानातून निसर्गातल्या संथ परंतु चक्रावणाऱ्या प्रक्रियांचे दर्शन घडत आहे. अर्थात हे दर्शन सात छिद्रे असलेल्या माणूस नावाच्या हाडामांसाच्या गोळ्यालाही शक्य आहे. पण त्यासाठी त्याला आपल्या डोळ्यावर लावलेली झापडे आणि त्यांना चिकटलेली चिपडे काढावी लागतील, असे विल डय़ुरांट या सुप्रसिद्ध लेखकाने म्हटले आहे. ब्राऊनिंग नावाच्या कवीने म्हटले आहे, या जगरहाटीला काही तरी अर्थ असणारच ते शोधून काढणे हे माझे दररोजचे खाद्यपेय आहे.
पाश्चिमात्य विचारांचा जनक सॉक्रेटिस. डोळ्यावरची झापडे आणि पापण्यांमधली चिपडे काढलेल्या या माणसावर ‘सूर्य पाहिलेला माणूस’ असे नाटक येऊन गेले. याचे आणि प्लेटोचे संवाद सुप्रसिद्ध आहेत. या सूर्य पाहिलेल्या माणसाच्या घरात गुलाम होतेच आणि हा स्वत: दरबारी पक्षाचा होता. त्याला शिक्षा देणारे सगळे सुतार, लोहार, कुंभार वगैरे होते. हे बलुतेदार त्याला म्हणाले, तू चूक कबूल कर. तुला एक रुपयाचा दंड करून आम्ही सोडून देऊ. सॉक्रेटिसने ते नाकारले आणि त्याला विष प्यावे लागले. त्याच्या बायकोचे नाव झांटिपी. ही मोठी कजाग म्हणून प्रसिद्ध आहे. पण ती करणार तरी काय? हा घरात दिडकी आणत नसे आणि गावभर जवळपास उघडा फिरत भाषणे देत असे. कोणीतरी म्हटले आहे सॉक्रेटिस आणि प्लेटोच्या संवादापेक्षा त्याचे आणि झांटिपीचे संवाद जर टिपून ठेवले गेले असते तर जगाचे जास्त भले झाले असते.
असे वागायचे होते तर लग्न कशाला केले? लोकमान्यांच्या पत्नीने म्हटले होते, अशा पुरुषांनी लग्न करू नये. तत्त्वज्ञानाचे खुरडणे आणि विज्ञानाच्या झेपा म्हणे! पण संसार करावा नेटका हेच मला वाटते खरे आणि असे आम्ही संसारीच खरेतर भले.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस- भस्मकाग्नि – कष्टकर व्याधी
माझे वडील हयात असतानाची गोष्ट. दूरच्या एका मंदिरातील राजकारणाला कंटाळून, तिथे पुजारी असलेले एक मूळचे मराठीभाषक गृहस्थ पुण्यात शुक्रवार पेठेत कायमचे राहायला आले. साहजिकच वडिलांकडे घरचे म्हणूनच राहू लागले. बारीकसारीक कामे करायचे. एक दिवस शेजारच्या मोठय़ा व्यक्तीने वडिलांना विचारले, हा माणूस रस्त्यावरचे उष्टे अन्न का खातो? आई-वडिलांनी त्यांना विचारले, असे का करता? घरात काही कमी मिळते का?
ते उत्तरले- मंदिराचा पुजारी असताना रोज मी दहा-पाच लाडू खात असे. चिक्कार जेवायचो. इथे तुमचे जेवण मला काय पुरते? आमच्या तीन मजली घरातील माळ्यावर ठेवलेल्या गुळाच्या ढेपींच्या आकस्मिक रिकाम्या झाल्याचेही रहस्य उलगडले.
माझ्याकडे महिन्यातून एखादेतरी कुटुंब आपल्याजवळील माणसांच्या प्रचंड, महाप्रचंड, न आवरणाऱ्या भुकेबद्दल तक्रारी घेऊन येत असतात. ‘या मुलाकडे बघा, यांच्याकडे पाहा, कितीही अन्न वाढा, पोळ्या द्या, लाडू द्या, यांची भूक संपतच नाही. मी तर वैतागले आहे.’
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आपल्या शरीरातील अग्नीचे तीक्ष्णाग्नि, मंदाग्नि, विषमाग्नि, समग्नि असे चार प्रकार आहेत. खूप खूप भूक लागणे वाईट नाही. ते तारुण्याचे, उत्तम आरोग्याचे प्रमुख लक्षण आहे.
प्रत्येक आयुर्वेदिय चिकित्सक रुग्णांचे उपचार करताना जठराग्नि डोळ्यासमोर ठेवून औषधयोजना करतात. इथे मात्र पोटातली आग शमविण्याकरिता प्रवाळ, कामदुधा, चंदानादि मौक्तिकभस्म, उपळसरीचूर्ण, चंदनखोड गंध, धने चूर्ण, कोथिंबीररस, कोहळा, दुध्या भोपळा, दोडका, पडवळ अशा अळणी भाज्यांची मदत, भडकलेला अग्नी कमी करण्याकरिता उपयोगी येते. साळीच्या, राजगिऱ्याच्या, ज्वारीच्या लाह्य़ा, ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण अशा पदार्थानी भस्मकाग्निवर जय मिळवू या!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – १७ सप्टेंबर
१८८५ > केशव सीताराम तथा ‘प्रबोधन’कार ठाकरे यांचा जन्म. पाच नाटके, गाडगेबाबा व पंडिता रमाबाई यांची चरित्रे, पाच इतिहासाधारित पुस्तके, ‘देवांची परिषद’ (नाटय़रूप), ‘देवळांचा धर्म व धर्माची देवळे’ अशी स्वधर्मटीका आदी पुस्तके लिहून त्यांनी महाराष्ट्र राज्य पुरोगामी असावे, असे प्रयत्न केले होते.
१९३८ > प्रयोगशील कवी, वारकरी परंपरेचे अभ्यासक, चित्रपटकार व चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. ‘कविता’ आणि ‘कवितेनंतरची कविता’ या संग्रहांतून तसेच अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कवितांचा निराळा ठसा दिसला, तसेच ‘चाव्या’, ‘शतकांचा संधिकाल’,‘तिरकस आणि चौकस’ असे गद्यलेखनही त्यांनी केले. कथा, नाटक, कविता, भाष्य मिळून २४ पुस्तके मागे सोडून ते २००९ साली गेले. ‘सेज् तुका’ आणि ‘पुन्हा तुकाराम’ ही तुकारामांचा पुनशरेध घेणारी इंग्रजी-मराठी पुस्तके नव्या वळणावरली ठरली.
१९५१ > समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म. ‘गोईण’ व ‘कानोसा’ या पुस्तकांपैकी ‘गोईण’साठी त्यांना राज्यपुरस्कार मिळाला .
२००२ > कविवर्य वसंत बापट यांचे निधन. बिजली, अकरावी दिशा या काव्यसंग्रहांसह एकंदर २५ पुस्तके तसेच काव्यवाचन हे त्यांचे कर्तृत्व.
– संजय वझरेकर